computer

प्रोजेक्ट MK Ultra - ४ : जाणून घ्या MK-Ultraने जगाला कसे व्यसनाच्या दरीत लोटले!

प्रोजेक्ट MK Ultra-१: माणुसकी शब्दाला कलंक अशा सीआयएच्या अघोरी कारस्थानाची कथा!!

प्रोजेक्ट MK Ultra-२: भेटा CIA च्या अमानुष एमके अल्ट्राला जन्म देणाऱ्या अॅलन डलेसला !!

प्रोजेक्ट MK Ultra-३: काळ्या विद्येचा जादूगार सिडनी गॉटलीबने केले लोकांवर अमानुष रासायनिक प्रयोग!!

स्वर्गलोक- पाताळलोक या शब्दांवर तुमचा विश्वास आहे की नाही आम्हाला माहित नाही. पण जिवंतपणी  एकाचवेळी स्वर्ग आणि पाताळ लोक दाखवणारे रसायन म्हणजे एलएसडी! प्रोजेक्ट एम.के.अल्ट्रच्या निमित्ताने हे मनाच्या अस्तित्वाला टिचून टाकणारं रसायन सीआयएने अमेरिकेत आणलं खरं, पण त्यामुळे येणार्‍या पिढीच्या आयुष्याचे काय होईल याचा विचार त्यांनी केला नाही. त्याचे कारण एकच- एलएसडीसारखे अंमली पदार्थ वापरून मूळ मानवी मनाला नष्ट करून त्या जागी सीआयएच्या आज्ञा आणि सूचना मुकाट पाळणारे मन त्यांना निर्माण करायचे होते. जे हिप्नॉटीझम म्हणजे संमोहन शास्त्रालाही जमणार नाही, वापरायला सोपं असेल असं हे रसायन बनवलं कोणी? कसं ?आणि का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या भागात आपण वाचणार आहोत. 

पूर्वसूत्र :

अमेरिकेची देशाबाहेर काम करणारी गुप्तहेर संघटना म्हणजे सीआयए. त्यांनी त्यांचं काम करताना आजवर बरीच अमानुष कामंही केली. त्यातली ही आमची कथामालिका म्हणजे सीआयएच्या अघोरी आख्यानातला एक अध्याय आहे. गरज भासल्यास अमेरिका आपल्या नागरिकांचा पण बळी देते याची साक्ष देणारं हे प्रकरण आहे. या कथेत अनेक खलनायक आहेत. त्यांच्या कथा आपण एकानंतर एक आपण वाचणार आहोत 'बोभाटा'च्या प्रोजेक्ट एमके अल्ट्रा या मालिकेतून! ही मालिका बर्‍याच भागात आम्ही सादर करणार आहोत,  कारण ही कथा तशीच गुंतागुंतीची आहे.

हा सीआयएचा एमके अल्ट्रा प्रोजेक्ट माणुसकीच्या नजरेतून पाह्यला तर अमानुष होता. या प्रोजेक्टद्वारे लोकांवर बरेसचे बेकायदेशीर असे प्रयोग केले गेले. एखाद्याच्या मेंदूचा किंवा मनाचा ताबा घेऊन त्याला आपले गुन्हे कबूल कसे करायला भाग पाडेल अशी औषधं आणि कार्यपद्धती शोधणं हे प्रोजेक्ट एम के अल्ट्राचं काम होतं. १९५३ मध्ये या प्रोजेक्टला मंजुरी मिळाली तरी तो खरा चालू झाला ते १९७३मध्ये. बेकायदेशीर असल्याने अमेरिकेने या प्रोजेक्टची माहिती लपवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, पण तरी अगदी २०१८पर्यंत त्याबद्दल काही माहिती उजेडात येत गेली. पण अशा प्रकारचा हा जगातला पहिला प्रयोग नव्हता. बोभाटा हा प्रयोगाची मंजुरी, त्याचे दुष्परिणाम, अमेरिकेने हे सगळं कसं लपवायचा प्रयत्न केला, त्यामध्ये कोण सामील होते, त्यांच्या भूमिका काय होत्या हे सर्व आपल्यासमोर या मालिकेद्वारे आणत आहे.

