पुष्पा स्टाईल चोरीचा प्रयत्न महाराष्ट्र पोलिसांनी असा हाणून पाडला!!
पुष्पा : द राईज पार्ट १ या अल्लू अर्जुनच्या चित्रपटातील डायलॉग आणि गाण्यांनी इन्स्टा रील्स आणि युट्युब शॉर्ट्स अगदी भरभरून वाहत आहे. या गाण्यांच्या तालावर थिरकण्याचा मोह होणे आणि त्याची नक्कल करणे सोशल मिडीयाच्या जमान्यात सध्याचा एक ट्रेंड आहे. पण या चित्रपटात अल्लू अर्जून म्हणजेच पुष्पा ज्या प्रकारे पोलिसांना चुना लावून रक्तचंदनाची तस्करी करतो तसेच मी पण करेन म्हटले तर शक्य आहे का? अजिबात नाही.
एकीकडे लोक या चित्रपटातील डायलॉगची नक्कल करत आहेत, तर दुसरीकडे कर्नाटकातील एका पठ्ठ्याने चक्क पुष्पाच्या स्मगलिंग स्टाईलची नक्कल करून करोडो रुपयांच्या रक्तचंदनची तस्करी करण्याचा प्रयत्न केला आहे. बेंगळूरूमधल्या यास्मिन इनायतुल्लाह खान नावाचा ट्रक ड्रायव्हर पुष्पा होण्याच्या प्रयत्नात असतानाच महाराष्ट्र पोलिसांनी मात्र त्याच्या या स्वप्नांचा चक्क चुराडा केला आहे.
पुष्पा द राईज पार्ट १ हा चित्रपट रक्तचंदनाची तस्करी आणि त्यामागची करोडो रुपयांची उलाढाल यावर आधारित आहे. तुम्ही या चित्रपटात पाहिलेच असेल की एक सामान्य मजूर आपल्या हुशारीने कसा संपूर्ण टोळीचा प्रमुख बनतो. यासाठी त्याला कधी पोलिसांचा मारही खावा लागतो तरी कधी पोलिसांच्या डोळ्यात धूळही फेकावी लागते. पोलिसांना चुकवून चंदन नेण्यासाठी त्याने दुधाच्या ट्रकमधून तर कधी फळांच्या ट्रकमधून माल बाहेर नेला. पोलिसांना कळलं देखील नाही की आपण कशाप्रकारे फसवले गेलो आहोत.
चित्रपटातील नायक जर इतक्या शिताफीने डोळ्यांत धूळ फेकू शकत असेल तर आपणही हे काम सहज करू शकू असा भ्रम झालेल्या यासीनने देखील हीच आयडिया वापरली. खाली त्याने २.४५ कोटी रकमेचे रक्तचंदन भरले आणि त्यावर फळांच्या टोपल्या ठेवल्या. वरून ट्रकवर कोव्हीड अत्यावश्यक सेवेचा बोर्डही लावला. सगळं काही ठीकठाक असे असं वाटून त्याने आंध्र-कर्नाटक सीमा पार केली. अर्थात ही सीमा पार करेपर्यंत त्याला कसलाच त्रास झाला नाही आणि कुणालाच त्याचा संशयही आला नाही.
पण महाराष्ट्र सीमेत येताच सांगली जिल्ह्यातील मिरज गर भागातील गांधी चौकात महाराष्ट्र पोलिसांनी त्याला अडवले. अर्थात पोलिसांच्या खास खबऱ्यांनी त्यांना तशी टीप दिली होती. या टीपच्या आधारानेच पोलिसांनी ही गाडी अडवली आणि याची कसून तपासणी केल्यानंतर सगळा प्रकार उघडकीस आला.
पोलिसांनी २.४५ कोटी रुपयाचे रक्तचंदन आणि १० लाखाची गाडी जप्त केली असून यासीनला ताब्यात घेतले आहे. त्याच्या मागे कोण कोण आहे, या रॅकेटचे काम कसे चालते याचीही तपासणी केली जाणार आहे.
यासीनचा हा पुष्पा स्टाईलने स्मगलिंग करण्याचा प्रयत्न फसल्यानंतर "रिअल लाईफ में पुष्पा जरूर झुकेगा", या डायलॉगचा ट्रेंड सुरू होईल की काय अशी शंका वाटते.
चित्रपटातून प्रेरणा घ्यायची असते, हे खरे असले तरी चुकीची प्रेरणा घ्यायची नाही जे जास्त खरे आहे.
मेघश्री श्रेष्ठी