computer

क्राउन कॅप आणि ओपनरच्या शोधाचा १०० वर्षांपेक्षा जास्त जुना इतिहास!!

प्रत्येक पदार्थ घन, द्रव किंवा वायू या तीन स्वरुपांत आढळतो हे वाक्य आपण शाळेत असताना घोकलेले आठवत असेल. यांपैकी घनपदार्थ उचलून दुसरीकडे नेणं फारच सोपं असतं, पण द्रव आणि वायू पदार्थाची ने-आण करणं हे एकेकाळी माणसासमोरचं आव्हान होतं. सोड्यासारखे 'एरीएटेड ड्रिंक' हा प्रकार आल्यावर तर ही समस्या मोठीच झाली. कारण त्यात तर उच्च दाबाखाली द्रव पदार्थ दडपून ठेवलेला असतो. थोडी जागा मिळाली की फुस्स्स्स्स....! सगळी मजाच संपली की हो!!

बरं, हा प्रश्न सोड्यापुरताच मर्यादित नव्हता. बाटलीबंद बीअर इकडून तिकडे कशी पाठवायची हा तर मोठ्ठा आर्थिक व्यवहाराचा प्रश्न होता! जगभर बिअरची लोकप्रियता वाढत होती. बेंजामीन फ्रँकलीनच्या नावावर खपवले जाणारे हे वाक्य त्याची साक्ष देईल .

“Beer is proof God loves us and wants us to be happy.”

तर अशा ही गहन (!) समस्या सोडवण्यात एकेकाळी आख्खं जग गुंतलं होतं. शेकडो लोकांनी त्यांच्या कल्पना पेटंट करून ठेवल्या होत्या. पण कोणतीच कल्पना सोपी आणि व्यावहारीक नव्हती. एकूण हा प्रश्न सुटणारच नाही. बाटलीला बुच्चू लावून त्यावर लाखेसारखं काहीतरी चोपडून घट्ट सिलींग करणे हाच उपाय सर्वांना दिसत होता.

पण ही समस्या सोडवली विल्यम पेंटर नावाच्या एका गृहस्थाने! विल्यम पेंटर पोट भरण्याच्या एकमेव उद्देशाने आयर्लंडहून अमेरिकेत आला होता. त्याच्या कानावर ही समस्या पडल्यावर त्याने ते आव्हान स्वीकारून सोप्पा, स्वस्त, अगदी सहज वापरता येईल असा उपाय शोधला. तो म्हणजे क्राउन कॅप! आपल्या मराठीत क्राउन कॅप म्हणजे बिल्ला! मँगोला, कोका कोलाच्या बाटलीवरचा बिल्ला! हो, तोच बिल्ला जो एकेकाळी उन्हाळ्यातले पत्ते खेळताना आपले वापरायचे चलन होते!

अगदी छोट्या छोट्या गोष्टींचा पण शोध लावावा लागतो याचे उदाहरण म्हणजे हा धातूच्या पत्र्यापासून बनवलेला बिल्ला. धातूच्या चकतीला आकार देऊन, कडेला २४ दाते पाडून, बाटलीच्या वरच्या कडेवर घट्ट दाबून ठेवणारी टोपी हे पेंटरच्या क्राऊन कॅपचे डिझाईन होते. या क्राऊन कॅपचा शोध विल्यम पेंटरने १८९१ साली लावला. आज २०२० सालात पण त्या डिझाईनमध्ये काहीही फरक पडलेला नाही. एक बारीक फरक असा की बाटलीत भरलेल्या द्रवपदार्थाचा संपर्क धातूच्या झाकणाशी येऊ नये म्हणून बिल्ल्याच्या आत बुचाच्या लाकडाची पातळ चकती लावलेली असायची. आता ती चकती पातळ प्लॅस्टीकची असते. दुसरा महत्वाचा फरक म्हणजे विल्यम पेंटरच्या काळात बिल्ल्यावर रंगीत छपाई करण्याचे तंत्र नव्हते. आता प्रत्येक बिल्ल्यावर रंगीत छपाई असते. बाकी सगळे काही तसेच!

विल्यम पेंटरने शोध तर लावला. पण तो पेटंटद्वारे नोंदवून त्यातून कमाई करणे हे मोठे आव्हान असते. विल्यम पेंटर खरा डोकेबाज होता. त्याने पेटंट नोंदवताना हा बिल्ला उचकटून काढण्यासाठी एका वेगळ्या साधनाची आवश्यकता असते अशी नोंद केली आणि त्यातून आज आपण ज्याला 'ओपनर' म्हणतो त्या ओपनरसकट क्राउन कॅपचे पेटंट त्याला मिळाले.

यापुढची पायरी होती हे संशोधन कसे उपयुक्त आहे हे सिध्द करण्याची! त्याचे ग्राहक होते बीअर बनवणार्‍या ब्रुअरीज. पेंटरने त्यांच्या बीअरच्या बाटल्यांवर क्राऊन कॅप लावून त्या उत्तर अमेरिकेतून दक्षिण अमेरिकेत पाठवून दाखवल्या. ही सिध्दता झाल्यावर १९०६ नंतर जगात सर्वत्र विल्यम पेंटरच्या क्राऊन कॉर्क अँड सील कंपनीच्या फॅक्टर्‍या सुरु झाल्या. १९३० पर्यंत संपूर्ण जगात लागणारे बिल्ले विल्यम पेंटरच्या फॅक्टर्‍या बनवत होत्या.

तर ही झाली एका मामुलीशा वाटणार्‍या उत्पादनाची कथा!

आज किंवा उद्या जेव्हा तुम्ही ग्लासात फेसाळती बीअर ओताल तेव्हा आठवणीने चार थेंब विल्यम पेंटरच्या नावाने उडवायला विसरू नका!!

सबस्क्राईब करा

* indicates required