पुणेकरांनो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एक गुप्त भुयार आहे, माहित्ये आहे का ??

आपण ज्या जागेत राहतो किंवा जिथे काम करतो त्या जागेची पूर्ण माहिती आपल्याला असतेच असं नाही. आपण कितीही वर्ष त्या ठिकाणाला पाहत असलो तरी काही गोष्टी आपल्याला माहित नसतात. आता पुण्याचच बघा ना. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एक गुप्त भुयार आहे हे खुद्द पुणेकरांनाही माहित नाहीये.
मंडळी, तुम्ही बरोबर ऐकलंत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एक गुप्त भुयार आहे. एवढं तेवढं नाही तर तब्बल १५५ वर्ष जुनं भुयार आहे. हे भुयार स्वातंत्र्यानंतर बंद करण्यात आलं होतं. पण फेब्रुवारी २०१८ पासून पुणेकरांसाठी आणि पर्यटकांसाठी हे भुयार खुलं करण्यात आलंय. दर गुरुवारी लोकांना भुयाराची सैर करता येते. आता थोडा इतिहास जाणून घेऊया.
भुयाराला पोतदार संकुल येथून सुरुवात होते आणि शेवट होतो विद्यापीठाच्या मुख्य इमारतीत. आज आपण ज्याला विद्यापीठाची मुख्य इमारत म्हणतो ती एकेकाळी गव्हर्नरच्या निवासस्थानाची जागा होती. पोतदार संकुलाचा वापर स्वयंपाकघर म्हणून व्हायचा. तिथे नोकरांसाठी राहण्याची व्यवस्था पण होती. पोतदार संकुल ते विद्यापीठाची मुख्य इमारत मधलं अंतर बघता पावसाळ्यात अन्न पोहोचवण्यास अडचण यायची. यावर नामी शक्कल लढवून ३०० फुट भुयार तयार करण्यात आलं. स्वातंत्र्यापर्यंत त्याचा वापर होत होता.
मंडळी, आणखी एक गमतीदार गोष्टी अशी की भुयाराच्या शेवटच्या टोकाला २ खोल्या आहेत. या खोल्यांमध्ये नेमकं काय आहे हे कोणालाच माहित नाही. आपण फक्त अंदाज लावू शकतो.
तुम्ही जर पुण्याला गेलात तर हे भुयार नक्कीच बघा. लक्षात असुद्या फक्त गुरुवारी भुयार पाहण्यासाठी खुलं असतं. 02025690062 या क्रमांकावर फोन करून तुम्ही आणखी माहिती मिळवू शकता.
या माहितीच्या बदल्यात बोभाटाला फोटो मात्र न विसरता पाठवून द्या राव.