computer

मोसादने घेतलेल्या एका सूडनाट्याचा थरारक प्रवास.. हल्ल्याचा सूड कसा घ्यायचा याचं ज्वलंत उदाहरण !!

बदला ही अशी मिठाई आहे जी शांतपणे वर्षानुवर्ष खातखात एन्जॉय करायची असते.

अशा एका सुडाची कहाणी म्हणजे “ऑपरेशन रॅथ ऑफ गॉड”.  आपल्या हिंदी सिनेमामध्ये एक डायलॉग असतो बघा, “चुन चुन के मारुंगा” हाच डायलॉग इस्राएलने खरा करून दाखवला होता. चला तर मग बघूयात काय होती ती घटना…

इसवी सन १९७२! स्थळ म्युनिक, जर्मनी.  जगभरातील खेळाडू म्युनिक शहरात ऑलिम्पिक खेळांसाठी जमले होते. खेळांचे उदघाटन होऊन एक आठवडा लोटला होता आणि सर्व काही व्यवस्थित पार पडत होते. पण कुणालाच कल्पना नव्हती की एका घटनेमुळे ५ सप्टेंबर १९७२ ही तारीख खेळांच्या इतिहासातील एक काळा अध्याय म्हणून ओळखली जाईल.

या दिवशी आठ आगंतुकांनी ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये प्रवेश केला. त्यांनी ट्रॅकसूट घातला होता त्यामुळे सर्वांना वाटले की ते खेळाडूच आहेत. पण ते खेळाडू नसून ते होते खतरनाक दहशतवादी संघटना ‘पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन’ चे सदस्य! ते सगळेजण ‘ब्लॅक सप्टेंबर’ नावाच्या एका भयानक मिशनवर होते.  हे अतिरेकी सरळ इस्राएलचे खेळाडू थांबलेल्या इमारतीत शिरले आणि त्यांनी गोळीबार सुरू केला. दोन खेळाडू तिथेच मृत्युमुखी पडले व अकरा इस्रायली खेळाडू बंधक बनवले गेले. बाहेर ही बातमी फुटताच खळबळ माजली!

या अतिरेक्यांनी अशी मागणी केली की अकरा ओलीस खेळाडूंच्या बदल्यात इस्राएल तुरुंगात बंद असलेले २३४ पॅलेस्टिनी नागरिक सोडले जावेत. त्या वेळी पंतप्रधानपदी विराजमान होत्या कणखर आणि बुलंद व्यक्तिमत्वाच्या गोल्डा मायर. त्यांनी सरळसरळ ही मागणी “शक्य नाही” एवढ्या दोनच शब्दात धुडकावून लावली.  तोपर्यंत या घटनेची बातमी संपूर्ण जगात पसरली होती आणि सर्व जगाचे लक्ष गोल्डा मायर हे प्रकरण कसे हाताळतात याकडे लागले होते. एकीकडे मायर यांनी अतिरेक्यांना नकार कळवला. आजही इस्राईलचं तेच धोरण आहे, “अतिरेक्यांशी वाटाघाटी कधीच नाही.”  मात्र दुसरीकडे जर्मनीशी संपर्क साधून म्युनिकमध्ये स्पेशल फोर्सेस पाठवण्यासाठी विनंती केली. परंतु ही विनंती जर्मनीने मान्य केली नाही.

अतिरेक्यांनी एक नवीन अट ठेवली की, आम्हाला विमान उपलब्ध करून द्या. ते खेळाडूंना घेऊन जाणार होते. ही मागणी मात्र जर्मनीने मान्य केली. या मागे असा हेतू होता की, इमारतीचा आसरा सोडून अतिरेकी विमानतळावर मोकळ्या जागी येतील आणि त्यांना तिथे मारणे सोपे जाईल. हा उद्देश ठेऊन विमानतळावर व्यूहरचना केली गेली. अनेक स्नायपर्स म्हणजे बंदुकीने लांबूनच अचूक वेध घेणारे शरपशूटर्स  तैनात केले गेले. स्नायपर्सनी एक एक अतिरेकी टिपायला सुरुवात करताच अतिरेकी भडकले आणि त्यांनी सगळ्या ओलीस खेळाडूंना गोळ्या घालून ठार केले. विमानतळावर सर्व खेळाडू आणि काही अतिरेकी संपले!

