computer

परमवीरचक्राचे पराक्रमी - भाग ९: शत्रुसैन्याला पुरून उरलेले लान्स नायक करमवीर सिंग!!!

१३ ऑक्टोबर १९४८. ही ती तारीख आहे जेव्हा पाकिस्तानने तिथवालच्या रिचमार गल्लीतून हल्ला करत भारतीय सेनेला मागे ढकलण्याचा प्रयत्न केला. पण तिथे उपस्थित असलेल्या शीख रेजिमेंटच्या एका जवानाने त्यांचे प्रयत्न हाणून पाडले.

पाकिस्तानने एकामागे एक करत तब्बल ८ वेळा हल्ला केला पण पठ्ठ्याने त्यांना एकदाही पुढे सरकू दिले नाही. लान्स नायक करमवीर सिंग असे त्या सैनिकाचे नाव!! १९४८ साली त्यांच्या या शौर्याबद्दल त्यांना परमवीर चक्र देऊन सन्मानित करण्यात आले होते.

भारत आणि पाकिस्तान असे दोन देश निर्माण झाल्यावर पाकिस्तानने काश्मीरमध्ये कुरापात्या करण्यास सुरूवात केली होती. याच संघर्षात पाकिस्तानी सैन्याने भारतीय सैन्याच्या तुकडीवर हल्ला करण्यास सुरूवात केली. 

भारताकडून सडेतोड उत्तर दिले जात होते. १८ मार्च १९४८ रोजी झंगर पोस्टवर तिरंगा फडकवून करम सिंग यांनी शत्रूला परत जाण्याचा स्पष्ट संदेश दिला, पण सुधरेल तो पाकिस्तान कसला. त्यांनी कुपवाडा सेक्टरवर हल्ला केला, पण इथे देखील त्यांना मार पडला.

शेवटी चिडून त्यांनी १३ ऑक्टोबर १९४८ रोजी मोठ्या ताकदीने हल्ला केला. त्यांना काहीही करून रिचमार गल्ली जिंकायची होती. त्याठिकाणी करम सिंग यांच्या नेतृत्वाखाली शीख रेजिमेंटची तुकडी उभी होती. शत्रुसैन्याला एक दोन नाहीतर ७ वेळा चांगलाच मार पडला. एवढे मोठे हल्ले करून देखील हा पठ्ठ्या दरवेळी आपली जिरवतो हे बघून पाकिस्तानने करम सिंग यांना लक्ष करण्याचे ठरवले.

एकट्या करमसिंग यांच्यावर मोठा गोळीबार सुरू झाला. करम सिंग मात्र तुफान लढत होते. करम सिंग यांच्याकडे बघून असे वाटत होते की हा माणूस एकटा नाहीतर पूर्ण पलटणीची ताकद एकट्यात एकवटून लढत आहे. प्रचंड जखमी अवस्थेत ते स्वतः लढून आपल्या सहकाऱ्यांना देखील हिंमत देत होते.

शत्रूंनी ग्रेनेड्सचा हल्ला सुरू केला होता, पण त्यांचा हा ८ वा हल्ला देखील वाया गेला. करम सिंग यांनी त्यांना मार देत मागे ढकलले. करम सिंग यांच्या शौर्यामुळे पाकिस्तान पुढे सरकू शकला नाही. त्यांच्या या वीरतेचा सन्मान देशाने त्यांना परमवीर चक्र पुरस्कार देऊन केला.

सबस्क्राईब करा

* indicates required