भेळपुरी बनवता आली नाही म्हणून ब्रिटिश अधिकाऱ्याने केला ब्रिटिश आचाऱ्याचा खून ?
मंडळी, आज आम्ही तुम्हाला भेळपुरीचा गमतीदार इतिहास सांगणार आहोत. या इतिहासाची कोणी फारशी दाखल घेतलेली नाही, पण त्याचं महत्व फार आहे. चला तर जाणून घेऊया हा इतिहास आहे तरी काय.
चुरमुरे, बटाटा, चिरलेला कांदा, शेव, मिर्च मसाला, चाट मसाला, कोथिंबीर, पुरी आणि वरून लिंबाचा रस... अहा !! लोक अशा या चटकदार पदार्थाच्या प्रेमात नाही पडणार तरच नवल. ब्रिटीशांच्या राजवटीत ब्रिटीश सुद्धा भेळपुरी पासून लांब राहू शकले नाही राव. त्याचाच हा किस्सा !!
युद्धाच्या काळात विल्यम हेरॉल्ड नावाच्या शेफला भारतात पाठवण्यात आलं होतं. हा शेफ त्याच्या हाताला असलेल्या अप्रतिम चवीसाठी प्रसिद्ध होता. भारतात आल्याबरोबर त्याने आपल्या हातांची जादू दाखवली. त्याच्या हातचे पदार्थ खाऊन एका मोठ्या अधिकाऱ्याने विल्यमला ‘पर्सनल कुक’ म्हणून नोकरी दिली.
एके दिवशी या बड्या अधिकाऱ्याने ‘भेळपुरी’ नामक भारतीय डिश चाखली आणि त्याच्या प्रेमातच पडला. अधिकाऱ्याने स्वतःसाठी व सर्व सैनिक छावणीसाठी विल्यमला अशीच डिश बनवण्याचा हुकुम दिला. विल्यम बिचाऱ्याला या डिश बद्दल काहीच माहित नव्हतं. तो बाजारात गेला आणि जिथे जिथे भेळपुरी मिळत होती तिथे तिथे त्याने चौकशी केली. पण झालं असं की प्रत्येक ठिकाणावर त्याला वेगवेगळी डिश मिळाली. कोणी भेळपुरी मध्ये बटाटे टाकत होतं तर कोणी नाही, कोणी अमुक मसाला घालत होतं तर दुसरा भलतंच काही करत होता. शेवटी विल्यम कंटाळला.
विल्यमने अधिकाऱ्याला येऊन सांगितलं की त्याला डिश मिळाली नाही. यावर अधिकाऱ्याला प्रचंड राग आला. त्याने खिश्यातून गन काढून विल्यम हेरॉल्डवर गोळी झाडली. विल्यम मेला !!
मंडळी, ही कथा इथेच संपत नाही. विल्यम हेरॉल्डने भारतात आल्याबरोबर आपल्या पदार्थांच्या जोरावर ब्रिटीश सैनिकांची माने जिंकली होती. सैनिक विल्यमचा आदर करायचे. विल्यमच्या मृत्यूची बातमी कळताच या सैनिकांनी संतापून विद्रोह केला. या अधिकाऱ्याच्या हुकुमशाही वर्तणुकीला सगळेच कंटाळले होते. याचा भडका उडण्यासाठी विल्यमचा मृत्यू कारणीभूत ठरला.
प्रातिनिधिक फोटो (स्रोत)
मंडळी, अशा प्रकारे आज गल्लोगल्ली मिळणाऱ्या भेळपुरीने एकेकाळी भारतात मोठा विद्रोह निर्माण केला होता !!