सेव्ह दि फ्लॅग : रस्त्यावर फाटके झेंडे नको आहेत मग हे झेंडे वापरा !!
प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन हे दोन्ही दिवस आपल्या सगळ्यांसाठीच अभिमानाचे दिवस असतात. या दिवशी सगळीकडे राष्ट्रप्रेम, देशप्रेम पाहायला मिळतं. शुभेच्छा तर भरभरून दिल्या जातात, पण दुसऱ्याच दिवशी अगदी याउलट चित्र दिसतं.
जो तिरंगा आपण आदल्यादिवशी अभिमानाने मिरवत असतो तोच दुसऱ्या दिवशी रस्त्यावर पडलेला असतो. हल्ली तर प्लास्टिकचे झेंडे आलेले आहेत. त्यामुळे एक वेगळीच समस्या निर्माण होते.
मंडळी, या गोष्टीला लक्षात घेऊन खुशिया आणि बॉक्सवूड या संस्थेने एक इकोफ्रेंडली उपाय शोधून काढला आहे. बॉक्सवूड ही संस्था इकोफ्रेंडली प्रॉडक्ट्ससाठी ओळखली जाते. २६ जानेवारीच्या निमित्ताने त्यांनी अशीच एक भन्नाट इकोफ्रेंडली कल्पना शोधून काढली आहे. या कल्पनेचं नाव आहे ‘सेव्ह दि फ्लॅग’.
मंडळी, त्यांनी एक खास झेंडा तयार केला आहे. या झेंड्याच्या कागदात बी ठेवण्यात आली आहे. हा झेंडा मातीत पुरल्यानंतर आतल्या बिमुळे झेंड्याचं लवकरच झाडात रुपांतर होतं. आता तुम्ही म्हणाल की झेंड्याला मातीत पुरणे हा झेंड्याचा अपमान आहे.
आपल्या तिरंग्यासाठी असलेला ‘फ्लॅग कोड ऑफ इंडिया’ हा कायदा सांगतो की झेंडा जर फाटलेल्या तुटलेल्या अवस्थेत असेल तर त्याला पूर्ण सन्मानपूर्वक आपण जाळू शकतो किंवा वेगळ्या मार्गाने त्याला नष्ट करू शकतो. झेंड्याची प्रतिष्ठा राखण्यासाठी कायद्यात हा उल्लेख करण्यात आला आहे.
मंडळी, झेंडा जाळणे हा प्रकार आपल्यातील कोणालाही आवडणार नाही. मग ‘सेव्ह दि फ्लॅग’ची कल्पना कामी येते. आपल्या राष्ट्रध्वजाचा अपमानही होणार नाही आणि या खास दिवसाची आठवण म्हणून एक झाड नेहमीच आपल्या सोबत राहील.
‘सेव्ह दि फ्लॅग’ मोहीम गेल्या ३ वर्षापासून राबवली जात आहे. इकोफ्रेंडली तिरंगा बनवण्यासोबत संस्था रस्त्यावर पडलेले झेंडे जमा करण्याचं काम करते.
मंडळी, तुम्हालाही हा तिरंगा हवा असल्यास तुम्ही 9769181218 या क्रमांकावर संपर्क साधू शकता.
बोभाटाच्या सर्व वाचकांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा !!