वयाच्या ९६ व्या वर्षी निवृत्त होऊन ६१ कोटी दान करणाऱ्या आजीबाई !!
जगात अनेक मोठ्या मनाचे लोक असतात. पण मोठं मन असण्यासाठी कधीकधी खिसादेखील मोठा असावा लागतो. तेव्हा कुठेतरी लोकांना मदत करता येते. पण आपल्या आजूबाजूला अनेक लोक दिसतात ज्यांचा खिसा लहान असूनही त्यांनी भरभरून मदत केलेली असते.
गोष्ट आहे अमेरिकेतल्या ब्रुकलीन शहरातली, तेथे एका लॉ फर्ममध्ये काम करणाऱ्या आजीबाई वयाच्या ९६ व्या वर्षी निवृत्त झाल्या. निवृत्त झाल्यावर त्यांनी एक रक्कम दान केली. ती किती असावी, तर तब्बल ६१ कोटी रुपये!!! त्या परिसरात एखाद्या व्यक्तीने गेल्या १२५ वर्षांत केलेले हे सर्वात मोठे दान आहे.
बरं, हे दान करणाऱ्या आजीबाई काही खूप मोठं, वेगळं आणि भलामोठा पगार मिळणारं कामही करत नव्हत्या. त्या एक सामान्य सेक्रेटरी होत्या!! एकाच ठिकाणी तब्बल ६७ वर्षं काम करणाऱ्या सिल्व्हिया ब्लूम यांच्याजवळ एवढी संपत्ती आहे, याचा पत्ता त्यांच्या कुटुंबाला देखील नव्हता. ही संपत्ती त्यांनी कशी मिळवली? तर ज्या वकिलांजवळ त्यांनी काम केले, ते कुठे आणि कशाप्रकारे गुंतवणूक करतात यावर या आजीबाईंचे लक्ष होते.
जेव्हा एखादा वकील एखाद्या फर्ममध्ये स्टॉक विकत घेत असे, तेव्हा ही आजीबाई देखील आपल्या पगारातल्या काही पैशांनी स्टॉक्स विकत घेत असे. असे करत करत आजीबाई चक्क ६७ कोटींची मालकीण होऊन बसली. आणि ही गोष्ट तिच्या जवळच्या लोकांना सुद्धा माहीत झाली नाही. जेव्हा सगळ्यांना हे समजले तेव्हा त्यांना मोठा धक्काच बसला.
या संपत्तीतील काही वाटा त्यांनी आपल्या नातेवाईकांना दिला आहे आणि ६१ कोटी रुपये ज्यांना योग्य शिक्षण मिळत नाही अशा मुलांच्या शिक्षणासाठी दिले आहेत.
ब्लूम यांना स्वतःचे मुलबाळ नाही. १९२९ च्या ग्रेट डिप्रेशनवेळी त्या लहानाच्या मोठ्या होत होत्या. त्यांनी त्यावेळी प्रचंड गरिबी बघितली. त्यांनी आपली डिग्री पूर्ण केली आणि १९४७ साली एका लॉ फर्ममध्ये जॉईन झाल्या तेव्हापासून पुढची ६७ वर्षं त्या तिथेच काम करत होत्या.
त्यांच्या कार्यकाळात त्यांनी १२०० हुन अधिक वकिलांसोबत काम केले आहे. ब्लूम यांचे पती २००२ मध्ये एका कार एक्सिडेंटमध्ये वारले होते. एवढी संपत्ती असूनदेखील पूर्ण आयुष्य त्या साधेपणाने जगल्या. निवृत्तीनंतर देखील स्वतःसाठी काही न ठेवता त्यांनी समाजासाठी सगळे काही दान केले. असे लोक खऱ्या अर्थाने हिरो असतात.