'मोदीजी किस चक्की का आटा खाते है ?'...वाचा मोदींच्या 'फिट अँँड फाईन' आरोग्याचं रहस्य !!!
आजतागायत नरेंद्र मोदींनी जवळजवळ ४९ देशांना भेट दिली आहे आणि सध्या ते इस्रायल दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्या जागतिक दौऱ्यांची सतत उलटसुलट चर्चा होत राहिली. पण एक गोष्ट त्यांचे विरोधकही स्वीकार करतील. ती म्हणजे नरेंद्र मोदी या वयातही एखाद्या तरुणापेक्षा कमी फिट नाहीत. प्रचंड व्यग्र दिनक्रम आणि जगातल्या वेगवेगळ्या नेत्यांना त्याच हसतमुख चेहऱ्याने भेट देणं आणि देशात परतल्यावरही एकही सुट्टी न घेता काम करत राहणं.. हे मोदींना कसं जमतं ब्वा ?? असा प्रश्न आपल्या डोक्यात अधूनमधून येत असतो.
नरेंद्र मोदी “किस चक्की का आटा खाते हैं?” यावर आम्ही जाम शोधाशोध केल्यानंतर आमच्या हाती काही आतली माहिती लागली आहे. ती माहिती अशी...
मोदींच्या दौऱ्यांवर त्यांच्याबरोबर असणाऱ्या काही खास माणसांमध्ये बद्री मीना या त्याच्या खास ‘कुक’ चा समावेश आहे मंडळी. बद्री मीना गेल्या १३ वर्षांपासून मोदींसाठी स्वयंपाक करतात आणि वेगवेगळ्या मेजवान्यांची जबाबदारीपण त्यांच्यावर असते. बद्री मोदींच्या रोजच्या जेवणावर वर तर लक्ष ठेवतातच पण त्यांना वेळोवेळी पौष्टिक अन्न मिळत राहावं यावरही त्यांची नजर असते. बद्री मीना हा मोदींच्या टीममधला एक महत्वाचा सदस्य आहे. जेव्हा चीनचे राष्ट्रपती शिनपिंग अहमदाबादमध्ये आले होते त्यावेळी १५० प्रकारचे गुजराती व्यंजन तयार करण्याची जबाबदारी बद्री मीनांवर होती यावरून बद्री मीनांचं किती महत्व आहे हे लक्षात येतं.
स्रोत
बद्रींनी दिलेल्या माहितीनुसार मोदी आठवड्यातून तीन चार वेळा खिचडी खातात. तिला गुजरातीत ‘वघारेली खिचडी’ म्हणतात. सकाळच्या नाश्त्याला त्यांना इडली-सांबार, डोसा, उपमा खायला आवडतं. त्याशिवाय त्यांना ताकातली भेंडी आवडते. मसाला विरहित आणि पारंपारिक गुजराती पदार्थांचे ते शौकीन आहेतच.
नरेंद्र मोदी कितीही फॅट्स फ्री अन्न घेत असले तरी त्यांच्या आरोग्याचा खरं राज एका मशरूममध्ये आहे असं म्हटलं जातं राव! एका रिपोर्टनुसार या मशरूमला ‘गुच्ची’ असं म्हटलं जातं. गुच्ची मशरूम हिमाचल प्रदेशातून आणले जाते आणि असं म्हणतात की मोदी कुठेही गेले तरी त्यांच्या जेवणात हा मशरूम असतोच. मोदी जेव्हा इंग्लंडच्या दौऱ्यावर होते तेव्हा त्यांच्या पसंतीची खास काळजी घेण्यात आली होती, त्यावेळी सुद्धा डिनरमध्ये मशरूम पुलाव वाढण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आता सर्व क्रेडीट या “मशरूम मियाँ” ला जात असलं तरी अजून याबाबत ठोस पुरावा हाती लागलेला नाही.
मशरूममुळे असो वा नसो पण वर दिलेल्या खिचडी आणि इडलीसारखे साधे पदार्थ खाल्ल्याने नक्कीच शरीर आरोग्यदायी राहते यात काही शंका नाही. मोदी जी आपल्या आरोग्याच्या बाबतीत काटेकोर असल्याने तेलकट, तुपकट, तिखट खाणं ते नेहमी टाळतात.
शेवटी काय तर ‘जो फिट है, वही हिट है बॉस !!’