इथून सुरू झाला एका सूडनाट्याचा थरारक प्रवास. अतिरेकी संपले असले तरी हा प्लॅन बनवणारे, त्यांना माहिती आणि पैसे पुरवणारे, कोणत्या ना कोणत्या प्रकारे या ऑपरेशनमध्ये हातभार लागलेले लोक जिवंत होते. इस्राएल हा देश हाताची घडी बांधून शांत बसणाऱ्यांपैकी नव्हता, आणि आताही नाही. गोल्डा मायर यांनी तातडीने आपली सिक्रेट एजन्सी ‘मोसाद’ सोबत मिटिंग घेतली आणि तिथेच निर्णय झाला ब्लॅक सप्टेंबरचा बदला घेण्याचा! या ऑपरेशनचे नाव ठेवले गेले रॅथ ऑफ गॉड अर्थात, देवाचा प्रकोप!

या घटनेनंतर अवघ्या दोनच दिवसात इस्रायली सैन्याने अक्षरशः आकाशातून आग ओकली.  सीरिया आणि लेबनॉन येथील पॅलेस्टाईन लिबरेशनच्या दहा ठिकाणांवर बॉम्बहल्ल्याचा वर्षाव केला.  तब्बल २०० अतिरेकी आणि नागरिकांना यमसदनी पाठवले.

पण एवढ्यावर थांबतो तो इस्राएल कसला? सूड आणखी बाकी होता.

परत एकदा गोल्डा मायर, मोसाद आणि इस्राएलचे सैन्याधिकारी यांची बैठक झाली. या बैठकीत असे ठरले की ब्लॅक सप्टेंबर संबंधित जे जे लोक आहेत त्यांना जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून शोधून काढायचं आणि खलास करायचं! या कामासाठी काही खास सिक्रेट एजंट निवडले गेले. या एजंट्सना ऑपरेशनची पूर्ण कल्पना दिली गेली. त्यांना घर सोडून कित्येक वर्षे दुसऱ्या देशात वेगळ्या नावाने राहून हे काम करायचे होते. पकडले गेले तर? तर जीव जाणार हे नक्कीच!

(मोसाद मिटिंग/टीम)

(म्युनिक सिनेमातला सीन.)

मंडळी, या लोकांचे देशप्रेम बघा.  आपल्या देशासाठी प्राण अर्पण करण्यास सैनिक सदैव तत्पर असतात याचेच हे उदाहरण आहे. भारत असो वा इस्राएल, ज्या देशात असे वीर सैनिक आहेत त्या देशातील सामान्य नागरिक म्हणूनच सुखाने जगू शकतात. इथून थोडीथोडकी नाही, तर पुढची २० वर्षं अनेक देशांत ‘रॅथ ऑफ गॉड’ सुरूच होते. पहिला नंबर लागला तो वेल जवेटर आणि महमूद हमशारी यांचा.

वेल जवेटर (स्रोत)

(महमूद हमशारी)

सिक्रेट एजंटसनी त्यांना अस्मान दाखवले. यामुळे पॅलेस्टाईन लिबरेशनमध्ये खळबळ माजली. दुसरा नंबर लागला सायप्रस देशामध्ये हुसेन अल बशीर याचा. हा हुसेन हॉटेलमधल्या खोलीत थांबला असताना सिक्रेट एजंटनी याच्या बेडखाली बॉम्ब लावला होता. हुसेन बेडवर झोपल्याक्षणी बॉम्बचा धमाका झाला. नंतर बैरुतच्या प्रोफेसर बासिल अल कुबेसीला गोळ्या घालण्यात आल्या. हा बासिल अतिरेक्यांना शस्त्र पुरवीत असे. मोसादच्या दोन एजंट्सनी बारा गोळ्या याच्या शरीरात घुसवल्या.

