मशरूम विकून वर्षाला १.२५ कोटी कमावणारा भारताचा मशरूम किंग !!
गेल्या काही वर्षांत मशरूम खाण्याचे प्रमाण वाढत आहे. मशरूम मध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट आणि विटामिन डी असल्यामुळे हाडांच्या बळकटीसाठी, तरुण दिसण्यासाठी आणि बुध्दीसाठी ते खूप फायदेशीर ठरते. मशरूम खाल्ल्यावर बराच वेळ भूक लागत नाही त्यामुळे डाएटिंगसाठीही मशरूम खाल्ला जातो. सूप किंवा भाजी अशा कोणत्याही स्वरूपात मशरूम खाता येतो. या सर्व कारणाने बाजारात मशरूम खूप लोकप्रिय आहे. सध्या त्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
भारतीयांच्या मशरूमच्या याच मागणीला ओळखून काही शेतकऱ्यांनी एक वेगळा प्रयोग म्हणून मशरूमची शेती करायला घेतली. त्यापैकी एक शेतकरी म्हणजे पंजाबचे संजीव सिंह. १९९२ मध्ये पारंपरिक पिकांकडे न वळता संजीव सिंह यांनी मशरूमची शेती करायला घेतली. दुरदर्शनवरच्या 'मेरा पिंड, मेरा किसान' या कार्यक्रमातून त्यांना प्रेरणा मिळाली. त्यांनी वयाच्या २५व्या वर्षी तांडा गावातून मशरूमच्या शेतीची सुरूवात केली. आता ते मशरूममधून दरवर्षी तब्बल १.२५ कोटी कमवतात. त्यांचे काम बऱ्याच जणांना प्रेरणा देत आहे. आज त्यांच्या प्रेरणादायी कामाबद्दल वाचूया.
शेतीत रस असल्यामुळे संजीव सिंह पंजाब कृषी विद्यापीठात प्रवेश घेतला. तिथे त्यांना भविष्यात मशरूममधून
किती आर्थिक फायदा आहे हे कळले. त्यासाठी त्यांनी सुमारे एक वर्ष यावर संशोधन केले. बाजारपेठेत फिरून किती मागणी आहे याचा अभ्यास केला. पंजाब कृषी विद्यापीठात त्यांनी मशरूम लागवडीच्या पद्धती शिकल्या. जसे की इनडोअर वर्टिकल आणि बॅग फार्मिंग. ते सेंद्रिय खताद्वारे सहज करता येईल हे त्यांच्या लक्षात आले.
अनुभव हा गुरू म्हणतात पण त्यावेळी इतर कोणीही मशरूमची शेती करत नव्हते त्यामुळे संजीव सिंह यांना अनुभव सांगायला कोणीच नव्हते. स्थानिक पातळीवर त्यासाठी बियाणेही उपलब्ध नव्हते. यासाठी त्यांना दिल्लीत जावे लागले. अश्या परिस्थितीत मशरूमची शेती करायचा निर्णय खूप आव्हानात्मक होता.
जवळजवळ ८ वर्षे त्यांना संघर्ष करावा लागला. हंगामात त्यांनी लागवड सुरू केल्यामुळे त्यांना या शेतीतून अधिक पैसे मिळवता आले. चांगल्या प्रतीची मशरूम मिळवण्यासाठी सेंद्रीय पद्धतीने मशरूम वाढण्यास सुरवात केली. २००१ मध्ये त्यांनी एका खोलीत याची सुरुवात केली. तिथे त्यांनी ६ रॅक बसवले. सगळ्यात वर त्यांनी खत भरलेल्या पिशव्या ठेवल्या. खोलीत मशरूमसाठी लागणारे नियंत्रित वातावरण तयार केले. २००८ मध्ये मशरूम पिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी एक लॅबही सुरू केली. तिथे विक्रीची सोय केली.
संजीव म्हणतात की त्यांचे बियाणे व उत्पादन जम्मू, जालंधर, हरियाणा, हिमाचल आणि इतर शेजारील राज्यातही जाते. गेल्या एका वर्षात दररोज सुमारे ७ क्विंटल उत्पादन वाढले आहे. दोन एकर जागेत १ कोटी रुपयांची कमाई ते करतात. तेवढे उत्पादन काढायला पारंपारिक शेतीमध्ये २०० एकर जागेची आवश्यकता लागली असती.
त्यांच्या या यशाचे कारण मशरूमची चांगली बाजारपेठ असल्याचे संजीव सांगतात. “मशरूम शेतीमध्ये बरीच क्षमता आहे. आता शेतीयोग्य जमीन कमी होत आहे. अशा परिस्थितीत अन्नधान्याच्या गरजा भागविण्यासाठी जमिनीवर दबाव वाढत आहे. म्हणून काही लोक या पद्धतीच्या शेतीकडे वळत आहेत. "
'पंजाबचा मशरूम किंग' ही पदवी संजीव यांना तिथल्या स्थानिक लोकांनी दिली आहे. २०१५ मध्ये राज्य शासनानेही त्यांना सन्मानित केले आहे. मशरूम हा कोणत्याही हंगामात वाढू शकतो. अश्या नवीन कल्पना शेतीत राबवल्या तर शेतकऱ्यांना अधिक चांगले जीवन जगण्यास मदत होईल असे संजीव यांचे म्हणणे आहे.
संजीव यांनी केलेला संघर्ष आणि आता मिळालेले यश यामधून खरंच खूप काही शिकण्यासारखे आहे. त्यांचे खूप खूप अभिनंदन.
लेखिका: शीतल दरंदळे