computer

काळ्या बाजारात माणसाच्या किडनी आणि रक्ताचा भाव काय आहे माहित आहे?

प्रत्येक वेळेला नवा आयफोन लाँच झाला की किडनी विकून एक आयफोन घेता येईल असे जोक्स सोशल मिडियावर यायला लागतात. पण खरंच किडनीची किंमत किती असते? मग इतर अवयवांची किती असते? डॉक्टर गरज नसताना ऑपरेशन करुन आपले काही अवयव काढून विकतात असं कधी ना कधी ऐकलेलं असतं. मग शरीरातला नक्की कोणता अवयव जास्त महाग आणि सगळ्यात स्वस्त असतो?? 

आम्ही थोडी शोधाशोध केली आणि काळया बाजारातले मानवी अवयवांचे दर आम्हांला सापडलेत. नाही, तुम्ही काळाबाजार करा किंवा तुमच्या शरीरातले अवयव विका असं आमचं म्हणणं नाही. तर, आपलं शरीर खूप मौल्यवान आहे त्याची काळजी घ्या असं आमचं बोभाटाच्या वाचकांना सांगणं आहे. 

आरोग्याकडे दुर्लक्ष करणारे लोक आपल्या आजुबाजूला बरेच दिसतात. त्यांना आयुष्याची, शरीराची किंमत कळत नाही.  मित्रांनो, जर तुमच्या शरीरातला एखादा अवयव कामातून गेला तर तो पुन्हा नैसर्गिक बनवणे खूप कठीण होऊन बसते. आणि पुन्हा आधीसारखे सशक्त व्हायला जो खर्च येतो तो पण प्रत्येकाला करणे शक्य असेलच असे नाही. म्हणूनच मंडळी, शरीरातील प्रत्येक अवयव महत्वाचा आहे आणि  म्हणूनच हा माणसाचे अवयव विकायचा हा काळाबाजार चांगला तेजीत आहे. तर जाणून घ्या मग आपलं शरीर किती मौल्यवान आहे ते..

1) हृदय

हृदयाबद्दल काय बोलावं मंडळी?  जोवर हृदयाचे ठोके चालू, तोवर जीवनाचे चक्र चालू!  एकदा का हे ठोके बंद पडले म्हणजे संपलं सगळं. मग अशा या हृदयाची किंमत किती महाग असेल याचा विचारच करायला नको.  तर हृदयाची काळ्याबाजारात किंमत आहे  सुमारे ८० लाख रुपये. 

2) केस

आजकाल टक्कल ठेवायची फॅशन असली तरी केसांचं महत्त्व काही कमी नाही.  ज्यांना केस नाहीत त्यांच्याइतकं  केसांचं महत्त्व दुसऱ्या कुणाला कळणार नाही.  अशा या केसांची किंमत असते १० इंचाला साडेचार हजार रुपये. 

3) रक्त

रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान हे आपण नेहमीच वाचतो. आणि ते खरंच आहे मित्रांनो. आजच्या धावपळीच्या जगात अपघातांचं प्रमाण वाढलंय आणि त्यामुळं रक्ताची गरजसुद्धा. रक्ताची एक पिशवी काळ्याबाजारात १७०० ते २२,००० रुपयांना मिळते. रक्तगट जेवढा दुर्मिळ, तेवढी तुमच्या रक्ताची किंमत जास्त!! म्हणून रक्तदान करताना नेहमी अधिकृत ठिकाणी करा आणि आवर्जून रक्तदान करा.

4) बोनमॅरो

बोनमॅरो हा शरीरातला महत्वाचा भाग आहे. हाडांच्या पोकळीत असलेल्या उती म्हणजे टिश्यूजना आपण बोनमॅरो म्हणतो. मांसाहारी लोक नळी फोडून आतलं जे खातात ते हेच! नवीन रक्तपेशी बनवणं, नवीन हाड, चरबी आणि कूर्चा म्हणजेच कार्टिलेज बनवण्यासाठी बोनमॅरो शरीरात असणं आवश्यक असतं.  एक ग्रॅम बोनमॅरोची बाजारात किंमत आहे तब्बल १६ लाख रुपये.

5) किडनी

कुणी गरीबीला कंटाळून किडनी विकायला निघाले, ॲपेंडिक्स सांगून  किडनीच काढली  अशा घटना आपण नेहमी वाचतो.  त्याचं एक कारण असं आहे की शरीरात दोन किडन्या असतात आणि एकीवर आपलं काम चालू शकतं, आणि दुसरं म्हणजे   किडनीला बाजारात मिळत  असलेला भाव!! जिवंत माणसाच्या एका किडनीला सव्वा ते दीड कोटीचा भाव मिळतो, तर मेलेल्या माणसाच्या किडनीला  जवळपास दहा लाख ते दीड कोटी असा भाव मिळतो. पुन्हा एकदा रक्तगट, त्यामुळं किडनी जुळणं वगैरे भानगडी असतात. जेवढं दुर्मिळ तेवढं महाग हे सूत्र आहेच. 

6) यकृत

लिव्हर म्हणजेच यकृत शरीरातली सर्वात मोठी ग्रंथी आहे. यकृत पित्ताची निर्मिती करतं. लिव्हर खराब झाल्यास बेवडे मरतात हे तर आपल्याला माहित आहेच.  तर लिव्हरची किंमत असते साधारण १ कोटी रुपये.

7) बुब्बुळ

बुब्बुळ डोळ्यातला महत्वाचा भाग असतो आणि म्हणून खूप महागसुद्धा आहे. बुब्बुळांची एक जोडी  जवळपास एक लाखात विकली जाते.

8) त्वचा

पांच इंद्रियांमधील एक म्हणजे त्वचा! या १ इंच त्वेचेची किंमत आहे, १५ ते २० हजार रुपये. प्लास्टिक सर्जरी वगैरेंसारख्या गोष्टीत ती लागतेच. 

9)डोक्यावरील कातडी म्हणजेच स्काल्प

स्काल्प म्हणजे आपली टाळू विकली जाते  साधारण ५० हजार रुपयांना. 

१०. कवटी

कवटी पण विकली जाते? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.  हो, कवटी विकली जाते साधारण ८५ हजार रुपयांना. 

 

पाह्यलंत मंडळी?  किती महाग अवयव आपल्याला फुकटात मिळाले आहेत! आपल्याला याचं महत्व कळायला पाहीजे. जर एकेक अवयव इतके महाग आहेत,  तर पुर्ण आयुष्य किती अनमोल असेल याचा विचार करा.   जीवन अमूल्य आहे आणि म्हणूनच जीवनावर प्रेम करा. ह माहिती आवडली असेल तर तुमचे मित्र सुद्धा शरीराबद्दल जागरूक होण्यासाठी हा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करा.

सबस्क्राईब करा

* indicates required