मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

विम्बल्डनच्या कोर्टवर गुजरातचा टॉवेल कसा पोहोचला?

2 मिनिट वाचन

विम्बल्डनच्या कोर्टवर खेळाडू वापरत असलेला प्रसिद्ध ख्रिस्ती टॉवेल हा ब्रिटनचा नसून गुजरातच्या वापी शहरात विणला जातो.

शेअर करा:
विम्बल्डनच्या कोर्टवर गुजरातचा टॉवेल कसा पोहोचला?

विम्बल्डनच्या कोर्टवर गुजरातचा 'टॉवेल': लंडनच्या विम्बल्डन कोर्टवर फायनलचा थरार सुरू आहे. जगातील सर्वोत्तम टेनिसपटू घामाने ओलाचिंब झालाय. तो विश्रांतीसाठी बाजूला जातो आणि खांद्यावर एक निळा-हिरवा टॉवेल घेतो. त्या टॉवेलवर 'ख्रिस्ती' (Christie) असं नाव मोठ्या अभिमानाने मिरवलं जातंय. बघणाऱ्याला वाटतं, हा अस्सल ब्रिटीश वारसा आहे. पण या टॉवेलच्या धाग्यांमध्ये गुजरातच्या वापी शहर दडलेले आहे, हे फार कमी लोकांना ठाऊक आहे.

सुमारे १५० वर्षांपासून मँचेस्टरची ओळख असलेला हा ब्रिटीश ब्रँड आता पूर्णपणे भारतीय झाला आहे. ज्या ब्रिटीशांनी भारतावर २०० वर्ष राज्य केलं, त्याच देशाच्या एका प्रतिष्ठित परंपरेचा ताबा भारताने तलवारीने नाही, तर धोरणी व्यवसायाने घेतलाय. विशेष म्हणजे, लंडनमध्ये कुणाला याची साधी चाहूलही लागली नाही.

२००६ मध्ये 'वेलस्पन' (Welspun) या भारतीय कंपनीने 'ख्रिस्ती'ला २९ दशलक्ष डॉलर्समध्ये विकत घेतले. त्यावेळी लंडनच्या कॉर्पोरेट जगात कोणतीही खळबळ उडाली नाही. ते केवळ एका बॅलन्स शीटवरचं नाव होतं. मात्र, २०१० पर्यंत मँचेस्टरमधील उत्पादन शांतपणे थांबलं आणि सर्व यंत्रणा गुजरातच्या वापीमध्ये हलवण्यात आली. लोगो तोच, रंग तेच, पण कारखाना आणि देश बदलला होता.

आज वेलस्पन २.७ अब्ज डॉलर्सची महाकाय कंपनी बनली आहे. ५० हून अधिक देशांमध्ये त्यांचे उत्पादन विकले जाते. नुकत्याच पार पडलेल्या विम्बल्डन २०२६ मध्येही प्रत्येक खेळाडूच्या खांद्यावर जो अधिकृत टॉवेल होता, तो गुजरातच्या फॅक्टरीत विणलेला होता. यावर्षीचा लाल आणि पांढऱ्या रंगाचा 'स्ट्रॉबेरी टॉवेल' चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरला.

नोव्हाक जोकोविच आणि कार्लोस अल्काराझ सारखे दिग्गज खेळाडू हे टॉवेल आठवण म्हणून घरी घेऊन जातात. आकडेवारी सांगते की, दरवर्षी हजारो टॉवेल्स खेळाडू स्वतःसोबत नेतात. वस्तुस्थिती अशी आहे की, ब्रिटीशांच्या या 'प्युअर हेरिटेज'वर आता भारताची मोहोर उमटली आहे.

एकेकाळी मँचेस्टरच्या कापडाने भारतीय बाजारपेठा काबीज केल्या होत्या. आज काळ बदललाय. भारताने कोणताही गाजावाजा न करता ब्रिटीश अभिमानाचा एक महत्त्वाचा हिस्सा आपल्या खिशात टाकला आहे. जागतिक बाजारपेठेवर मिळवलेली ही शांत पण प्रभावी पकड, बदललेल्या भारताची नवी ओळख करून देते. हा केवळ एका टॉवेलचा प्रवास नाही, तर आर्थिक सत्तेचे केंद्र कसं बदलतंय याचं जिवंत उदाहरण आहे.

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख