खुद्द न्यायाधीशांनी याचे १०० तुकडे करावे अशी शिक्षा दिलेला १०० मुलांचे खून करणारा पाकिस्तानी सिरियल किलर जावेद इक्बाल!
आजवर तुम्ही भारतातल्या आणि इतर देशांतल्याही सिरियल किलर्सबद्दल बोभाटावर वाचलं असेल. गुन्हे करणे हे तसेही एखाद्या वंश, भाषा, देश आणि धर्माशी निगडित नाही. ही एक वृत्ती आहे आणि ती जगातल्या कुणातही असू शकते. आज आम्ही लेख घेऊन आलोय पाकिस्तानातल्या एका सिरियल किलरवर. इतर देशांतल्या किलर्ससारखा हा ही तितकाच निर्दयी आहे.
एखादा गुन्हा करण्यामागे गुन्हेगाराची वृत्ती किती नीच असू शकते? याची प्रचिती जावेद इक्बाल या गुन्हेगाराविषयी वाचून येईल. पाकिस्तानी नराधम जावेद इक्बाल याने अशा काही निघृण हत्या केल्या आहेत की हे वाचल्यावर अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही. याला माणूस म्हणावे की पशू असा प्रश्न पडेल इतक्या घृणास्पद हत्या याने केल्या आहेत. आणि त्या हत्या कोणाच्या? तर कोवळया वयातल्या मुलांच्या! याने फक्त हत्याच नाही, तर त्या लहान मुलांवर लैंगिक अत्याचार ही केले आहेत. त्याच्या या कृत्याने संपूर्ण पाकिस्तान हादरुन गेला होता. त्याने असे का केले? कसे केले ही पूर्ण घटना आजच्या या लेखात पाहूयात.
१९५६ साली जन्मलेल्या जावेद इक्बाल हा ८ भावंडांपैकी सहावा. वडिलांनी शिक्षणासाठी त्याला गव्हर्मेंट इस्लामिया कॉलेजमध्ये दाखल केले. राहायला चांगला बंगला दिला. पण याने तिथे अभ्यास सोडून बाकीचेच धंदे केले. धंद्यासाठी त्याने व्हिडीओ गेम पार्लर चालू केले, तिथे लहान मुले गेम खेळायला जमत. त्यांच्याशी गोड बोलून तो लगट करू लागला. १०-१५ वर्षाच्या लहान मुलांना ते कळायचे नाही. आकर्षित करण्यासाठी तो मुलांना कमी पैशांत व्हिडिओ गेम खेळायला देत असे. एकदा मुले जमा झाली की तो स्वतःची शंभर रुपयाची नोट जमिनीवर टाकत असे. कोण मुलगा उचलतोय का याची वाट पाहत असे. एखाद्या मुलाने नोट उचलली की तो त्याला आत नेत असे. बाकी सगळ्यांना नोट शोधायला सांगत असे. आतल्या मुलावर लैंगिक अत्याचार करत असे आणि याची वाच्यता त्या मुलाने कुठे करू नये म्हणून त्याला तेच शंभर रुपये देत असे. लवकरच शेजारच्यांना हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी मुलांना व्हिडिओ गेम खेळण्यासाठी पाठवणे बंद केले. नंतर इक्बालने व्हिडिओ गेम सेंटर बंद करून त्याऐवजी एक मत्स्यालय सुरू केले. तिथेही हेच धंदे केले. पुढे त्याने जिमही सुरू केली. लहान मुले, तरुणांना आकर्षित करण्यासाठी त्याने हे प्रकार केले. पण एवढेच करून तो थांबला नाही. त्याचे नाव बाहेर येई ल या भीतीने तो त्या लहान मुलांना अमानुषपणे मारू लागला.
त्याने अनाथ आणि रस्त्यावरच्या मुलांना पकडले. त्यांना तो लाहोरमधल्या स्वतःच्या घरी घेऊन जायचा आणि त्यांच्यावर बलात्कार करून गळा आवळून त्या मुलांचा खून करायचा. पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांच्या शरीराचे छोटे छोटे तुकडे करायचा आणि ते तुकडे ऍसिडमध्ये जाळायचा. त्यानंतर राहिलेले कपडे किंवा वस्तू तो शेजारच्या नदीमध्ये फेकून द्यायचा. असे एक दोन-खून नाही, तर तब्बल १०० मुलांचे खून त्याने केले. आणि तेही अगदी थंड डोक्याने! ही सर्व मुले ६ ते १६ या वयोगटातील होती.
पोलिसांना गुंगारा देत त्याने १०० मुलांवर लैंगिक अत्याचार, हत्या आणि त्यांच्या मृत्यूनंतर मृतदेहाचे तुकडे करून जाळले. पोलीस त्याचा मागोवा घेण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत होते, पण अखेरीस जावेदनेच स्वतःच गुन्हा कबूल करायचे ठरवले. तशा आशयाचे एक पत्र त्याने पोलिसांना आणि स्थानिक वर्तमानपत्रांना पाठवले. त्यात त्याने केलेल्या सहा ते सोळा वयोगटातील शंभर मुलांचा बलात्कार आणि खून याचा उल्लेख होता. या मुलांचा खून कसा केला याबद्दलही त्याने लिहिले होते. आधी अपहरण, बलात्कार, मुलांच्या शरीराचे केलेले लहान लहान तुकडे आणि त्यावर केलेला ऍसिडचा मारा या सगळ्या गोष्टी होत्या. त्याने हे सुद्धा कबूल केले की रावी नदीत बुडून आत्महत्या करण्याचाही त्याने प्रयत्न केला, परंतु तो प्रयत्न असफल ठरला.
पोलिसांनी लगेच त्याच्या घरावर छापा घातला. तिथे गेल्यावर सर्व घरात रक्ताचे डाग सापडले. फरशी आणि भिंती रक्ताने माखून गेल्या होत्या. मुलांना गळा आवळण्यासाठी वापरलेली चैन तिथे होती. मारलेल्या सर्व मुलांचे फोटो आणि त्यांची नावे व्यवस्थित लेबल करून ठेवलेली सापडली. डिसेंबर १९९९ साली तो स्वतःहून एका वर्तमानपत्राच्या ऑफिसमध्ये हजर झाला. तिथे आल्यावर तो म्हणाला, "मी जावेद इक्बाल, १०० मुलांचा खुनी. मी केलेल्या कृत्याची मला अजिबात लाज वाटत नाही. मी मरायला पण तयार आहे, कारण मला या पूर्ण जगाची चीड येते. मी पैशांसाठी हे सगळं केले नाही. मी कदाचित ५०० मुलांनाही मारू शकलो असतो, परंतु मी शंभर मुलांना मारण्याची प्रतिज्ञा केली होती. म्हणून मी फक्त तेवढ्याच मुलांचा जीव घेतला. मला या गोष्टीचा अजिबात पश्चात्ताप होत नाही." त्याची सर्वत्र वाच्यता व्हावी म्हणून तो वर्तमानपत्राच्या ऑफिसमध्ये गेला.
पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याने असे का केले हे विचारले असता त्याने जे कारण सांगितले ते अजून धक्कादायक होते. त्याने सांगितले हे घृणास्पद कृत्य म्हणजे त्याला पोलिसांकडूनच भूतकाळात मिळालेल्या क्रूर वागणूकीचा बदला होता. १९९० मध्ये जेव्हा तो विशीत होता तेव्हा एका तरुण मुलाच्या बलात्काराची केस त्याच्यावर होती. तो खोटा आरोप असूनही लाहोर पोलिसांनी त्याला अटक केली . त्याच्या आईने त्याला सोडवण्यासाठी प्रयत्न केले होते, पण ते शक्य झाले नाही आणि त्या धक्क्यातच ती हृदय विकाराच्या झटक्याने जग सोडून गेली. काही काळाने इक्बाल सुटला, पण मनात पोलिसांविषयी प्रचंड राग होता. त्यांच्यामुळेच त्याची आई गेली म्हणून बदला घेण्यासाठी हे क्रौर्य करायचे ठरवले.
जावेद इक्बालला कोर्टातून शिक्षा मिळाली. मुलांना ज्याप्रकारे मारले तसेच त्यालाही मारण्यात यावे असे न्यायाधीशांनी सुनावले. परंतु शिक्षा होण्यापूर्वीच आठ ऑक्टोबर २००१ मध्ये इक्बालने जेलमध्ये बेडशीटने गळफास घेऊन आत्महत्या केली. संपूर्ण पाकिस्तानला हादरवून टाकणारे हत्याकांड बराच काळ चर्चेत राहिले.
शीतल दरंदळे