ट्राफिक पोलिसांपासून वाचायचं आहे ? मग गुगल मॅप्सचे हे २ फिचर्स जाणून घेतलेच पाहिजेत !!
गुगल मॅप्स नवनव्या फिचर्सने युझर्सना नेहमीच खुश करत असतं. नुकतंच गुगल मॅप्सने एक नवीन फिचर आणलं आहे. या फिचरने गुगल ट्राफिक पोलिसांपासून आपलं रक्षण करणार आहे. ते कसं ? चला समजून घेऊ.
गुगल मॅप्सच्या नवीन फिचरमुळे आपल्याला रस्त्यावरची वेग मर्यादा समजणार आहे. एखाद्या रस्त्यावर जास्तीतजास्त किती वेग ठेवू शकतो हे गुगल मॅप्सवर आपल्याला समजेल. या सोबतच वेगावर नजर ठेवणारे स्पीड कॅमेराज कुठे आहेत हेही गुगल आपल्याला सांगेल. वेग प्रमाणापेक्षा बाहेर गेला तर गुगल आपल्याला ऑडीओद्वारे सिग्नल देणार आहे.
याला तशा अर्थाने अपडेट म्हणता येणार नाही, कारण या फिचरसाठी तुम्हाला गुगल मॅप्सचं नवीन व्हर्जन डाउनलोड करण्याची गरज नाही. सर्व्हर मधल्या बदलाने हे फिचर प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये दिसत आहे.
गेल्या वर्षभरापासून गुगलने आपल्या युझर्सना स्पीड कॅमराची माहिती देण्याचं आवाहन केलं होतं. गुगल मॅप्सच्या तळाशी असलेल्या ‘+’ या चिन्हावर क्लिक करून युझर्स ही माहिती गुगलला देऊ शकतात.
वर्षभर माहिती जमवल्यानंतर आता ही माहिती युझर्ससाठी खुली करण्यात आली आहे. अमेरिका, इंग्लंड, डेन्मार्क देशात वेग मर्यादा दाखवण्यात येत आहे, तर भारत, ब्राझील, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, रशिया, मेक्सिको, इंडोनेशिया, या देशांमध्ये स्पीड कॅमरा लोकेशन दाखवण्यात येत आहे. फक्त अमेरिका आणि युके भागातले युझर्स दोन्ही फिचर्स पाहू शकतात.
मंडळी, स्पीड लिमिट फिचरसाठी आपल्याला थोडी वाट बघावी लागेल, पण तोवर स्पीड कॅमराची माहिती बघून घ्या. गाडी सुस्साट पळवताना ही माहिती फार उपयोगी पडेल !!
आणखी वाचा :
गुगल मॅप्सच्या सल्ला घेतला म्हणून त्याच्यावर पश्चातापाची वेळ का आली ? काय घडलं बघा !!
हरवलेला मोबाईल फोन परत मिळवण्याच्या ३ भन्नाट आयडिया !!