मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

तामिळनाडूच्या पोलिस दलाला लांच्छन लावणारे जयराज आणि बेनिक्स प्रकरण काय होते?

4 मिनिट वाचन
शेअर करा:
तामिळनाडूच्या पोलिस दलाला लांच्छन लावणारे जयराज आणि बेनिक्स प्रकरण काय होते?

या मालिकेत आम्ही भारत आणि जगभर झालेल्या, गाजलेल्या खूनखटल्यांचा मागोवा घेणार आहोत. ही घटना आहे आपल्याच देशातल्या तमिळनाडूमधली.

आपण देशभरातल्या वेगवेगळ्या खून आणि खटल्यांबद्दल बोभाटावर वाचले आहे. सर्वसाधारणपणे पोलिस कर्तव्यदक्षपणे तपास करतात आणि गुन्हेगारांना पकडतात. पण व्यक्ती तितक्या प्रकृती हे पोलिसदलालाही लागू पडते. काहीजणांचा अहंकार प्रसंगी निष्पांनाना अभय देण्याऐवजी त्यांच्याच विनाशास कारणीभूत होतो. आजचा हा लेख अशाच लोकांबद्दल आहे.

कायदा व सुव्यवस्था राखण्याची तसेच मालमत्तेचे रक्षणाची जबाबदारी पोलीस करतात. आवश्यक प्रसंगी बळाचा वापर करण्याचेही अधिकार त्यांना आहेत. पोलीसांमुळे आपण सुरक्षित आहोत ही भावना जनतेच्या मनात असते, परंतु रक्षणकर्ते जर जीवावर उठले तर? जयराज आणि बेनिक्स इमॅन्युएल या पितापुत्राच्या बाबतीत तसेच घडले आहे. तुरुंगात केलेल्या अमानुष छळामुळे त्यांचा मृत्यू झाला होता. नक्की काय आहे ही घटना, याबाबत आज आपण जाणून घेऊयात.

ही घटना तामिळनाडूच्या तुतीकोरीन जिल्ह्यात घडली. १९ जून २०२० ला रात्री ७:३० वाजता जयराजला(वय ५८) उपनिरीक्षक के. बालकृष्णन, निरीक्षक एस. श्रीधर, पोलिस हवालदार एम. मुथुराजा आणि इतर अधिकाऱ्यांनी कामराजर चौकातून उचलले. लॉकडाऊनच्या काळात त्यांनी दुकान जास्त वेळ उघडे ठेऊन नियम मोडला या कारणामुळे त्यांना अटक झाली होती. वडिलांना पोलिसांनी नेल्याची माहिती मिळताच त्यांचा मुलगा बेनिक्स(वय३१) याने लगेच सथानकुलम पोलिस ठाणे गाठले. उपनिरीक्षक के. बालकृष्णन वडिलांना मारहाण करत असल्याचे पाहून बेनिक्सने आपल्या वडिलांना अटक का करण्यात आली आणि त्यांच्यावर कारवाई का केली जात आहे याबद्दल प्रश्न विचारले. त्याच्या आक्षेपामुळे पोलीस संतप्त झाले आणि त्यांनी बेनिक्सलाही मारहाण करायला सुरुवात केली. बेनिक्सने स्वतःचा बचाव करण्यासाठी हवालदाराला दूर ढकलले तेव्हा आरोपी पोलिस अधिकारी अधिकच चिडले.

आरोपपत्रानुसार त्या रात्री पोलिसांनी दोघांना मारहाण केली. ही क्रूरता कित्येक तास चालली होती आणि मारहाणीची तीव्रता वाढावी म्हणून दोघांना विवस्त्र करून नितंबांवर, पाठीवर आणि शरीराच्या इतर भागांवर लाठीमार करून बेदम मारहाण करण्यात आली. दोघांना खूप जखमा झाल्या. जयराजने अधिकाऱ्यांना ब्लड प्रेशर आणि मधुमेहाचा त्रास असल्याने त्याला अधिक मारहाण करू नये अशी विनंतीही केली होती. त्यानंतर त्या दोघांना खाली सांडलेले रक्त स्वतःच्या कपड्याने साफ करायलाही लावले.

त्यांना जखमी झाल्यामुळे सोडण्यात आले आणि रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यांना तंदुरुस्त घोषित केले. पण प्रत्यक्षात त्यांचा रक्तस्त्राव थांबला नव्हता. त्यानंतर सथानकुलम पोलिसांनी जयराज आणि फिनिक्सच्या रिमांडसाठी दंडाधिकारी बी. सरवणन यांना संपर्क साधला. मॅजिस्ट्रेटने पिता-पुत्र दोघांना प्रत्यक्ष न पाहता रिमांडचा आदेश दिला. त्यांची अवस्था कशी आहे हे तपासलेही नाही. नियमानुसार ते तपासणे आवश्यक असते. काही दिवसांनंतर त्या दोघांचा रुग्णालयात मृत्यू झाला. तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांनी तक्रार केली. पोलिसांच्या अमानुष मारहाणीमुळे त्यांना अंतर्गत रक्तस्त्राव झाला आणि मृत्यू झाला असे त्या तक्रारीत म्हणले होते.

या दोघांच्या मृत्यूचा राज्यभर अनेक कामगार संघटना, राजकीय संघटना, कार्यकर्त्यांनी निषेध केला.तुतीकोरीनमध्ये व्यापाऱ्यांनी दुकान बंद केले, आठवडाभर निदर्शने केली. या दोघांच्या मृत्यूशी संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी सेलिब्रिटींनीही सोशल मीडियावर केली आहे. तामिळनाडूच्या अनेक भागांमध्ये निदर्शने झाली.

हे प्रकरण सीबीआय कडे गेले. त्यांनी तपास सुरू केला. त्यांनी मद्रास उच्च न्यायालयात अहवाल सादर केला. त्यात म्हटले होते की सथानकुलम लॉकअपच्या भिंती, शौचालय, एसएचओच्या खोलीतून आणि लाठीमारातून गोळा केलेले डीएनए नमुने जयराज आणि बेनिक्स यांच्या नमुन्यांशी जुळणारे होते. फॉरेन्सिक अहवालातही पोलिस अधिकार्‍यांनी क्रूर छळ केला असल्याचे सिद्ध झाले.

त्यानंतर १० पोलीस अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली. अटक झाल्यानंतर एक आरोपी पल्थुराई या एसएसआयचा कोविडमुळे मृत्यू झाला. इतर पोलिसांना कोठडी झाली. या वादग्रस्त प्रकरणामुळे पोलिसांनी दिलेल्या वागणुकीबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित केले. काही पोलिसांच्या वागणुकीमुळे सर्व दलाला लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

शीतल दरंदळे

संबंधित लेख