पांढऱ्या अस्वलाच्या पाठीवर T-34 लिहिल्यावर लोक का चिडलेत ? काय आहे प्रकरण ??
पाठीवर “T-34” लिहिलेल्या ध्रुवीय अस्वलाचा (Polar Bears) व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला आहे. रशियाच्या अतिपुर्वेतील चुकोत्का भागात हे अस्वल आढळून आलं. व्हिडीओ पाहून शास्त्रज्ञ, पर्यावरणवादी आणि सामान्य माणसं संतापली आहेत. या संतापामागे काय कारण आहे? “T-34” चा अर्थ काय होतो? हे आता आपण जाणून घेऊ या ...
“T-34” हे एका रशियन रणगाड्याचं नाव आहे. दुसऱ्या महायुद्धात या रणगाड्याचा मोठ्याप्रमाणात वापर झाला होता. युद्धात पूर्वी वापरल्या गेलेल्या T-26 आणि BT रणगाड्यांना बदलण्यासाठी T-34ची निर्मिती करण्यात आली होती. या रणगाड्याची कल्पना त्याचे निर्माते ‘कोश्कीन’ यांच्या डोक्यात १९३४ पासून घोळत होती म्हणून या रणगाड्याला T-34 नाव देण्यात आलं.
तर आता वळूया आपल्या मुख्य विषयाकडे. ध्रुवीय अस्वलाच्या पाठीवर T-34 नाव का लिहिलं असेल?
मंडळी, आपल्याकडे जंगल कमी झाल्याने जंगलातील बिबटे, वाघ गावात-शहरात घुसतात. अशाच घटना रशियामध्ये घडत आहेत. तिथे वाघ बिबट्या नसून ध्रुवीय अस्वल आहे. जागतिक तापमान वाढीमुळे या अस्वलांचं अन्न कमी झालं आहे, त्यामुळे ते मानवी वस्तीत शिरतात. रशियन नागरिकांना या अस्वलांचा खूप त्रास होतो. असा अनुमान लावला जात आहे की अस्वलांवरच्या रागामुळेच कोणीतरी ही खोड काढली आहे.
शरीरावरील पांढऱ्या केसांमुळे अस्वलांना बर्फात लपून शिकार करणे शक्य होते, पण पाठीवर अक्षरं कोरलेली असल्याने या अस्वलाला शिकार करण्यात अडथळे येऊ शकतात. या कारणाने लोक संतापली आहेत. आणखी एक कारण म्हणजे. जेवढ्या स्पष्टपणे ही अक्षरं लिहिलेली आहेत, त्याचा अर्थ या अस्वलाला आधी बेशुद्ध करण्यात आलं असावं आणि मग अक्षरं लिहिली असावी.
तर मंडळी, या सगळ्याच्या मुळाशी असलेल्या जागतिक तापमान वाढीच्या समस्येवर उपाय शोधले जावेत एवढंच वाटतं.