बोर्डाच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 'बेस्ट'चं 'बेस्ट' गिफ्ट !!
परीक्षा म्हटली की थोडं लवकरच परीक्षा केंद्रावर पोहोचावं लागतं. त्यात जर १० आणि १२ वीच्या परीक्षा असतील तर अर्धा तास लवकर पोहोचणे हा नियम असतो. बऱ्याचदा बस किंवा रिक्षा वेळेवर न मिळाल्याने विद्यार्थ्यांना उशीर होतो आणि मग वर्ष वाया जाण्याची वेळ येते. यावर्षी विद्यार्थ्यांचं हे टेन्शन बेस्टने दूर केलं आहे. बेस्टने १० वी आणि १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष बस सेवा देऊ केली आहे. चला तर पाहूया ही विशेष सेवा आहे तरी काय.
बेस्टने बोर्डच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत बस सेवेत महत्वाचे बदल केलेत. तसं विशेष परिपत्रक काढण्यात आलंय. ज्या विद्यार्थ्यांकडे बस पास आहे त्या विद्यार्थ्यांना हा पास त्यांच्या घरापासून ते परीक्षा केंद्रापर्यंत सर्व बसेससाठी वापरता येईल. त्यांना वेगळं तिकीट काढावं लागणार नाही. महानगरपालिकेच्या ज्या विद्यार्थ्यांकडे बस पास नाही त्यांना हॉल तिकीटवरचा शाळेचा शिक्का दाखवून मोफत प्रवास करता येणार आहे.
गर्दीच्या वेळी बस सुटू नये यासाठी विद्यार्थ्यांना पुढच्या दाराने चढण्याची मुभा देण्यात आली आहे. याशिवाय गर्दीच्या बस थांब्यावर विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी अधिकारी आणि पर्यवेक्षकीय कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. वेळ पडल्यास बेस्टने अतिरिक्त गाड्या सोडण्याचाही निर्णय घेतलाय.
तर मंडळी, उशिरा पोहोचण्याचा तर आता प्रश्नच उरला नाही. यासाठी बेस्टचे नक्कीच आभार मानले पाहिजेत.
बोर्डच्या परीक्षेला बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना बोभाटाकडून ‘बेस्ट ऑफ लक’.....