तुमचा वॉर्डरोब सजवा जॅकेट ब्लाऊजसोबत.. पाहा जॅकेट ब्लाऊजचे एक से बढकर एक १३ प्रकार..
आता म्हणाल की पावसाळा सुरू झाला आणि आता काय साडीचं घेऊन बसलात? पण तुम्हांला माहित आहे का, साडीला कधी सीझनची गरजच भासत नाही. एकीकडे प्रलय होत असेल आणि समोर सुंदर साडी असेल तरी तिचा मोह काही कुठल्या बाईला सुटायचा नाही. याला साडीची हाव नव्हे, तर सौंदर्यदृष्टी म्हणतात बरं...
साडीचं एक मात्र चांगलं आहे हं.. हा असा पोषाख आहे की तुमचं वजन कितीही वाढलं किंवा कमी झालं तरी काहीही अल्ट्ररेशन न करता तुम्हांला ती व्यवस्थित बसते. हां, ब्लाऊजचा मात्र घोटाळा होतो. या ब्लाऊज नामक गोष्टीचं फिटिंग अगदी बरोबर लागतं. सैल असून चालत नाही आणि खूप घट्ट असूनही. त्यामुळं साडी कुठली नेसायची हे बरेचदा कुठलं ब्लाऊज आत्ताच्या घडीला नीट बसतंय यावर अवलंबून असतं. साड्या तर वर्षानुवर्षं टिकतात. त्यामुळं त्याच साडीवर नवीन ब्लाऊज शिवणं ही किमान पंचवार्षिक नाहीतर दशवार्षिक योजना हमखास असते.
तर आता लग्नाचा सीझन येऊ घातलाय. साड्यांच्या किंमतीला आणि न बसणार्या ब्लाऊजला न घाबरणार्या तुम्ही, पावसाला थोडीच भीक घालणार आहात? आणि एकदा का लग्नाच्या हॉलमध्ये शिरलं, की कुठला पाऊस आणि कुठला उकाडा!! त्यामुळं करा तुमचं फॅशन मीटर ऑन आणि या सीझनमध्ये ब्लाऊजच्या हटके स्टाईलने सजवा तुमचा वॉर्डरोब..
चला तर मग पाहूया या जॅकेट ब्लाऊजचे १३ एकदम हटके प्रकार...
१. जॅकेट ब्लाऊजची महाराणी-आपली सर्वांची लाडकी माया साराभाई
माया साराभाईच्या पहिल्या सीझनमध्ये एक से बढकर एक सुंदर साड्या होत्या. या सीझनमध्येही तिची फॅशन बदललीय, पण जॅकेटेड ब्लाऊज आहेतच आहेत हो..
२. साडी आणि मिक्स ऍंड मॅच ब्रोकेड जॅकेट
श्रुती सेठने सिल्कच्या ग्रे-ब्लॅक साडीवर मरून रंगाचं ग्रे-ब्लॅक रंगसंगती असलेलं ब्रोकेड जॅकेट घातलं आहे . त्यामुळं एकदम साध्या वाटणार्या साडीला एक वेगळीच सुंदरता आलीय. गंमत म्हणजे हे जॅकेट फक्त साडी सोबतच घालायला हवं असं नाही. म्हणजे मिक्स ऍंड मॅचसाठी एकदम परफेक्ट!!
३. लहरिया साडी विथ ब्रोकेड जॅकेट
जॅकेट घालण्यासाठी एकदम कॉंट्रास्ट रंग असण्याची गरज नाही. तुम्ही त्याच रंगांच्या वेगळ्या शेडमधलं ब्रोकेड कापड वापरून ब्लाऊजच जॅकेटच्या फॅशनमध्ये शिवून घेऊ शकता. आणि हे जॅकेट बनारसी लेहंग्यासोबतही मस्त दिसेल.
शिवाय ब्रोकेडचा तोरा आणि दागिन्यांची झळाळीही या ब्लाऊजसोबत छान दिसतेय नाही?
४. साड्यांची महाराणी पैठणी विथ जॅकेट ब्लाऊज
पैठणीचं सौंदर्य काही औरच. तिचा ड्रेस बनवा, पारंपरिक ब्लाऊज शिवा, स्लीव्हलेस ब्लाऊज घाला, किंवा आणखी काही करा.. तिचं सौंदर्य आणखीच वाढतं. सांगा, तुमचं काय मत आहे या पैठणी विथ जॅकेट ब्लाऊजबद्दल?
आणि माहिती आहे, कुठल्याही लग्नात जा.. किमान दहाजणींनी पैठणी नेसलेली असतेच. मग तुमचं वेगळेपण नको का उठून दिसायला?
५. कॉंट्रास्ट रंगात कच्छी जॅकेट
सिंपल ऍंड ब्युटिफुल.. एकाच रंगातलं साडी-ब्लाऊज अन त्यांचं सौंदर्य खुलवायला विरूद्ध रंगछटांमधलं कच्छी जॅकेट.