आधी म्हटल्याप्रमाणे या पदार्थाचे रासायनिक नाव 'लिसर्जीक अ‍ॅसीड डायएथीलअमाइड' असे आहे. त्याचे वर्गीकरण 'एर्गोलाइन अल्कलॉइड' असे केले जाते. यापैकी 'अल्कलॉइड' या शब्दाचा वापर चरस, गांजा, अफू यांसारख्या अंमली पदार्थाच्या अभ्यासात केला जातो. अल्कलॉइड हा शब्द सर्वसाधारणपणे वनस्पतीपासून निर्माण झालेल्या रसायनांच्या रेणूंच्या साखळीसाठी वापरला जातो. या सर्व अल्कलॉइड पदार्थात एक सामान्य गुण असतो, तो म्हणजे हे पदार्थ सेवन करणार्‍याला या पदार्थांची सवय लागते. वर उल्लेख केलेल्या मादक पदार्थात अल्कलॉइड असतेच. साध्या कच्च्या सुपारीत पण अल्कलॉइड असते. त्यामुळेच सुपारी चघळण्याचा नाद लागला की सहज सुटत नाही. आता एर्गोलाइन हा शब्द का जोडला गेला ते पण बघू या. एर्गॉट ही एक प्रकारची बुरशी आहे. शास्त्रीय परिभाषेत त्याला 'फंगस' असे म्हणतात. या बुरशीपासून जे बनवले जाते 'एर्गोलाइन अल्कलॉइड'!

बुरशीपासून मिळणार्‍या एर्गोलाइन अल्कलॉइडचा वापर प्राचीन काळापासून माणसाला माहिती आहे. त्या काळात अडलेल्या बाळंतीणीची सुटका करण्यासाठी सुईणी याचा वापर करायच्या. स्नायूंचे आकुंचन हा त्याचा गुणधर्म अशा रितीने वापरला जायचा. आधुनिक काळात एलएसडी या रसायनाची निर्मिती १९३८ साली सँडोझ या कंपनीच्या प्रयोगशाळेत अल्बर्ट हाफमन या रसायनशास्त्रज्ञाने केली.

(अल्बर्ट हाफमन)

आश्चर्याची गोष्ट अशी की या रसायनाच्या गुणधर्माबद्दल अल्बर्ट हॉफमन यांनाही माहित नव्हते. प्रयोगांच्या दरम्यान चुकून हे रसायन हाफमनच्या पोटात गेलं. तेव्हा त्याला या रसायनाच्या सायकेडेलीक इफेक्टची म्हणजे मनावर परिणाम करून संभ्रमाच्या दुनियेत नेण्याच्या गुणाची प्रचिती आली. त्यानंतर स्वतःवर प्रयोग करण्याच्या उद्देशाने २५० मायक्रो ग्रॅम म्हणजे अक्षरश: कणभर एलएसडी त्याने खाऊन बघितले. इतक्या सूक्ष्म प्रमाणात खाऊनही त्याला जे अनुभव आले ते अपेक्षेच्या पलीकडचे होते. सँडोझ ही औषधे निर्माण करणारी-विकणारी कंपनी आहे. त्यांनी एलएसडीला औषधाचा दर्जा देऊन १९४७ साली त्याचे व्यापारीकरण केले. 'मनाच्या सर्व विकृतीवर औषध' असा त्याचा प्रचार करण्यात आला. मनछिन्नता, आत्यंतिक मरगळ, लैंगिक विकृती, गुन्हेगारी वृत्ती या सर्वांवर एकच रामबाण उपाय म्हणून एलएसडी बाजारात विकले गेले. 

पण या दरम्यान एलएसडीसोबत इतर अनेक रसायनांचाही वापर करण्यात आला. डोनाल्ड इवीन कॅमेरॉन नावाच्या डॉक्टरने तर अमेरिकेबाहेर म्हणजे मॉंट्रिअल(कॅनडा)ला जाऊन जे प्रयोग केले त्यात कितीजण आपली स्मृती घालवून बसले याची काही नोंदच नाही. 