आता पुढचे टारगेट होते लेबनॉनमध्ये कडक सुरक्षेत राहत असलेल्या तीन व्यक्ती. त्यांच्यापर्यंत पोहोचणे फारच अवघड काम होते म्हणून यांच्यासाठी स्पेशल रणनीती आखली गेली. या ऑपरेशनचे नाव ठेवले ‘स्प्रिंग ऑफ युथ’. या कामासाठी काही खास कमांडो लेबनॉनमध्ये समुद्रमार्गे दाखल झाले. मोसादच्या सिक्रेट एजंट्सनी त्यांना टार्गेटच्या जवळ नेले. हे कमांडो स्त्रियांच्या वेशात असल्याने कुणाला जास्त संशय आला नाही. पूर्ण तयारीने आलेल्या कमांडोजनी इमारतीवर हल्ला चढवला आणि ऑपरेशन फत्ते करून ते आलेल्या मार्गे परत गेले सुद्धा

या हल्ल्यानंतर लगेच आणखी तीन धमाके केले गेले. सायप्रसमध्ये जाइद मुसाचीला बॉम्बने उडवला, तसेच ब्लॅक सप्टेंबरमध्ये सामील असलेले दोन अल्पवयीन युवक कारहल्ल्यात कायमचे जखमी केले गेले.

जगभरात वेचून वेचून अतिरेकी मारले जात होते. पण हा सुडाचा प्रवास थांबणार होता काय? नाही! हा खुनी खेळ तोपर्यंत थांबणार नव्हता जोपर्यंत मोसादने बनवलेल्या लिस्टमधले प्रत्येक नाव या जगातून कायमचे नाहीसे होणार नव्हते.

२८ जून १९७३ला मोहम्मद बाऊदियाला कारसकट उडवले,

१५ डिसेंबर ७३ ला दोन पॅलेस्टिनी अली सालेम आणि अब्दुल इब्राहिम यांना सायप्रसमध्ये गोळ्या घातल्या,

१७ जून १९८२ ला पॅलेस्टाईन लिबरेशनचे आणखी दोन जेष्ठ सदस्य इटलीमध्ये मारले गेले,

२३ जुलै ८२ मध्ये अधिकारी फादल दानीची पॅरिस येथे हत्या केली गेली,

(फादल दानीची हत्या)

२१ ऑगस्ट ८३ ला अथेन्स येथे ममून मराएल खलास झाला,

१० जून ८६ ग्रीसमध्ये लिबरेशनचा महासचिव खालिद अहमद,

ऑक्टोबर ८६मध्ये मुंजार अबू गजाला,

१४ फेब्रुवारी ८८ला आणखी दोन पॅलेस्टिनी..

हळू हळू लिस्टमधील एक एक नाव कमी होत होते.

आता नंबर होता ब्लॅक सप्टेंबरचा मास्टरमाइंड अली हसन सालामेह याचा! या अली हसनला मोसादने एक कोडनेम दिले होते… द रेड प्रिन्स! आपला शोध मोसाद घेत आहे याची पूर्ण कल्पना अली हसनला होती म्हणून त्याने स्वतःच्या सुरक्षेचा कडक बंदोबस्त करून ठेवला होता. याला शोधण्यात मोसादला तीन वेळा यश आले. एकदा स्वित्झर्लंड, तर दुसऱ्यांदा स्पेनमध्ये अली वर हल्ला केला गेला. मात्र तो त्यातून वाचला होता. तिसऱ्यांदा मात्र वाचू शकला नाही. बैरुतमध्ये कार धमक्यात शेवटी याला आकाशात पाठवण्यात मोसादला यश आलेच!

(अली हसन सालामेह)

 ऑपरेशन रॅथ ऑफ गॉड जवळपास वीस वर्ष चालले. कित्येक सिक्रेट एजंट्सनी आपल्या ध्येयासाठी आणि देशप्रेमापोटी आपले घर दार सोडून फक्त मिशनकडे लक्ष दिले. ब्लॅक सप्टेंबर संबंधित प्रत्येक व्यक्तीला जगाच्या पाठीवर जिथे असेल तिथे शोधून ठार मारले गेले. पन्नासच्या वर पॅलेस्टिनी अतिरेकी गतप्राण झाले.

दहशतवादाचा सूड असाही घेतला जातो..पण सूड का घ्यायचा या बद्दल गोल्डा मायरचे विचार बहुमोल आहेत.

“केवळ सूडासाठी सूड नव्हे,  तर आम्ही देखील सशक्त आहोत हा संदेश पोहोचवण्यासाठी सूड घ्यावा लागतो.”

शस्त्राघाता शस्त्रच उत्तर
भुई न देऊ एक तसूभर
मरू पुन्हा अवतरू
जिंकू किंवा मरू....

 

कसा वाटला लेख? आवडला असेल तर शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा.

सबस्क्राईब करा

* indicates required