computer

वर्दीतील मदर टेरेसा....या महिला पोलीस कॉन्स्टेबलने कर्तव्याच्या पलीकडे जाऊन केलेलं काम कौतुकास्पद आहे!!

पोलिसांचे कार्य काय असते हे तर आपल्या सर्वांनाच माहित असेल. पोलिसांच्या खड्या पहाऱ्यामुळेच कायदा सुव्यवस्था नांदत असते. पण काहीवेळा पोलीस अधिकारी आपल्या रोजच्या जबाबदाऱ्यांच्या पलीकडे जाऊन समाजासाठी काहीतरी करून जातात. अशा पोलिसांचा सर्व समाजाला अभिमान असतो. आज आम्ही अशाच एका महिला पोलीसाची गोष्ट सांगणार आहोत ज्यांनी आपल्या कर्तव्याच्या पलीकडे जाऊन नवीन उदाहरण निर्माण केले आहे.

पोलिसांना खूप पगार असतो अशातला भाग नाही. मोठ्या शहरांमध्ये तर आहे त्या पगारात भागवणे कठीण असते. अशाही परिस्थितीत मुंबई पोलीस दलातील कॉन्स्टेबल रेहाना शेख यांनी मात्र थेट ५० मुलांना दत्तक घेत त्यांचा दहावीपर्यंतचा सर्व खर्च करण्याचा निर्धार केला आहे.

रेहाना यांना गेल्यावर्षी रायगड येथील एका शाळेची माहिती मिळाली. त्यांना कळाले की तिथल्या मुलांना पैशाअभावी अडचणींचा सामना करावा लागत असतो. ही मुले गरीब कुटुंबातील होती. त्यांना चपलांसारख्या मूलभूत गोष्टी देखील मिळत नव्हत्या. हे पाहून रेहाना यांच्या मनाला पाझर फुटला. त्यांनी आपल्या पगारातून या मुलांसाठी काही रक्कम जमा करायला सुरूवात केली. त्यांनी दत्तक घेतलेल्या मुलांची संख्या ही ५० आहे. त्यांच्या १० वी पर्यंतच्या शिक्षणाचा सर्व खर्च त्या करणार आहेत. याआधी कोरोना काळात पण त्यांनी अनेकांना मदत केली होती. प्लाझ्मा पुरवण्यापासून ते ऑक्सिजन, रक्त, बेड्सची व्यवस्था अशा सर्व प्रकारच्या गरजेच्या गोष्टींसाठी त्यांनी मदतीचा हात पुढे केला होता.

रेहाना शेख यांच्या या कामाची दखल घेत मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी त्यांचा सत्कार केला आहे. कॉन्स्टेबलची नोकरी करताना इतक्या मोठ्या कालावधीसाठी मदत करण्याचा निर्णय घेणे ही मोठी गोष्ट आहे. आपल्या या पावलाने त्यांनी माणुसकीचे मोठे उदाहरण समोर ठेवले आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required