computer

फोटो स्टोरी: जीव वाचवणाऱ्या या जगप्रसिद्ध चुंबनदृश्यामागची खरी गोष्ट!

फोटोग्राफर्सचं जग फार रोमांचकारी असतं. कधीकधी त्यांच्याही नकळत अशी काही दृश्य टिपली जातात की पुढे जाऊन त्यांची इतिहासात नोंद होते. हिटलरला सलाम न ठोकणाऱ्या माणसाचा फोटो असेल किंवा आईनस्टाईन आजोबांनी खोडकरपणे जीभ बाहेर काढलेला फोटो किंवा त्याहीपेक्षा चे गेव्हेरा या क्रांतिकारकाचा जगप्रसिद्ध फोटो असेल, हे सर्व फोटो नकळतपणे आणि अगदी सहजपणे टिपले गेले होते, पण आज त्यांनी जगाच्या इतिहासात आपलं स्थान निर्माण केलंय.

आजच्या फोटो स्टोरीमध्ये आम्ही अशाच एका सहजपणे टिपण्यात आलेल्या ऐतिहासिक फोटोची कथा घेऊन आलो आहोत. कथा वाचण्यापूर्वी तो फोटो पाहूया.

या फोटोचं नाव आहे ‘किस ऑफ लाईफ’. १७ जुलै १९६७ साली फ्लोरिडाच्या रोको मोराबितो या फोटोग्राफरने हा फोटो घेतला होता. या फोटोने पुढे जाऊन पुलित्झर प्राईज जिंकलं होतं. आता जाणून घेऊया या फोटोमागची कथा.

फोटोमध्ये विजेच्या खांबावर एकजण उलटा तरंगताना दिसतोय तर दुसरा माणूस त्याला किस करताना दिसतोय. पण हे चुंबन चुंबन नसून तो दुसरा माणूस पहिल्या माणसाच्या आत प्राण फुंकत आहे. त्याचं झालं असं की १७ जुलै १९६७ या दिवशी रोको मोराबितो कामावरून परतत असताना त्याने पाहिले की काही कामगार विजेच्या खांबावर चढून काम करत आहेत. रोकोला निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर हे दृश्य फोटोग्राफीसाठी योग्य वाटलं. कोणत्या पद्धतीने फोटो काढता येईल याचा विचार करत असताना त्याला लोकांच्या आरडाओरडा ऐकू आला.

एका खांबावरील कामगारांने चुकून विजेच्या शक्तिशाली तारेला हात लावला होता आणि त्यामुळे तो जवजवळ ४००० व्होल्ट्स एवढ्या प्रचंड विजेच्या संपर्कात आला होता. ही प्रचंड वीज त्याच्या शरीरात भिनून पायातून निघाली होती. त्याच्या पायाच्या अंगठ्याला छोटं छिद्रही पडलं होतं. परिणामी तो जागीच कोसळला. सुरक्षेसाठी असलेल्या पट्यांमुळे तो खाली न कोसळता हवेतच उलटा तरंगत राहिला. ह्या कामगाराचं नाव होतं रँडॉल. मोराबितोने हे दृश्य पाहिल्यानंतर आधी तर फोन करून तातडीने रुग्णवाहिका पाठवायला सांगितली. आणि त्यानंतर त्याने आपला कॅमेरा पुढे सरसाऊन फोटो काढायला सुरुवात केली.

(रोको मोराबितो)

तिथे जमलेल्या गर्दीला काय करावे याचे भान नव्हते. लोक निव्वळ पाहत राहिले. तेवढ्यात दुसऱ्या एका कामगाराने आपल्या जीवाची बाजी लावायची तयारी दाखवली. हा मुळात आपल्या गोष्टीचा हिरो. त्याचं नाव जे. डी. थॉम्पसन. थॉम्पसन आणि रँडॉल चांगले मित्र होते. मित्राला संकटात बघून थॉम्पसन पुढे सरसावला. थॉम्पसन त्या विजेच्या खांबावर चढला. एव्हाना रँडॉलचा चेहरा काळानिळा पडला होता. थॉम्पसनने त्याला मिळालेल्या प्रशिक्षणाच्या मदतीने रँडॉलला CPR द्यायला सुरुवात केली. बेशुद्ध पडलेल्या रँडॉलला पुन्हा शुद्धीत आणण्यासाठी त्याचा श्वासोच्छ्वास सुरळीत करणे गरजेचे होते. हे वेळीच समजल्यामुळे थॉम्पसनने माउथ टू माउथ म्हणजे तोंडावाटे त्याला श्वास पुरवला. हा उपाय रामबाण ठरला. रँडॉलला शुद्ध आली. तोवर रुग्णवाहिका आणि मदत पोचली होती. रँडॉलला खाली उतरवून त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं.

हे सर्व घडत असताना रोको मोराबितोचा कॅमेरा आपलं काम करत होता. ही घटना कायमची छापली गेली होती. आपण ज्या फोटोबद्दल बोलत आहोत तो या सिरीजमधला सर्वात परफेक्ट असा शॉट आहे. हा फोटो घेताक्षणीच रोको मोराबितोला या फोटोचं महत्त्व कळून चुकलं होतं. त्यावेळी रोको जॅक्सनविले जर्नल या वर्तमानपत्रासाठी काम करत होता. फोटो घेतल्याघेतल्या त्याने न्यूजरूमला फोन करून कळवलं, "मला वाटतं मी एक चांगला फोटो घेतला आहे".

हा फोटो वर्तमानपत्रात यायलाच हवा म्हणून जॅक्सनविले जर्नलच्या एडिटरने प्रिंटची तारीख पुढे ढकलली. कॉपी एडिटरने फोटो पाहून लगेच त्याला नावही दिलं - “The Kiss of Life.” पुढे दहा महिन्यांनी ह्या फोटोने इतिहास रचला होता. ह्या फोटोला मानाच्या पुलित्झर पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.

हे सांगताना आपण गोष्टीच्या दोन मुख्य पात्रांना विसरलोच. तर, रँडॉलचा जीव वाचला. तो लवकरच आपल्या घरी परतला. थॉम्पसन आणि रँडॉल यांनी पुढे ३० वर्षे एकत्र काम केलं. दोघांची मैत्री दिवसेंदिवस वाढतच गेली. एवढंच नाही तर रोको मोराबितो आणि थॉम्पसन, रँडॉल या तिघांचीही मैत्री जुळली. १९८८ साली जॅक्सनविले जर्नल वृत्तपत्र बंद झालं. वृत्तपत्राच्या शेवटच्या पुरवणीत तिघांचाही एकत्रित फोटो छापण्यात आला होता. त्यावेळी रँडॉल बायपास सर्जरीमुळे हॉस्पिटलमध्ये होता. रोको मोराबितो आणि थॉम्पसन त्याला भेटायला गेले होते.

सिनेमात जशी happy ending असते तशीच फोटोलाही happy ending असते. या फोटोशी जोडलेल्या तिन्ही व्यक्तींचं नाव आज इतिहासात कोरलं गेलं आहे. याखेरीज सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा फोटो अनेक वर्षांपासून लोकांना माणुसकीचं वेगळं दर्शन घडवत आहे.

फोटोग्राफीच्या जगातील अशाच लाखात एक दृश्यांना आम्ही तुमच्या समोर घेऊन येत राहणार आहोत. ह्या फोटोची स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

सबस्क्राईब करा

* indicates required