computer

अख्खा ट्रक ढकलून नेणाऱ्या 'सुपरवूमन'ला मिळालंय तिच्या कामाचं बक्षीस....व्हिडीओ पाहून घ्या !!

'नेकीं कर और दरिया में डाल' अशी म्हण आपल्याकडे खूप प्रचलित आहे. तुम्ही काही चांगलं काम करा पण त्याची कोणी किंमत करत नाही असा नाराजीचा सूर अनेकदा लोकांकडून ऐकला जातो. या नाराजीच्या सुरामुळेच सार्वजनिक जीवनात लोक एकमेकांच्या मदतीला धावत नाहीत.अगदी अपघात झाला तरी बघ्याची भूमिका घेतात. अर्थात बऱ्याच जणांना असे अनुभवही आलेले असतात. पण अशीच मदत करून एका महिलेला चांगलाच फायदा झालाय. तेही अगदी अनपेक्षितपणे. नक्की काय झालंय वाचा शेवटपर्यंत.

युकेमध्ये चार्लीन लेस्ली नावाच्या महिलेने केलेल्या मदतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झालाय. ३३ वर्षीय चार्लीन या एका सुपरमार्केटमध्ये काम करतात. त्यांना तीन मुलं आहेत. सध्या युकेमध्ये खूप बर्फ पडतोय. थंडीमुळे सगळ्या रस्त्यांवर, घरावर, झाडांवर बर्फ पसरलेला आहे. रस्त्यावरच्या बर्फामुळे वाहतुकीला बराच अडथळा येतो. त्यामुळे हा बर्फ वेळोवेळी साफही केला जातो.

रस्त्यावर पसरलेल्या बर्फामुळे अनेक वाहनं घसरतात. त्यादिवशीही असंच झालं. Cowdenbeath येथील रस्त्यावर बर्फ पसरल्याने गाड्या अडकत होत्या आणि मागे घसरत होत्या. तो रस्ता चढावर असल्याने अजूनच अवघड होत होतं. त्याच वेळी ग्राहम डेरी चा एक भलामोठा ट्रक नेमका बर्फात अडकला. ड्राइवर जोरजोरात अक्सीलरेट करत होता पण ट्रक काही केल्या पुढे सरकत नव्हता. चार्लीन यांनी ते पहिले. त्यांनी  शेजाऱ्यांना मुलांकडे लक्ष ठेवायला सांगून त्या बाहेर धावल्या. त्या भल्या मोठ्या ट्रकला मागून धक्का देऊ लागल्या. आणि आश्चर्य म्हणजे तो ट्रक पुढेही जाऊ लागला. व्हिडीओ पाहिल्यावर लक्षात येईलच.

हा व्हिडीओ जेव्हा व्हायरल झाला तेव्हा बऱ्याच जणांनी त्यांचे 'सुपरवूमन' म्हणून कौतुक केले. तर काहींनी हा पब्लिसिटी स्टंट असेही ट्रोल केलेय. जेव्हा ग्राहम डेरीने हा व्हिडीओ पहिला तेव्हा त्यांनाही आश्चर्य वाटले. त्यामुळे चार्लीन लेस्ली यांचे धाडस बघून त्यांना वर्षभरासाठी दूध आणि दुधाचे पदार्थ मोफत देण्याचे घोषित केले आहे. या अनपेक्षितपणे मिळालेल्या बक्षिसामुळे त्या भारावून गेल्या आहेत. त्या म्हणाल्या, "मी केवळ मदत म्हणून हे केलं, याचा व्हिडीओ असा व्हायरल होऊन मला बक्षिस वैगेरे मिळेल हे  त्यावेळेला माझ्या डोक्यातही नव्हतं"

हा व्हीडीओ ग्राहम डेरीने पोस्ट केला आणि या खऱ्या सुपर वुमनचे कौतुकही केले. परंतु हेही नमूद केले की असं नेहमी घडत नाही. असा प्रयत्न जीवावरही बेतू शकतो. त्यामुळे हा व्हिडिओ बघून हा स्टंट करायला जाऊ नये.

 

लेखिका : शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required