computer

मुलांच्या प्रेमामुळे थांबली बदली आणि आता या शिक्षकाची रिटायरमेंट पण इथेच!!

खेड्यातल्या शाळांची विशेषता म्हणजे तिथल्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे नाते!! शिक्षक आणि विद्यार्थीच नाही, तर एकमेकांच्या घरचेही संबंध अगदी जवळचे झालेले असतात. एक मोठं कुटुंबच असल्यासारखे ते एकमेकांची काळजी घेणं, विचारपूस करणं हे अगदी सहजपणे करत असतात. शाळा संपली म्हणजे नाते संपले असे तिथे नसते. गावातल्या सणांमध्ये, तिथल्या लोकांच्या सुखदुःखामध्ये शिक्षकसुध्दा मनापासून सामील होत असतात. एक शिक्षक एकाच शाळेत १०-१२ वर्षं असल्यावर तर तो त्या गावाचाच सदस्य झालेला असतो. खेड्यांकडून शहराकडे जेव्हा विद्यार्थी आणि पालकांचा ओढा वाढत आहे, अशा वातावरणात मनापासून विद्यार्थ्यांवर प्रेम करणाऱ्या मोजक्या शिक्षकांमुळे खेड्यातले शिक्षण आजही आनंददायक आहे.

पण प्रत्येक शिक्षक असा असेल असे नसते राव!! शिक्षक येणे आणि काही दिवस राहून त्याची बदली होणे यातही काही नविन नाही. पण काही शिक्षक मात्र विद्यार्थ्यांच्या मनावर एवढे गारुड करतात की त्यांची बदली झाली तर ते विद्यार्थ्यांना सहन होत नाही. 

उत्तराखंडमधल्या उत्तरकाशी येथे आशिष दंगवाल नावाचे असेच शिक्षक होते. त्यांचे शिकवणे आणि वागणूक पाहून पूर्ण गाव त्यांच्यावर इतके खूष होते की त्यांची बदली झाली तेव्हा पूर्ण गावाने एकत्र येऊन त्यांना निरोप दिला. प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होते. पूर्ण गावात भावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. आशिष दंगवाल जेव्हापासून त्या शाळेत आले, तेव्हापासून त्या शाळेचा शिक्षणाचा दर्जा वाढायला लागला होता. आशिष सरांनी शिक्षणाची क्वालिटी इंग्रजी शाळांसारखी बनवून ठेवली होती. सरकारी शाळा असूनसुद्धा एखाद्या खासगी शाळेसारखे शिक्षण त्यांनी त्या गावात उपलब्ध करून दिले आणि म्हणूनच त्यांना पूर्ण गावकऱ्यांनी कृतज्ञतेने निरोप दिला.

मंडळी, आपल्या महाराष्ट्रातसुद्धा नुकताच असा प्रसंग घडलाय. नंदुरबार जिल्ह्यातल्या भालेर इथे शिवदर्शन विद्यालयात गेल्या वीस वर्षांपासून नरेंद्र पाटील सर चित्रकला विषय शिकवत आहेत. या सरांची बदली झाली आणि विद्यार्थ्यांनी आणि गावकऱ्यांनी चक्क त्यांना परत आणण्यासाठी सगळ्या प्रकारचे प्रयत्न केले. ज्या दिवशी ते शाळा सोडून् गेले त्या दिवशी शाळेतली मुले रडत होती. एकही विद्यार्थी त्यांना जाऊ द्यायला तयार होत नव्हता.

बदलीच्या वेळी मुलं भावुक होणे साहजिक असते, कारण त्या शिक्षकांनी त्यांना तेवढे प्रेम दिलेले असते. पण इथे एवढ्यावर मुले थांबली नाहीत. त्यांनी नरेंद्र पाटील सरांना परत आणण्याचा निश्चय केला आणि पोरं कामाला लागली. मुलं घरी जाऊन आपल्या पालकांना सांगू लागली की जोवर नरेंद्र पाटील सर परत येत नाहीत तोवर आम्ही शाळेत जाणार नाही. मुलांच्या हट्टासाठी पालकपण संस्थाचालकांच्या मागे लागले आणि शेवटी नरेंद्र पाटील सर पुन्हा त्याच शिवदर्शन विद्यालयात परत आले. विद्यार्थ्यांचे प्रेम बघून संस्था चालकांनी नरेंद्र पाटील सरांना सांगून टाकले की आता निवृत्तीपर्यंत भालेरलाच शिकवा. 

मंडळी, एक चित्रकलेचा शिक्षक. पण मनात असलेल्या प्रचंड प्रेमामुळे विद्यार्थ्यांच्या मनात अशी जागा निर्माण करतो की विद्यार्थ्यांना त्यांचे शाळा सोडून जाणे मानवले नाही. प्रामाणिकपणे काम केले की किती प्रेम मिळते याचे नरेंद्र पाटील सर जिवंत उदाहरण आहेत.

 

लेखक : वैभव पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required