२ वर्षापूर्वी हरवलेली कार चक्क पोलीस अधिकाऱ्याकडेच सापडली? कुठे घडलाय हा प्रकार ?
एखाद्याची हरवलेली किंवा चोरी झालेली वस्तू अनेक दिवसांनी/वर्षांनी सापडल्याच्या बातम्या तुम्ही ऐकल्याच असतील. अशा हरवलेल्या गोष्टी परत सापडण्यासाठी नशीबच लागतं. आज आम्ही जी घटना सांगणार आहोत तीही अशाच एका अजब योगायोगाचा भाग आहे.
कानपुरचे ओमेंद्र सोनी यांची कार दोन वर्षांपूर्वी चोरी झाली होती. सर्व्हिस स्टेशनमधूनच ही कार चोरी झाली होती. तब्बल दोन वर्षांनी या कारचा पत्ता लागला आहे. पण ह्या कथेत एक ट्विस्ट आहे. ही कार ज्यांच्याकडे सापडली आहे ते चक्क एक पोलीस अधिकारी आहेत.
झालं असं की कार हरवण्यापूर्वी ओमेंद्र सोनीने केटीएल कार सर्व्हिसिंग सेंटरकडून कार दुरुस्त करून घेतली होती. त्यामुळे त्याची सगळी माहिती केटीएल कार सर्व्हिसिंग सेंटरकडे साठवलेली होती. नुकताच ओमेंद्रला केटीएल कार सर्व्हिसिंग सेंटरकडून फोन आला. केटीएल कार सर्व्हिसिंग सेंटरला काहीच दिवसापूर्वी ओमेंद्रची कार दुरुस्त केल्याबद्दल प्रतिक्रिया हवी होती, पण कार तर ओमेंद्रकडे नव्हती. इथेच मेख आहे. याचवेळी ओमेंद्रच्या डोक्यात ट्यूब पेटली आणि त्याला समजलं की त्याची कार अजूनही सुस्थितीत आहे. त्याने सर्व्हिस सेंटर गाठलं. तिथे गेल्यावर त्याला समजलं की त्यांची कार कौशलेंद्र प्रताप सिंह या पोलीस अधिकाऱ्याने नेली आहे.
ओंमेंद्र सोनी यांची कार चोरी झाल्यावर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती, पण त्यांची कार काही सापडली नाही. आता कौशलेंद्र प्रताप सिंह यांना विचारले असता ते सांगत आहेत की, ही कार त्यांना सिज केलेल्या गाड्यांमध्ये टाकून दिलेल्या अवस्थेत सापडली होती. पण गाडी केव्हा सापडली ही गोष्ट मात्र ते सांगत नाहीत. सीज केलेली कार वापरणे हा गुन्हा आहे.
या घटनेने यूपी पोलिसांना मात्र चांगलीच लाज आणली आहे. स्वतः पोलीस असे करत असतील तर लोकांनी अपेक्षा तरी कुणाकडून धरायच्या?