नंतरच्या काळात एलएसडीचा औषध हा दर्जा सर्वच देशांत नामंजूर करण्यात आला. पण तोपर्यंत या धुंद करणार्‍या औषधाचा वापर समाजात राजरोस सुरु झाला होता. आल्डस हक्सले, टिमोथी लिअरी आणि अनेक नामवंत लेखक विद्वांनांनी त्याचा 'अध्यात्मिक आणि सर्जनशील' म्हणून उदोउदो केला आणि अमेरिकेत एक नशेबाज पिढी जन्माला आली. या पिढीला बरबाद केलं एलएसडीने आणि नंतर यातूनच अंमली पदार्थांच्या व्यापाराचा जन्म झाला. अमेरिकन सामाजिक संस्कृती नशेच्या आधीन करण्याचे काम सीआयएने केले.

आपल्याकडे जशी देवाच्या नावाची यादी असते तशी अनेक नावं जन्माला आली.  सगळ्यांचा एकच अर्थ नशा. आयुष्याला संपवणारी पण तरीही हवीहवी अशी नशा. 
अ‍ॅसीड, डॉट, विंडोपेन , ब्लॉटर, डोज, गोल्डन ड्रॅगन, पर्पल हार्ट, येलो सनशाईन, टॅब, लूनी टून, अशी हजारो नावं जन्माला आली. नशेतून जन्माला आलेल्या संगीताचा एक नवा पायंडा अमेरिकेत जन्माला आला. या संगीताला सायकेडेलीक म्युझिक असे नाव मिळाले. त्यातलंच एक म्हणजे  बिटल्सचं Lucy in the sky with diamonds हे गाजलेलं गाणं! या गाण्यात पण बघा LSD लपलेलं आहे. बिटल्सच्या अनेक गायकांनी हे कबूल केलं की हे गाणं LSD च्या नशेतूनच जन्माला आलेलं आहे.

याच दरम्यान भारतासारख्या देशातही नशेबाज पिढी जन्मालायायला सुरुवात झाली. आपल्या चित्रपटांत, फिल्मी गाण्यातही त्याचे पडसाद ऐकू यायला लागले.

संसार की हर शय का इतना ही फ़साना है
एक धुँध से आना है, एक धुँध में जाना है

यासारखी गाणी लिहिली जाऊ लागली. नंतरच्या काळात आलेल्या 'हरे राम हरे कृष्ण' या  चित्रपटातले झीनत अमानचे 'म मारो दम' हे गाणे त्यावर्षीचे बिनाकाचे एक नंबरचे गाणे झाले होते. मूठभर लोकांच्या हातात अनिर्बंध निर्णय घेण्याची परवानगी दिली जाते तेव्हा त्याचे परिणाम जगात सर्वत्र कसे पोहोचतात त्याचे हे उत्तम उदाहरण आहे.

प्रोजेक्ट एमके अल्ट्रामध्ये वापर करण्याच्या निर्णयामुळे एलएसडी अमेरिकेत पोहचले. अप्रत्यक्षरित्या येणार्‍या अनेक पिढ्या बरबाद करण्याचे श्रेय पण स्टॅनली गॉटलीबकडे जाते हे सत्यच आहे. सँडोझकडून सगळा साठा २,४०,००० डॉलर्स देऊन विकत घेतल्यावर त्याचा वापर अनेकवेळा, अनेक ठिकाणी, जाणूनबुजून, परिणामांची पर्वा न करता सीआयएने केला. या प्रयोगात कितीजणांचे जीव गेले याच्या नोंदी कुठेच ठेवण्यात आल्या नाहीत, किंबहुना त्या नोंदी नष्ट करण्यात आल्या. या सर्व प्रयोगांना सबप्रोजेक्ट नंबर देण्यात आले होते. त्यापैकी एक विकृत प्रयोग म्हणजे सब प्रोजेक्ट 'मिडनाइट क्लायमॅक्स'!!

LSD चे इतके पुराण वाचल्यावर वाचकांचे डोके गरगरायला लागले असेल म्हणून आज इथेच थांबूया.  

यानंतरच्या भागात आपण वाचणार आहोत तो किळसवाणा सब प्रोजेक्ट ' मिडनाइट क्लायमॅक्स'! वाचत राहा, प्रश्न विचारत राहा, कारण या सत्यकथेचे अनेक भाग अजून उलगडायचे आहेत.

सबस्क्राईब करा

* indicates required