‘जॉन्सन अँड जॉन्सन’ला तब्बल ५६,९६३ कोटीचा दंड का भरावा लागणार आहे?
‘जॉन्सन अँड जॉन्सन’ कंपनी आता एका नवीन वादात अडकली आहे. फिलाडेल्फिया येथील एका ग्राहकाने जॉन्सन अँड जॉन्सनवर खटला दाखल केलेला आणि ग्राहकाने हा खटला जिंकलेला आहे. भरपाई म्हणून जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीला तब्बल ५६,९६३ कोटी रुपये भरण्यास सांगण्यात आलंय.
काय आहे प्रकरण ?
जॉन्सन अँड जॉन्सन कंपनी रिस्पेर्डल नावाचं अँटीसायकोटिक (प्रतिजैविक) औषध विकते. हे औषध मनोविकारांसाठी दिलं जातं. या औषधाच्या दुष्परिणामांमुळे पुरुषांमध्ये स्तन वाढतात ही महत्वाची सूचना कंपनीने दिलीच नाही. या कारणाने निकोलस मरे नावाच्या ग्राहकाने कोर्टात धाव घेतली. निकोलसने यापूर्वी पण अशाच एका प्रकरणात कंपनीवर खटला भरला होता. त्यावेळी पण कोर्टाने निकोलसच्या बाजूने निकाल दिला होता.
(रिस्पेर्डल)
निकोलसला ऑटिझम स्पेक्ट्रम डिसॉर्डर आहे. या कारणाने डॉक्टरांनी त्याला रिस्पेर्डल घ्यायला सांगितलं होत. निकोलस म्हणतो की जेव्हा पासून त्याने ही औषधं घ्यायला सुरुवात केली तेव्हापासून त्याच्यात स्तनांची वाढ झाली आहे.
‘फिलाडेल्फिया कोर्ट ऑफ कॉमन प्लीज’ या कोर्टात हा खटला चालला. जॉन्सन अँड जॉन्सनला निकालाची रक्कम प्रमाणापेक्षा बाहेर वाटत आहे. त्यांना पूर्ण आत्मविश्वास आहे की ही रक्कम कामी होईल किंवा पूर्णपणे माफ केली जाईल.
(फिलाडेल्फिया कोर्ट ऑफ कॉमन प्लीज)
मंडळी, या खटल्याचा अंतिम निकाल काय लागतो आणि जॉन्सन अँड जॉन्सनला खरंच निकोलसला ५६,९६३ कोटी रुपये द्यावे लागतायत का हे आता बघण्यासारखं असेल.
तसं पाहायला गेलं तर जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीवरचा हा पहिलाच खटला नाही. गेल्या काही वर्षांपासून या कंपनीचे एकेक घोटाळे उघड होत आहेत. गेल्याचवर्षी हिप ट्रान्सप्लान्ट मधल्या घोटाळ्यामुळे त्यांच्यावर प्रत्येक रुग्णाला २० लाख रुपये भरपाई देण्याची वेळ आली होती. याविषयी सविस्तर वाचण्यासाठी आमचा खालील लेख वाचा.