सातवेळा मरणाच्या दारातून हा माणूस कसा वाचला? याला सुदैवी म्हणावं की दुर्दैवी, तुम्हीच ठरवा..
“माझ्याच सोबत असं का घडतं ?” असं कधी तुम्हाला वाटलंय का ? जर कधी तुम्हाला वाटलं असेल की मी जगातला सगळ्यात दुर्दैवी माणूस आहे, तर जरा ‘फ्रॅन सेलाक’ यांच्याबद्दल जणून घ्या. हे महाशय जगातील सर्वात दुर्दैवी माणूस म्हणून ओळखले जातात. पण त्यांच्या आयुष्याकडे बघितल्यावर समजेल, हे तर सर्वात सुदैवी आहेत.
काय आहे त्यांची गोष्ट ?
‘फ्रॅन सेलाक’ हे गृहस्त १९६२ पर्यंत अत्यंत सुखी होते. त्यांनंतर त्यांच्या दुर्दैवाला सुरुवात झाली. झालं असं की, ते ट्रेनने प्रवास करत होते आणि ट्रेन नदीत कोसळली. ट्रेन मधले १७ प्रवासी ठार झाले. पण एकटे फ्रॅन मात्र वाचले. हे महाशय पोहत तीरावर पोहोचले. अपघातात त्यांचा हात मात्र दुखावला गेला. जिवंत वाचले तेच काय कमी आहे.
ही तर सुरुवात होती भाऊ. ष्टोरीला आता कुठे सुरुवात झाली होती.
पुढच्याच वर्षी १९६३ साली ते एका विमानातून जात होते. त्या विमानाचा अपघात झाला आणि १९ जण मारले गेले. फक्त फ्रॅन एकटेच एका गवताच्या गंजीवर जिवंत आढळले. त्यांचे डोळे उघडले तेव्हा ते हॉस्पीटल मध्ये होते.
१९६६ रोजी ते एका बस मधून प्रवास करत होते आणि अर्थातच बसचा अपघात झाला. ४ जण ठार झाले. इथे सुद्धा बस एका नदीत कोसळली. यावेळी पण ते पोहून नदीतून बाहेर आले आणि वाचले.
पुढील जवळजवळ ४ वर्ष निवांत, सुखात गेली. कोणताही अपघात झाला नाही, त्यांचा साधा पायाचा अंगठाही कुठे धडकला नाही. पण हा तर इंटरव्हल होता ना भाऊ.
१९७० साली दिवस स्वच्छ होता, ते आपल्या कार मधून जात होते. आणि अचानक कारच्या इंधनाच्या टाकीत स्फोट झाला. कारला आग लागली. इथे सुद्धा ते कसेबसे बाहेर पडले. पुन्हा १९७३ साली अशाच एका कार अपघातातून ते वाचले. एका खराब इंधन पंपांमुळे त्यांच्या कारला आग लागली. या आगीत त्यांना काही झालं नाही पण केसांचा बळी गेला. त्यांच्या डोक्यावरचे सगळे केस जळाले.
पुढे पुन्हा एक मोठा इंटरव्हल आला. २२ वर्ष काहीच घडलं नाही. मग १९९५ साली त्यांना एका बसने धडक दिली. पण त्यांना अगदी थोडा मार लागला. पुढच्याच वर्षी १९९६ रोजी ते एका डोंगरी भागावर आपली कार घेऊन गेले होते की त्यांना एका ट्रकने जोरदार धडक दिली. धडक देण्यापूर्वीच ते कार मधून बाहेर पडले होते. दुसऱ्याच क्षणी मोठा स्फोट होऊन त्यांची कार जळून खाक झाली. एका सेकंदाचा फरक आणि ते जिवंत वाचले.
७ वेळा दुर्दैवाशी सामना झाल्यानंतर २००३ साली अचानक त्यांचं नशीब फळफळलं. त्यांना तब्बल ८,००,००० लाख युरोची लॉटरी लागली. त्यांनी लॉटरीच्या पैशातून एक घर आणि बोट विकत घेतली. या दरम्यान त्यांनी पाचवं लग्न केलं होतं.
२०१० साली त्यांनी आपले पैसे नातेवाईक, मित्र आणि गरजूंना देऊन टाकले. पुढे त्यांना एकाही दुर्दैवाने गाठलं नाही. हॅपी एंडिंग !!!
७ वेळा मृत्युच्या तोंडाशी जाऊन हा माणूस सुखरूप परतला. आता तुम्हीच सांगा, हा माणूस सतत कोणत्याना कोणत्या अपघातात सापडला म्हणून दुर्दैवी म्हणायचा की त्याच अपघातातून जिवंत वाचला म्हणून सुदैवी ??