computer

'तू फक्त हो म्हण, मी तुला आय.पी.एस. होऊन दाखवतो' म्हणणारा माणूस आज कुठे पोहोचलाय पाहा !!

मंडळी आजवर तुम्ही गरीब घरातून येऊन आय.पी.एस.झालेल्या, कमी टक्के असूनही आय.पी.एस.झालेल्या मुलांची गोष्ट वाचली असेल. पण आज आम्ही थोडी वेगळी आणि तेवढीच भन्नाट गोष्ट सांगणार आहोत. चला तर मग आपल्या गर्लफ्रेंडला दिलेल्या वचनासाठी आय.पी.एस. झालेल्या मुलाची गोष्ट पाहूया...

मूळचे मध्यप्रदेशचे असलेले मनोज शर्मा २००५ च्या बॅचचे आय.पी.एस.आहेत. सध्या ते मुंबईत पश्चिम विभागात अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. मनोज ११ वी पर्यंत कॉपी करून पास झाले होते. पण बारावीच्या पेपरांना त्यांना कॉपी करता आली नव्हती, अर्थातच तिथे ते नापास झाले. म्हणूनच त्यांच्यावर लिहिल्या गेलेल्या पुस्तकाचे नाव पण '12th फेल' असे आहे. 

ते सांगतात की १२वी नंतर टायपिंगचे क्लास करून कुठेतरी लहानमोठी नोकरी करू असा विचार केला होता. पण बारावी नापास झाल्यामुळे त्यांचे ते स्वप्न भंगले. त्यावेळी तिथल्या कलेक्टरने कॉपीचे प्रकार बंद केले होते. ज्या आय.पी.एस. अधिकाऱ्यामुळे आपण १२ वी पास होऊ शकलो नाही, त्याच्याएवढेच पॉवरफुल आपण बनून दाखवू असा निश्चय त्यांनी केला. 

नंतर ते ग्वालियरला आले. तिथे मंदिराच्या बाहेर झोपणाऱ्या भिकाऱ्यांसोबत झोपून त्यांनी दिवस काढले. त्यावेळी त्यांच्याकडे खायचे सुद्धा पैसे नव्हते. पुढे त्यांना लायब्ररीयनची नोकरी मिळाली आणि  खाण्याचा प्रश्न मिटला. पण अजूनही बरीच संकटे समोर उभी होती. 

लायब्ररीयनची नोकरी करताना मनोज शर्मांचे वाचन चालूच होते. तिथे त्यांनी अब्राहम लिंकनसारख्या महान लोकांची चरित्रे वाचली आणि आपण यांच्यासारखे का बनू शकत नाही हा विचार करून ते जोरात अभ्यासाला लागले. पण १२ वी नापासचा शिक्का काही केल्या पाठ सोडत नव्हता. अशातच ते एका मुलीच्या प्रेमात पडले. १२ वी नापास मुलाला ती का हो म्हणेल या विचाराने त्यांची तिला विचारण्याची हिंमत होत नव्हती. 

पुढे ते दिल्लीला आले. दिल्लीला राहण्याचा खर्च खूप असतो. तो प्रश्न त्यांनी लोकांच्या कुत्र्यांची निगा राखण्याचे काम करून सोडवला.  दिल्लीत एका कोचिंगचे शिक्षक विकास दिव्यकीर्ती यांनी त्यांची परिस्थिती बघून त्यांना फ्री ऍडमिशन दिले. आणि ते पहिल्याच प्रयत्नात पूर्वपरीक्षा पास झाले. दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रयत्नाच्या वेळी प्रेमात पडल्याने ते पूर्वपरिक्षाही पास झाले नाहीत. चौथ्या प्रयत्नामध्ये पूर्वपरिक्षा पार पडली पण मेन्समध्ये इंग्लिश चांगली नसल्याने अडचणी येत होत्या. मग ते इंग्रजीच्या मागे लागले आणि इंग्रजीवर पण त्यांनी प्रभुत्व मिळवले.

आता त्यांच्या आयुष्याने मोठा टर्न घेतला. ज्या मुलीवर त्यांचे प्रेम होते तिला त्यांनी सांगितले की 'तु फक्त हो म्हण, मी तुला आय.पी.एस. होऊन दाखवतो'. त्यांना त्या मुलीने होकार कळवळा आणि ते आणखीनच जोरात अभ्यासाला लागले. अशा पद्धतीने ते चौथ्या प्रयत्नात आय.पी.एस. झाले.

"प्यार सबकुछ सीखा देता है" हा तद्दन फिल्मी डायलॉग मनोज शर्मांच्या बाबतीत एकदम खरा ठरलाय. तुमचंही असं काही वेगळं प्रेरणास्थान आहे का? असेल आम्हांलाही कळू द्या की ती गोष्ट!!

 

लेखक : वैभव पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required