computer

गूगलच्या डूडलवर झळकलेली ही पोहणारी मुलगी कोण आहे? तिचं कर्तृत्व नक्कीच कौतुकास्पद आहे !!

गुगल भारी हुशार आहे. त्या-त्या देशाचं दिनविशेष पाहून कधी त्या देशापुरतं, तर कधी जागतिक स्तरावरचं डूडल बनवतं. या डूडल्समधून बरेचदा एखाद्या क्षेत्रात विशेष काम केलेल्या व्यक्तीला मानवंदना दिली जाते. २४ सप्टेंबरला गूगल इंडियावर डूडल झळकलं- एका पोहणार्‍या मुलगीचं!! ही पोहणारी मुलगी कोण? याचा शोध घेतलात तर कळेल की ती कोणी साधीसुधी पोरगी नव्हे, तर इंग्लिश खाडी पोहून जाणारी आशियातली पहिली महिला आहे. आरती साहा!!

इंग्लिश खाडी पोहणं हे प्रत्येक पट्टीच्या पोहणार्‍याचं स्वप्न असतं. ही खाडी पोहून पार करणं हे काही सोपं नाही. ही खाडी ४२ मैल म्हणजेच तब्बल ६७.५ किलोमीटर लांब आहे. इंग्लिश खाडी सुरू होते फ्रान्समधल्या cape gris nez नावाच्या ठिकाणापासून आणि ती संपते इंग्लंडमधल्या सँडगेट या ठिकाणी. म्हणजेच ही खाडी दोन देशांमधून जाते. माउंट एव्हरेस्ट चढणाऱ्या लोकांना जो मान मिळतो, अगदी तसाच मान इंग्लिश खाडी पोहून जाणाऱ्यांनासुद्धा मिळतो.

२४ सप्टेंबर १९४० साली कोलकाता येथे जन्मलेल्या आरती यांना तिथली हुगळी नदी जन्मापासूनच खुणावत असावी. कारण त्यांनी वयाच्या ५व्या वर्षीच पोहण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. १९५२साली फिनलँडमध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने स्वतंत्र झाल्यावर ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदा भाग घेतला होता. त्यावेळी भारताच्या ग्रुपचे नेतृत्व करणारी खेळाडू होती आरती साहा. केवळ १२ वर्षांची आरती साहा!!

आरती साहांनी यांनी पहिल्यांदा वयाच्या १८व्या वर्षी इंग्लिश खाडी पार करण्याचा प्रयत्न केला. पण तो अयशस्वी झाला. ठीक एका महिन्यानंतर त्यांनी दुसरा प्रयत्न केला. तो दिवस होता २९ डिसेंबर १९५९!! जबरदस्त उसळणाऱ्या लाटा आणि थंडगार पाणी यांच्यासोबत आरती साहांची तब्बल १६ तास २९ मिनिटं लढाई सुरू होती. शेवटी ही खाडी पार करत त्यांनी खाडी पार करणार्‍या पहिल्या आशियाई महिला बनण्याचा इतिहास रचला.

त्यानंतर एका मागोमाग एक भारतीयांनी इंग्लिश खाडी पार करण्याचा सपाटाच लावला. आरती साहा यांच्या आधी मिहिर सेन यांनी खाडी पार केली होती. पुढे अनिता सूद, राजीव गाडगीळ, आरती प्रधान, प्रभात कोळी, अमृता दास, कावेरी ठाकूर अशा लोकांनी इंग्लिश खाडी पार केली. आजवर थोड्याथोडक्या नाही, तर तब्बल ५१ भारतीयांनी इंग्लिश खाडी पार केली आहे.

या भारतभूमीमधल्या अशा अनेक क्षेत्रात देशाचं नाव उंचावणार्‍या व्यक्तीमत्वांना बोभाटाची मानवंदना!!

सबस्क्राईब करा

* indicates required