बलात्कारी बाबा नित्यानंदाने नवा देश बनवला? असं खरंच कुणी करू शकतं??
आईनस्टाईनचा सिद्धांत खोटा आहे असं म्हणणारे नित्यानंद महाराज त्यांच्या व्हिडीओमुळे गेल्या वर्षापासून चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांना बलात्काराच्या खटल्या प्रकरणी कोर्टात हजर राहायचा आदेश आल्यानंतर त्यांनी देश सोडला असल्याची बातमी आली. ते पळून कुठे गेले याचा कोणालाच पत्ता लागला नव्हता. असे देश सोडून पळालेले महाभाग परदेशात जाऊन कुठेतरी लपतात हे तर तुम्हाला माहित आहेच, पण महराजांनी तर मोठं पाऊल टाकलंय. त्यांनी स्वतःचा देशच तयार केलाय..
काल नित्यानंद महाराजांनी त्रिनिदाद आणि टोबॅगो बेटांजवळच्या एका बेटावरून लाइव्ह प्रवचन दिलं. नित्यानंदांच्या आश्रमाच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार हे बेट स्वतः नित्यानंद यांनी विकत घेतलेलं असून तो आता नवीन देश आहे. या देशाचं नाव आहे ‘कैलासा’. या देशाचं स्वतःचं झेंडा, पासपोर्ट आणि चिन्ह आहे. हा एक हिंदू देश आहे अशी माहिती देण्यात आली आहे.
आश्रमाने दिलेली ही माहिती पाहा.
असं म्हणतात की हा नवीन देश एप्रिल २०१९ पासून अस्तित्वात आहे. वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार ज्यांना स्वतःच्याच देशात अस्सल हिंदू धर्म पळता आला नाही अशा जगभरातल्या हिंदू धर्मियांनी मिळून या देशाची स्थापना केली आहे.
या बेटाचा नेमका पत्ता कोणालाच माहिती नाही. एका माहितीनुसार हे बेट इक्वेडोरच्या नजीक आहे. दुसऱ्या एका बातमीनुसार हे बेट त्रिनिदाद आणि टोबॅगो जवळ आहे. खरा पत्ता सापडला तर पोलीस तिथे पोहोचतील म्हणून कदाचित पत्ता सांगण्यात आला नसावा.
तिथे कसं पोहोचायचं हे जरी माहित नसलं तरी ‘कैलासा’मध्ये काय काय असेल याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या नवीन देशात गुरुकुल पद्धतीचं शिक्षण असेल. तिसऱ्या नेत्रामागचं विज्ञान, योग, ध्यानधारणा शिकवली जाईल. याखेरीज मोफत आरोग्य सेवा, मोफत शिक्षण, मोफत अन्न आणि मंदिरावर आधारित जीवनशैली असणार आहे.
मंडळी, आता या थोतांडातून बाहेर येऊन परिस्थिती पाहूया. देश तयार करणे म्हणजे जमीन विकत घेण्या इतकं सोप्पं काम नाही. इतर देशांनी त्या देशाला मान्यता द्यावी लागते. कोणीही उठून देश तयार करू शकत नाही. हे खुद्द आपल्या परराष्ट्रमंत्रालयाने म्हटलं आहे.
ज्या वेबसाईटवरून ही माहिती प्रसारित करण्यात आली ती अमेरिकेच्या टेक्सस येथील डॅलस शहरातून चालवली जात असल्याचं समजलं आहे. तपास यंत्रणा या वेबसाईटवर नजर ठेवून आहेत.
तर मंडळी, कैलासा खरोखर अस्तित्वात आहे की नित्यानंद महाराजांच्या व्हिडीओप्रमाणे ही बातमी पण बोगस आहे हे थोड्याच दिवसात समजेल. तोवर तुम्ही नित्यानंद महाराजांचा हा व्हिडीओ पाहा. विज्ञान नक्कीच विसराल.