computer

बालविवाहापासून वाचण्यासाठी ती घरातून पळाली....तिने १२वीत मिळवलेले टक्के बघून तुम्ही तिला सलाम कराल !!

फार वर्षांपूर्वी आपल्याकडे बालविवाहासारखी प्रथा बंद झाली, पण आज २१ व्या शतकात पण ही प्रथा जिवंत आहे हे सत्य आहे. आज आपण ज्या मुलीविषयी वाचणार आहोत ती अशाच एका बालविवाहाला बळी पडली होती. तिने एका क्षणात निर्णय घेऊन तिथून हिमतीने पळ काढला. या साऱ्याचा शेवट वाचून तुम्हाला नक्कीच तिचा अभिमान वाटेल.

रेखा ही मुळची कर्नाटकच्या चिक्कबल्लापूर येथे राहणारी. तिचं वय साधारण १८ वर्ष आहे. बालविवाहापासून वाचण्यासाठी ती घरातून पळून गेली होती. तिला बंगलोर येथे एका मैत्रिणीच्या घरी आसरा मिळाला. 

वेळ न दवडता तिने आधी कॉम्पुटर ट्रेनिंग सेंटरमध्ये प्रवेश मिळवला आणि पुढे कॉलेज मध्ये प्रवेश मिळवला. यानंतर तिने कधीही मागे वळून पाहिलं नाही. SSLC (१० वी) मध्ये तिला ७४% गुण मिळाले तर नुकत्याच झालेल्या PU II (१२ वी) परीक्षेत तब्बल ९०% गुण मिळाले आहेत.

मंडळी, तिच्या शिक्षणाचा प्रवास सोप्पा नव्हता. तिने ज्या कॉम्प्युटर ट्रेनिंग सेंटर मध्ये प्रवेश मिळवला होता तिथलं शिक्षण तिला फारसं आवडलं नाही. तिने लहानमुलांसाठीच्या १०९८ या हेल्पलाईनवर फोन करून शिक्षणासाठी मदत मागितली. लवकरच बाल कल्याण समितीने तिला भेट दिली. तेव्हा ती एका ठिकाणी भाड्याने राहत होती. बाल कल्याण विभागाच्या मदतीने तिच्या राहण्याची व्यवस्था झाली आणि तिला एका सरकारी कॉलेज मध्ये प्रवेश देखील मिळाला.

दोन वर्षांच्या खडतर मेहनतीनंतर तिला १२वीत ९० टक्के गुण मिळाले आहेत. तिला इतिहास या विषयात ६०० पैकी ५४२ गुण मिळाले आहेत. पुढे तिला इतिहास, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र विषयांमध्ये BA करायचं आहे. तिचं स्वप्न काय आहे असं विचारल्यावर ती म्हणाली की मला ‘IAS अधिकारी’ व्हायचं आहे.  

मंडळी, जर रेखाचं त्यावेळी लग्न झालं असतं तर तिच्या या स्वप्नांचं पुढे काय झालं असतं याची फक्त कल्पनाच केलेली बरी. तिच्या या जिद्दीला बोभाटाचा सलाम.

सबस्क्राईब करा

* indicates required