आता खा ओरिजिनल हापूस : GI मानांकनाने हापूसचा राज्याभिषेक !!!
‘बहेनजी ये आंबा देवगड से लाया हे...एकदम पका हुवा फल हे...देखो तो सही !’ अस्स बोलून तो भय्या आपल्याला कर्नाटकचा आंबा देवगड आणि रत्नागिरीच्या नावाने खपवत असायचा आणि आपणही त्याला बळी पडायचो. खरं तर आजमगडशिवाय कोणताही ‘गड’ माहित नसलेला भय्या देवगडच्या नावाने आंबा विकतो तेव्हा हसावं कि रडावं तेच कळत नाही.
आंबा आंबा असतो मग त्यात फरक काय असं तुमच्याही मनात येत असेल पण देवगडच्या मातीतलं फळ आणि कर्नाटकच्या मातीतलं फळ यात बराच मोठा फरक असतो मंडळी. असो...
तर या झोलझालीला आळा घालण्यासाठी रत्नागिरी आणि देवगड हापूस आंब्याला सरकारतर्फे मानाचे ‘जीआय’ (भौगोलिक उपदर्शन) हे गुणवत्तेचे मानांकन देण्यात आले आहे.
जसे वयक्तिक उत्पादनासाठी पेटंट दिले जाते तसेच सामुहिक उत्पादनासाठी जीआय सर्टिफिकेट दिले जाते जेणेकरून विशिष्ठ भौगोलिक परिस्थितीत तयार होणारा पदार्थ त्या भागातील माणसांशिवाय कोणीही विकू नये. याचा अर्थ यापुढे कर्नाटक हापूस आंबा रत्नागिरी हापूस म्हणून विकता येणार नाही.
याचा उपयोग कसा होईल ?
रत्नागिरी आणि देवगड मधल्या शेतकऱ्यांना आपला आंबा जीआयचा टॅग लावून बाजारपेठेत पाठवता येईल. व्यापार्यांना या पेट्यामधल्या आंब्याचा फेरफार करता येणार नाही. असं केल्यास त्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. हे नामांकन पदार्थाच्या बौद्धिक क्षमता, दर्जा आणि गुणवत्तेवर दिले जात असल्याने आंबा निर्यातीत याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.
याआधीच मराठवाडा केसर, डहाणू घोलवड चिकू, जळगावची केळी, मुळशी आंबेमोहोर आणि भिवापूर मिरची अश्या पाच पदार्थांना जीआय नामांकन दिल्यानंतर त्यात रत्नागिरी, देवगड हापूस आंब्याची देखील भर पडली आहे !
शेवटी काय तर खवय्यांना अस्सल हापूस आंबा चाखायला मिळेल.