आता तुम्हाला जाता येणार खऱ्याखुऱ्या 'मालगुडी' स्टेशनला....पत्ता बघून घ्या राव !!
ता ना ना ताना नाना ना.......
मालगुडीला स्वामीच्या गावी जायचं हे ९० च्या दशकातील प्रत्येक मुलाचं स्वप्न होतं. आता मालगुडी हे काही खरोखरचं ठिकाण नव्हे. लेखक आर. के. नारायण यांच्या कथांमधलं ते एक काल्पनिक गाव आहे. पण आता हे काल्पनिक गाव सत्यात उतरणार आहे राव. तुम्ही मालगुडी स्टेशनला खरोखर भेट देऊ शकता. कसं ? चला पाहूया !!
तर, कर्नाटकच्या अर्साळू रेल्वे स्टेशन भागात मालगुडी डेज या प्रसिद्ध मालिकेचं शुटींग झालं होतं. मालगुडी डेज या मालिकेचे दिग्दर्शक शंकर नाग यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रेल्वे विभागाने अर्साळू रेल्वे स्टेशनचं नाव बदलून ‘मालगुडी’ करण्याचं पक्कं केलं आहे. तर अशा प्रकारे खरोखरचं मालगुडी अस्तित्वात येईल.
अर्साळू रेल्वे स्टेशन भागात आजही मालगुडी डेज मधल्या गोष्टी पाहायला मिळतात. रेल्वेची जुनी इमारत मालिकेसाठी वापरण्यात आली होती. ती इमारत आज दयनीय अवस्थेत आहे. रेल्वे विभागाने या इमारतीला तसेच अर्साळू रेल्वे स्टेशनला नवं रूप देण्याचं काम हाती घेतलं आहे.
मंडळी, मालगुडीसाठी अर्साळू स्टेशनची निवड का झाली याबद्दल मास्टर मंजुनाथ म्हणतात की ‘अर्साळू स्टेशन ब्रिटीश काळ उभा करण्यासाठी अगदी परफेक्ट होतं.’
तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे मास्टर मंजुनाथ कोण ? राव हे मास्टर मंजुनाथ म्हणजे आपल्या मालगुडी डेज मधले ‘स्वामी’.
मंडळी, फार पूर्वीपासून अर्साळूचं नाव बदलण्याची मागणी होत होती. अखेर ती मागणी पूर्ण झाली आहे. लवकरच आपल्याला मालगुडीला जाता येईल. आहे ना गुड न्यूज ??