computer

या बाई प्रियांका चोप्रा, ईशा अंबानी आणि दीपिकाला साडी नेसवतात....असं घडलं त्यांचं करिअर !!

साडी रोज नेसा किंवा  सहा महिन्यांतून एकदा, व्यवस्थित साडी नेसणं ही एक कला आहे. त्यातही जॉर्जेट आणि शिफॉनसारख्या साड्या असतील तर ठीक आहे, पण बनारसी आणि कांजीवरमसारख्या भारीतल्या रेशमी साड्या नेसायच्या म्हटलं की भल्याभल्या बायकांची वाट लागते. नुसती साडी नेसून चालत नाही. ती सर्व बाजूंनी समतल असावी लागते, साडीतून चपला दिसू नयेत ती इतकी खालपर्यंत यावी लागते पण त्याचसोबत  चालताना पाय अडखळू नये इतपत ती  वरती असायला लागते. हे प्रकरण इथंच संपत नाही हं.. पदर खांद्यावरून घ्यायचा की पिनअप करायचा, की आणखी वेगळ्या पद्धतीने ड्रेप करायचा यावरूनही त्या व्यक्तीचा लुक चांगला किंवा वाईट ठरू शकतो.. या सगळ्या भानगडींमुळे अगदी कसलेल्या बायकासुद्धा समारंभाच्या वेळेस साडी नेसवायला पार्लरवालीला बोलावतात. पण मग सेलेब्रिटी अशावेळेस काय करतात? 

ते डॉली जैनला बोलावतात!!

डॉली जैन साडी डिझायनर आहे का ? – नाही !! कलाकार आहे का ? – नाही !! डॉली जैन आहे 'साडी ड्रेपर'. म्हणजे डॉलीचे कौशल्य आहे साडी नेसवण्याचे. असं काय खास आहे साडी नेसवण्यात ? हे आज आपण वाचूया !!

साडी नेसल्यानंतर व्यक्तिमत्व अधिकच खुलून दिसण्यासाठी डॉलीला आता देशपरदेशातून खास निमंत्रणं येतात. कॉश्च्युमच्या व्यवसायात या कामाला ड्रेपिंग असे म्हणतात. चित्रपटसृष्टीत हे काम कॉश्च्युम डिपार्टमेंट बघत असतं. डॉलीचा व्यवसाय चित्रपटसृष्टीशी निगडीत नाही. तिची खासियत नववधूला लग्न समारंभाची खास साडी नेसवणे हे आहे. यादिवशी ती वधू त्या कार्यक्रमाची सम्राज्ञी असते. त्या एका दिवसाच्या सम्राज्ञीला तिच्या सम्राज्ञी पदाची आठवण जन्मभर सोबत असते. डॉली नेमके हेच काम करते.

साडी नेसवण्याची ही कला डॉली जैनला एका रात्रीत जमलेली नाही. रोज एखादा गायक जसा रियाज करतो तसा साडी नेसावण्याचा रियाज डॉली जैन यांनी वर्षानुवर्ष केला आहे. आपल्याला साडीच्या दुकानात जे mannequin (पुतळे) दिसतात त्यावर डॉलीने अनेक वर्ष सराव केला आहे.

सुरुवातीला डॉली जैन जिथे संधी मिळेल तिथे नववधूला साडी नेसवायला जात असे. अशाच एका कार्यक्रमात त्यांचे कसब संदीप खोसला (डिझायनर अबू जानी-संदीप खोसला) यांच्या नजरेत भरली. त्यानंतर डॉली जैन यांचे नाव सेलिब्रिटींपर्यंत पोहोचायला वेळ लागला नाही. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्यापासून ते सध्याच्या केंद्रीय मनुष्यबळ मंत्री स्मृती इराणी आणि फिल्मी जगतात श्रीदेवी पासून प्रियांका चोप्रा पर्यंत सगळ्यांना साडी नेसवण्याचे काम डॉलीने केलं आहे.

