उंदीर मारून पोट भरणारी माणसं !!
आज आपण वाचूया मुंबईच्या एका अशा वर्गाची कहाणी, जे वर्षानुवर्षे मुंबईचे उंदीर मारून पोट भरत आहेत. मुंबई हे असं एकमेव शहर आहे जिथे उंदीर मारण्यासाठी माणसांना नोकरी दिली जाते. तीही कायमची. रात्रीच्या वेळी जेव्हा मुंबई गाढ झोपलेली असते तेव्हा यांचं काम सुरु होतं. तुम्हांला आठवत असेल धोबीघाट सिनेमात प्रतिक बब्बरचं पात्र हे काम करत असतं. पडद्यावरसुद्धा किळसवाणे वाटणारं काम हे लोक प्रत्यक्षात कसे करत असतील ??
प्रश्न पडला ना ? चला तर मग, आज मुंबईची एक वेगळी बाजू बघूया.
लेप्टोस्पायरोसिस सारख्या आजारांना कारणीभूत असलेले उंदीर मुंबईची मोठी समस्या आहेत. या समस्येकडे बघता मुंबई महानगरपालिकेने त्यासाठी उंदीर मारणारे कायमस्वरूपी लोक नेमले आहेत. या लोकांना एक पिशवी, टॉर्च आणि लांब काठी दिली जाते. टॉर्चच्या उजेडात उंदराला शोधून त्याला काठीने मारायचं आणि पिशवीमध्ये भरायचं काम हे लोक करतात. मेलेला उंदीर पिशवीत भरण्याची सुद्धा एक विशिष्ट पद्धत असते. हे लोक पायांच्या बोटांनी तो उंदीर उचलतात.
इतर कामांमध्ये जसं टार्गेट असतं, तसं इथेदेखील आहे बरं का. रोज रात्री ३० उंदीर मारायचे. एखाद्या दिवशी जर ठरलेल्या टार्गेटप्रमाणे उंदीर मारून नाही झाले, तर दुसऱ्या दिवशी ते टार्गेट पूर्ण करावं लागतं. नेमके किती उंदीर मारले याला महत्व का आहे असा प्रश्न तुम्हाला पडेल.... त्याचं काय आहे ना, हे उंदीर दुसऱ्या दिवशी मोजले जातात. त्यानुसार या लोकांना पगार दिला जातो. प्रत्येक माणसाला १५ ते १७ हजारपर्यंत पगार असतो आणि जर उंदीर कमी जास्त झाले, तर पगार कापला जातो. कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने कामावर असलेल्या लोकांना प्रत्येक उंदरामागे १० रुपये मिळतात.
आजच्या घडीला ४० पेक्षा जास्त लोक या नोकरीत आहेत. मुंबईचा हा एक दुर्लक्षित गट आहे असं आपण म्हणू शकतो. आपण प्रगत होत असताना या लोकांना साध्या सुरक्षा साधनांसाठी झगडावं लागतं. ३० उंदरांची संख्या गाठण्यासाठी बिळात हात घालणे, नाल्यात उतरून उंदीर मारणे अशी जीवावर बेतणारी कामं त्यांना करावी लागतात. मुंबईला ज्या रोगांपासून वाचवण्यासाठी उंदीर मारले जातात, त्याच रोगांना हे लोक बळी पडल्याची अनेक उदाहरणे आहेत. याखेरीज रात्रीच्या वेळी काम करताना इतर लोकांना या मंडळींची शंका येते. चोर म्हणून पकडलं जातं.
वर्षभरात या लोकांकडून तब्बल ३,५०,००० उंदीर मारले जातात. रोज मारूनही उंदरांची समस्या आहे तशीच राहते. त्यामुळे त्यांची नोकरी मात्र कधीही जात नाही. जावेद शेख नामक व्यक्ती हे काम त्यांच्या वयाच्या १९ व्या वर्षापासून करत आहे. आज त्यांचं वय ६७ वर्ष आहे.
मंडळी, मुंबई उर्फ मायानगरीचा एक भाग असलेले हे लोक मुंबईचं रक्षण करायचं कामच करत असतात. हे लोक आपलं पोट भरण्यासाठी हे काम करत असतील, पण ते अप्रत्यक्षपणे मुंबईची सेवाच करत आहेत हे आपल्याला मान्य केलंच पाहिजे.