या शेतकऱ्यांनी सुरु केलेल्या युट्युब चॅनलचे तब्बल १ कोटी फॉलोअर्स पूर्ण झालेत...वाचा त्यांची यशोगाथा!!
सोशल मिडिया ही अत्यंत फायदेशीर गोष्ट आहे. हो! म्हणजे तुम्ही त्याचा योग्य वापर करून घेतलात तर. म्हणजे पहा, सध्या जमाना व्हिडिओचा आहे. २ मिनिटांच्या व्हिडिओत कितीतरी माहिती मिळते. अगदी कुठलीही किचकट गोष्ट व्हिडिओतून चटकन समजते. आणि व्हिडिओ म्हणले की पहिला नंबर येतो तो यु-ट्यूबचा. गेले वर्षभर तर प्रत्येकजण यु-ट्यूब चॅनल काढून पैसे कमवायचा प्रयत्न करतोय. अर्थात पैसे मिळवायला यातही मेहनत आहेच. कारण तुम्ही असे काय करता की बघणारे तुम्हाला फॉलो करतील याचेही ज्ञान आवश्यक असते. पण कुठलाही वेगळी अपेक्षा न ठेवता एका गावच्या काही शेतकऱ्यांनी एकत्र येऊन एक चॅनल सुरू केले. आज त्या चॅनलचे तब्बल १ कोटींवर फॉलोवर्स आहेत आणि कमाई लाखोंच्या घरात आहे. आज पाहूयात यांची यशोगाथा.
तामिळनाडूच्या पुडुकोट्टाई जिल्ह्यातील चिन्ना वीरमंगलम या गावचे हे ६ शेतकरी आहेत. त्यांची नावं आहेत व्ही. सुब्रमण्यम, व्ही. मुरुगेसन, व्ही. अय्यानार, जी. तामिळसेल्वम, टी. मुथुमनिकक्कम आणि एम. पेरियतांबी. यांच्यामध्ये सर्वात ज्येष्ठ पेरियतांबी आहेत आणि त्यांचं वय ६४ आहे. हे आजोबा सर्वांचे मार्गदर्शक आहेत आणि विशेष म्हणजे त्यांना पारंपरिक पदार्थ बनवायचा चांगला अनुभवही आहे. या चॅनलचे नाव व्हिलेज पाककला असे आहे. या चॅनेलवर तामिळनाडूच्या पारंपारिक पाककृती दाखवल्या जातात आणि त्याही अगदी पारंपरिक पद्धतीने. कुठल्याही किचनमध्ये या रेसिपी बनवल्या जात नाहीत, तर उघड्या शेतात आणि ते ही मोठ्या प्रमाणात हे पदार्थ बनवले जातात. तमिळ भाषेत हे माहिती सांगतात. त्यांची सांगण्याची पद्धत, वेगवेगळे पदार्थ, तिथले वातावरण यामुळे जगभरात यांचे चॅनल पहिले जाते.
२०१८ मध्ये त्यांनी मिळून हे चॅनल सुरू केले. पेरियतांबी सांगतात, "एरवी ६ महिने आम्हाला शेतीत खूप काम असते, पण बाकीचे महिने फारसे काम नव्हते, म्हणून असे युट्यूब चॅनल सुरू करावे हा विचार होता. इतर सर्व भाषांमध्ये चॅनल्स आहेत, पण तमिळमध्ये फारसे नाहीत म्हणून मातृभाषेतच सुरू केला". जसजसे व्हिडिओ अपलोड होत राहिले यांची लोकप्रियता सर्वदूर पोहोचली. फक्त भारतातच नाही, तर जगभरात यांचे फॉलोअर्स वाढले.
नुकतेच त्यांचे फॉलोअर्स १ करोडच्या वर पोहोचल्यामुळे युट्यूबकडून त्यांना खास डायमंड बटन मिळाले आहे. हा एखाद्या चॅनलसाठी सर्वात मोठा क्षण असतो. त्यामुळे कमाईही खूप वाढते. सध्या यांना महिन्याला ७ लाख इतकी कमाई या चॅनलच्या माध्यमातून मिळते. पण ती कमाई ते समाजासाठी वापरत आहेत. अनेक गरीब बेघरांना ते मदत करतात. अनेक गरजूंना खायला देतात. वृद्धाश्रमात मदत करतात. आता कोविड काळात त्यांनी १० लाखांचा धनादेश मुख्य मंत्री सहाय निधीसाठी दिला आहे. मुख्मंत्री एम. के. स्टालिन यांना भेटून त्यांनी हा धनादेश दिला. यामुळे सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक झाले.
एक तमिळ चॅनल इतके लोकप्रिय होण्याची ही पहिलीच वेळ आहे. या चॅनलची लोकप्रियता दिवसंदिवस वाढत आहे. लोकांच्या पाठिंब्यामुळेच हे यश मिळाले आहे त्यामुळे यातले पैसेही लोकोपयोगी कामासाठी खर्च करायचा असा विचार करणारे हे शेतकरी खरे स्टार आहेत. त्यांच्या या निरपेक्ष भावनेला बोभटाचा सलाम!
लेखिका: शीतल दरंदळे