६. मल्टीपर्पज सोनेरी जॅकेट
हे जॅकेट कोणत्याही रंगाच्या प्लेन साडीवर सुंदर दिसेल. आणि दुसरं काही कॉंबीनेशन करायचं म्हटलं तर कॉंट्रास्ट रंगाच्या सिगरेट पँटससोबतही छान खुलून दिसेल.
७. मिररवर्क केलेलं पेप्लम टॉप जॅकेट
सध्या पेप्लम टॉप्सची पण खूप चलती आहे. ते जीन्स, लॉंग स्कर्ट्स आणि लेहंग्यासोबत वापरता येतातच, पण साडीसोबतही सुंदर दिसतात. आणि तुम्हाला गंमत माहित आहे का? जर तुमचं थोडं पोट सुटलं असेल, तर तेही या टॉपमध्ये लपून जातं बरं..
८. लांब बाह्यांचं जॅकेट ब्लाऊज
थंडीच्या मोसमात तुम्हांला या ब्लाऊजचं महत्व चांगलंच कळेल. पण हो.. इतकं छान फिटिंगचं ब्लाऊज घालायला तुमचं पोट मात्र छान सपाट हवं हं. नाहीतर तर आपलं पेप्लम स्टाईल जॅकेटच बरं.
९. इलेक्ट्रिक रंगातलं एम्ब्रॉयडरी केलेलं जॅकेट
वेगवेगळ्या रंगांच्या फॅशन्स येत असतात. काही वर्षांपूर्वी फ्ल्युरोसंट रंगांची क्रेझ होती, तर आता सोनम कपूरनं आणलीय इलेक्ट्रिक रंगांची. असं थोडं चमकतं आणि कशिदाकाम केलेलं जॅकेट खांद्यावरून पांघरलंत तर साडीला आणखी चार चॉंद लागतील.
पण हो, कुठल्या रंगासोबत कुठला रंग चांगला दिसेल याचं थोडं बेसिक ज्ञान तुम्हांला असायला हवं. हेच जॅकेट एखाद्या पार्टीच्या दिवशी प्लेन शर्टसोबत घाला आणि तिथंही सगळ्यांची वाहवा मिळवा.
१०. ब्लॅक जॅकेट विथ ब्लॅक & गोल्ड साडी
फॅशन क्वीन करीनालाही हा जॅकेट ब्लाऊजचा मोह आवरला नाहीय. स्टेटमेंट सिल्व्हर ज्युलरीसोबत तिनं हा लूक छान जपला आहे.
११. लॉंग जॅकेट विथ साडी..
आता जॅकेट ब्लाऊजच्याच लांबीचं हवं असा काही नियम आहे का? आम्हांला वाटलं तर अगदी फ्लोअर लेन्ग्थ जॅकेट घालूनसुद्धा साडीचं सौंदर्य आम्ही खुलवू शकतो असंच म्हणायचंय ना या दोघींना? योगायोगानं दोघींनीही बेज किंवा सोनेरी छटांमधल्या साड्या नेसून त्याला विरूद्ध रंगाच्या जॅकेटची जोड दिलीय. तुम्ही कोणत्याही रंगाच्या प्लेन साडीसोबत कॉंट्रास्ट रंगातलं जॅकेट वापरू शकता. नंतर हेच जॅकेटस ऍंकल लेन्ग्थ ट्राऊझर्स आणि टीशर्टसोबत घालून मिक्स & मॅचही करू शकालच.
१२. जॅकेट विथ प्लेन साडी
विश्वसुंदरी ऐश्वर्याचा हा कान्स फेस्टिव्हलमधला लूक आहे. पांढर्या साडीवर हे जॅकेटवजा ब्लाऊज अत्यंत सुंदर दिसत आहे. तुम्हांला आठवत असेल तर तिच्या या लूकबद्दल तिची खूप प्रशंसा झाली होती.
१३. जॅकेट घालण्याची वेगळी पद्धत
कुणी साडीवरून असं स्वेटर घातलेलं दिसलं की किती बहेनजी छाप वाटतं. पण तेच योग्य फॅशनचं आणि योग्य प्रकारचं जॅकेट घातलंत तर त्यालाच लोक ’वॉव’ लूक म्हणतील ना?
साडीचं सौंदर्य, इव्हिनिंग गाऊनचा फील आणि कंफर्ट हे सगळं या जॅकेटमुळे छान जुळून आलंय. नाही का?
पाह्यलंत? थोडा रंगसंगतीत बदल करून तुम्ही तेच कपडे वेगवेगळ्या प्रकारे वापरू शकाल आणि स्वत:चं एक वेगळं फॅशन स्टेटमेंट बनवू शकाल.
लागा तर मग तयारीला.. तसेही डिझायनर टेलर्स कपडे शिवून द्यायला बराच वेळ घेतात. नाहीतर मग पार्टीला किंवा लग्नाला जाताना घालायचे ते कपडे उगीच शिंप्याकडे असायचे!!