एक राजा, एक ब्रिटिश, आणि एक राजज्योतिषी -५
टेलर बरीच वर्षे शोरापुरात राहिला. तिथलाच झाला.दरम्यान वेंकटाप्पा मोठा झाला.राणीने मधल्या काळात प्रियकर बदलला.नवा प्रियकर आला.त्याचाही बंदोबस्त टेलरने खुबीने केला.पुढे राणीलाही ब्रिटिशांनी वटहुकूम काढून मोकळे केले.डोळ्यात पाणी आणून राणीने राजवाडा सोडला.तिच्यासाठी मेणा बाहेर तयार होता.त्यात बसून तिने राजवाडा कायमचा सोडला.खरं म्हणजे त्या वेळी वेंकटाप्पानेही सुटकेचा निःश्वास सोडला.त्यालाही आई राजवाड्यात नकोशी झाली होती.
वेंकटाप्पा राज्यकारभार करू लागला. टेलरला तो मान देत असे.पण आता टेलर समजून चुकला की आप्पा म्हणत धावणारा राजा वेगळा होता.वेंकटाप्पाचा यथावकाश विवाह झाला.त्याचा विवाह तो सात वर्षांचा असतानाच ठरलेला होता.त्याची पाच वर्षांची वधूही टेलरने एका समारंभात पाहिली होती.वेंकटाप्पाला नंतर तीन बायका होत्या.आता त्याला मद्याचेही व्यसन लागले. सत्तेचा मद त्याच्या व्यक्तिमत्त्वात भिनत गेला.
या दरम्यान, टेलरची बदली झाली. टेलरने शोरापूर संस्थान सोडले. वेंकटाप्पा आता खराखुरा राजा झाला होता.
१८५७ ची लढाई
वेंकटाप्पा आणि इंग्रज यांचे नंतर खटकतच गेले. १८५७ चा तो सुमार.इंग्रजांविरुद्ध एक सर्वत्र प्रवाह वाहत होता.त्यात शोरापूर संस्थानाने एक इंग्रज सल्लागार,मोठ्या पगारावर ठेवावा असा फतवा इंग्रजांनी काढला.हा फतवा वेंकटाप्पाने नाकारला.त्याचे कारण झाले. तेढ वाढत गेली.काही संस्थाने वेंकटाप्पाला पाठिंबा देऊ लागली. वेंकटाप्पा शूर होता. तो युद्धाला सामोरा गेला.शोरापूरला वेढा पडला. लढाई भडकली. शोरापूरची हार निश्चित झाली तसा वेंकटाप्पा शोरापूरमधून पळाला.हैदराबादजवळ इंग्रजांनी त्याला अटक केली. राजद्रोहाचा आरोप. वेंकटाप्पाला फाशीची सजा सुनावली गेली. हे कळताच टेलर वेंकटाप्पाकडे आला. मला फाशी देऊ नका. मला तोफेच्या तोंडी द्या. अशी मागणी वेंकटाप्पाने केली. टेलरने त्याला समजावले. इंग्रजांशी गाठीभेटी केल्या. धावपळ केली. टेलरच्या शब्दामुळे आणि त्याच्या प्रयत्नांमुळे फाशी रद्द झाली. तिच्या जागी जन्मठेप आली. पण टेलरला जन्मठेपही कमी करायची होती. तेही टेलरने केले. त्याची जन्मठेप रद्द होऊन त्या जागी फक्त चार वर्षांची सजा करण्यात आली. वेंकटाप्पा २३ वर्षांचा होता. चार वर्षांनी सजा संपल्यावर तो पुन्हा शोरापूरचा राजा होऊ शकेल यालाही इंग्रजांनी मान्यता दिली. हे समजल्यावर वेंकटाप्पाच्या बायका नाचू लागल्या.
पण, चोविसावा वाढदिवस उजाडला नाही
शेवट गोड होतोय असे दिसू लागले. पण तसे झाले नाही. वेंकटाप्पाला चार वर्षांच्या शिक्षेसाठी किल्ल्यात न्यायचे ठरले होते.त्याच्या बायकाही तिथे राहतील हे मान्य करण्यात आले होते. किल्ल्यात नेण्याचा प्रवास सुरू होणार. त्या दरम्यान एका खोलीत एकटा बसलेला असताना वेंकटाप्पाचा विचित्र मृत्यू झाला. त्याच्या पोटात गोळी गेली होती. रक्तबंबाळ स्थितीत तो जमिनीवर पडला होता. इंग्रजांचे म्हणणे आहे की त्याने आत्महत्या केली. तो म्हणे खोलीत एकटा होता. त्याचा शिपाई त्याचे पिस्तूल (की बंदूक ?) खोलीत ठेवून शौचास गेला होता.त्याच शस्त्राने पोटात गोळी झाडून घेऊन वेंकटाप्पाने आपले तेवीस वर्षांचे आयुष्य संपवले.चोवीस वर्षे पूर्ण केली असती तर कदाचित टेलरने ते भयंकर भविष्य खोटे ठरल्याची बातमी त्याला सांगितली असती. पण तसे झाले नाही. काहींचे म्हणणे आहे की ब्रिटिशांनी त्याला मारले. पण जर ब्रिटिशांनी त्याला मृत्युदंड माफ केला होता,जन्मठेप माफ केली होती, तर ब्रिटिश त्याची हत्या का करतील, असा प्रश्न निर्माण होतो.
टेलर म्हणतो की ती आत्महत्या असूच शकत नाही.तो वेंकटाप्पाला लहानपणापासून पाहत आला होता.वेंकटाप्पाचा स्वभाव त्याला माहीत होता.टेलरच्या मते वेंकटाप्पाला कोणतीही गोष्ट दिसली की ती हाताळण्याची सवय होती.त्या शिपायाची बंदूक त्याने हाताळून पाहिली असणार,आणि त्याच दरम्यान गोळी झाडली जाऊन तो अपघात झाला असे मत टेलरने आत्मचरित्रात व्यक्त केले आहे.
नेमके काय झाले होते
नेमके काय झाले होते, हे आजही रहस्य आहे. योगायोग, हेच खरं.
ही सत्यकथा आहे. इतिहास हा असा घडला. टेलर १८७६ साली वारला. त्यावेळी त्याचे आत्मचरित्र प्रकाशित झाले नव्हते. १८७३3 ते १८७५ ह्या काळात टेलरने आत्मचरित्र लिहिले असा अंदाज आहे. त्याच्या मुलीने ते मरणोत्तर प्रकाशित केले. वेंकटाप्पाचा मृत्यू हा ज्योतिषशास्त्राच्या झाडावर नियतीचा कावळा बसला आणि फांदो कडाडली अशा प्रकारचा आहे. योगायोग ह्या खात्यात त्याला टाकायला हवे. दोष ना झाडाचा आहे, ना कावळ्याचा. फांदी तुटली हे मात्र खरं.
लेखक-माधव शिरवळकर