साडी नेसवताना डॉलीच्या डोळ्यासमोर डिझायनरची संकल्पना आणि नववधूची इच्छा या दोन गोष्टी असतात. उदाहरणार्थ, दीपिका पदुकोणला साडी नेसवताना ती पदराची लांबी जास्त ठेवते ज्यामुळे पदर हातावर घेता येतो आणि प्रियांका चोप्राला साडी नेसवताना ती थोडी सैलसर साडी नेसवते. यामध्ये ज्या व्यक्तीला साडी नेसवली जाते त्या व्यक्तीच्या शरीराचा बांधा आणि इतर बऱ्याच गोष्टींचे भान ठेवून हे काम करावे लागते. जयललिता यांना साडी नेसावण्यासाठी बऱ्याच पिनांची गरज भासायची. सुरुवातीला तर इतक्या पिनांसकट जयललिता यांच्या जवळ जाण्याची त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी मनाई केली होती.

साडी नेसल्यानंतर आपण जाड दिसू अशी शंका ज्यांना असेल त्यांनी डॉलीकडून साडी नेसवून घ्यावी असे मत सुप्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी डॉलीबद्दल बोलताना व्यक्त केले.

नुकतंच पार पडलेल्या इशा अंबानीच्या लग्नात नववधू इशाला (निमकरांची नाही बरं) साडी नेसवण्याचे काम डॉलीनेच केले. थोडक्यात सांगायचं झालं तर डॉली आता ‘सेलेब्रिटी ड्रेपर’ झाली आहे. अर्थातच या कामांबद्दल तिला भरगोस बिदागी पण मिळते. या बिदागीचा नक्की आकडा काही कारणांमुळे सांगता येत नाही, पण ३५,००० ते २ लाख इतका मेहनताना डॉलीला मिळतो. डॉलीने ज्यांचे बजेट कमी असेल त्यांच्यासाठी एक २५ मुलींची टीम तयार केली आहे.

डॉलीच्या म्हणण्याप्रमाणे तिला जास्तीत जास्त कमाई लग्नसराईत होते. यासाठी ३ महिने आधीच नोंदणी करावी लागते.

एकेकाळी डॉलीला साडी नेसण्याच्या १२५ तऱ्हा अवगत होत्या. आता मात्र तिने साडी नेसण्याचे ३६५ प्रकार डिझाईन केले आहेत. याविशायावारचं पुस्तक येत्या काही दिवसातच प्रकाशित होणार आहे. साडी नेसवण्याच्या या कलेत डॉलीने इतके प्राविण्य मिळवले आहे की अवघ्या १८ सेकंदात साडी नेसवण्याचा विक्रम तिच्या नावावर नोंदवला गेला आहे.

एखादी छोटीशी कला किमयेत कशी रुपांतरीत करता येते याचं हे सुंदर उदाहरण आहे.

 

आणखी वाचा :

तुमच्या सुंदर रेशमी साड्यांना पुन्हा उपयोगात आणण्याच्या ८ हटके आयडिया..

तुमच्या सुंदर साड्यांना पुन्हा उपयोगात आणायच्या २५ सॉलीड आयडियाज..

सासूकडून प्रेरणा घेऊन सुनेने उभारला स्वतःचा बिझनेस तो ही व्हाट्सॲपच्या मदतीने !!

बिहारमध्ये दारुबंदीमुळं वाढलाय महागड्या साड्यांचा खप!! किती? विश्वास बसणार नाही, इतका!!

तुमचा वॉर्डरोब सजवा जॅकेट ब्लाऊजसोबत.. पाहा जॅकेट ब्लाऊजचे एक से बढकर एक १३ प्रकार..

रेशमाचे धागे ते साडी -पाहा प्रवास

या १० प्रकारच्या साड्या तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हव्यात

पाच सेकंदात नेसून होते ही साडी....कशी वाटली ही आयडिया?

सबस्क्राईब करा

* indicates required