आई तारी त्याला कोण मारी...जीव धोक्यात घालून आईने वाचवला चिमुरड्याचा जीव !!!
लेकराचा जीव संकटात पडल्यावर आई काहीही करून मुलाला वाचवते. मग त्यासाठी स्वतःचा जीव गेला तरी बेहत्तर. या विधानाला अधोरेखित करणारी घटना आरे कॉलनीतील ‘चाफ्याचा पाडा’ या ठिकाणी घडली. २० मार्च रोजी ‘प्रमिला रिंजाड’ या रात्री काही कामानिमित्त घराबाहेर पडल्या होत्या. त्यांचा ३ वर्षांचा मुलगा प्रणयही त्यांच्या मागे येत होता. हे प्रमिला यांना माहित नव्हते. अश्यातच अंधारात दाबा धरून बसलेल्या बिबट्याने प्रणयवर झडप घातली. मागून प्रणयचा ओरडण्याचा आवाज ऐकू आल्यानंतर प्रमिला यांनी बिथरून न जाता प्रसंगावधान दाखवत बिबट्यावर सर्व शक्तीनिशी झडप घातली. अचानक झडप घातल्याने बिबट्या प्रणयला तिथेच सोडून पळून गेला आणि प्रणयचे प्राण वाचवण्यात प्रमिला यांना यश आले.
प्रणयसाठी प्रमिला यांनी आरडाओरडा केला. पण रात्र खूप असल्याने कोणीही मदतीला येणं कठीणच होते. या प्रसंगानंतर प्रणयला ताबडतोब हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले. बिबट्याच्या दातांमुळे प्रणयला जखमा झाल्या होत्या.
अश्या बाक्या प्रसंगी दाखवलेल्या प्रमिला रिंजाड यांच्या हिमतीला सर्व स्थरातून दाद दिली जात आहे. बोभाटाचाही या शूर आईला सलाम!!