पूर्वी घरी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत कसे केले जायचे माहिती आहे? गूळपाणी देऊन! गूळ उसापासून तयार केलेला असल्यामुळे उच्च तापमानाला उसातल्या सुक्रोजचे विघटन होऊन ग्लुकोज व फ्रुक्टोज या शर्करा तयार होतात. त्यामुळे गुळातून त्वरित तरतरी मिळते. आज ही तरतरी देण्याचे काम चहा करतो.
चहा हा आपल्या संस्कृतीचा इतका अविभाज्य घटक बनलेला आहे की घरी आलेल्या कुणालाही पहिल्यांदा साहजिकच चहा विचारला जातो. चहा करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती जगभरात आढळून येतात. खुद्द चहाचेदेखील अनेक प्रकार आहेत. ग्रीन टी, ब्लॅक टी, आपल्याकडे बनतो तसा दूध आणि साखर घालून केलेला चहा, व्हाईट टी, पाकिस्तान-अफगाणिस्तानात बनणारा पिंक टी, चीनमधला ऊलाँग टी हे सगळे चहाचेच प्रकार.
असाच एक चहा तिबेटमध्ये मिळतो. याला प्युएर टी असे म्हणतात. हा चहा औषधी आहे आणि तो अगदी पन्नास वर्षेसुद्धा टिकतो. हा चहा तयार करताना चहाची पाने दोन वेळा आंबवली जातात. या प्रकारचा चहा चीनच्या युनान प्रांतात पारंपरिक पद्धतीने बनवला जातो. या प्रदेशात वाढणार्या वाइल्ड ओल्ड ट्री नावाच्या झाडाच्या पानांपासून तो तयार करतात. हा चहा सुट्ट्या चहापत्तीच्या किंवा वड्यांच्या स्वरूपात बाजारात विकला जातो. इतर आंबवलेल्या पदार्थांप्रमाणे प्युएर टी शरीराला अनेक पोषकद्रव्ये पुरवतो. या चहामुळे वजन नियंत्रित राहते, पचन मार्गातील उपयुक्त जिवाणूंचे पोषण होते, कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित राहते, कर्करोगाच्या पेशींची वाढ खुंटते, यकृताचे आरोग्य सुधारते असे अनेक समज आहेत. मात्र यावर अजूनही संशोधन सुरू आहे. चहाच्या वड्यांपासून चहा तयार करताना वडी भांड्यात ठेवून त्यावर उकळते पाणी ओततात. नंतर हे पाणी काढून टाकले जाते. हीच क्रिया परत एकदा केली जाते. अशाप्रकारे वडी किंवा चहापत्ती व्यवस्थित धुतली गेल्यानंतर उत्तम स्वादाचा चहा तयार होतो. नंतर या भांड्यात उकळते पाणी टाकून दोन मिनिटे चहा त्यात मुरवला जातो.












