computer

फोमो आणि टीना कोण आहेत? त्यांच्या असण्या नसण्याने शेअर मार्केटमध्ये काय उलथापालथ होते?

तुम्ही शेअर बाजारात नवखे असाल तर या जोडीला तुम्ही ओळखत नसणार हे नक्की. पण कदाचित त्यांच्यामुळेच तुम्ही नुकताच शेअरबाजारात प्रवेश केला असणार. कोण आहेत हे फोमो आणि टीना? हे कोणत्याही जोडप्याचं नाव नाही. हे गेल्या मार्चनंतर शेअरबाजारात आलेल्या नवख्या गुंतवणूकदारांच्या शेअर बाजारातले प्रवेशाचे दरवाजे आहेत. फोमो म्हणजे Fear of missing out आणि टीना म्हणजे There is no alternative.

आधी फोमो म्हणजे Fear of missing out म्हणजे काय ते समजून घेऊ या. फोमो म्हणजे हातात असलेली संधी वेळीच न घेतल्याने ती निसटून जाण्याची खंत!

हा एक मानसिक विचार प्रवाह आहे जो सर्वकालीन असतो. लसीकरण हे त्याचे नवे उदाहरण आहे. जेव्हा सहज लस उपलब्ध होती तेव्हा न घेतल्यामुळे वाटणारी हळहळ म्हणजे संधी हातातून निसटल्याची जाणीव, आणि पुन्हा तसे होऊ नये असे वाटणे म्हणजे फोमो. अर्थात अशी अनेक उदाहरणे देता येतील

-- पुण्यात सिंहगड रोडला एकेकाळी स्वस्तात घर मिळत होते, आता सिंहगड रोडला घर घेणे परवडत नाही.

-- गेल्या वर्षी भेटलेल्या मुलीलाच होकार दिला असता तर बरे झालं असतं.. वगैरे वगैरे.. थोडक्यात, मानवी मनाला संधी हुकण्याची वाटणारी भीती म्हणजे फोमो.

तर या भीतीचा आणि शेअर बाजाराचा काय संबंध आहे ते समजून घेऊया.

मार्च २०२० च्या दरम्यान शेअर बाजार कोसळला. त्यानंतरच्या तिमाहीत तो दुपटीने उसळून वर आला. ती मार्च २०२०ची गुंतवणूकीची संधी ज्यांच्या हातातून निसटली ते आता गेल्या सहा सात महिन्यात नव्याने शेअर बाजारात गुंतवणूक करत आहेत. खिशात असलेले पैसे मिळेल ते शेअर घेण्यासाठी वापरत आहेत. आधी झालं ते झालं, यावेळी तो चान्स हुकता कामा नये या भावनेतूनच ही गुंतवणूक होते आहे. शेअर बाजाराचा इंडेक्स सरसरून वर जाण्याचे हे महत्वाचे कारण आहे. फोमोला एकेकाळी miss the bus असेही म्हटले जायचे. १९४० साली ब्रिटिश पंतप्रधानांनी हा वाक्प्रचार पहिल्यांदा वापरला होता. त्याचेच नवे रुप म्हणजे फोमो!

आता टीना म्हणजे काय ते पण समजून घेऊ या. "There is no alternative" (TINA) म्हणजे आता काहीच पर्याय शिल्लक नाही. एकच रस्ता शिल्लक आहे. हाच शेवटचा मार्ग शिल्लक आहे असे वाटणे म्हणजेच टीना! हा शब्दप्रयोग पण ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या- म्हणजे मार्गारेट थॅचर- यांच्या भाषणातला आहे फोमो आणि टीनाची तुलना करायची झाल्यास टीना ही पण मानवी भावना आहे जी वारंवार उफाळून येते, पण फोमो ही भावना चिरकालीन स्वरुपाची आहे. येत्या काही दिवसात कोव्हीडची धास्ती कमी झाली की टीना दिसेनाशी होईल. फोमो मात्र या नाही त्या स्वरुपात शेअर बाजारात कायम असलेली भावना असते.

आता टीनाचा शेअरबाजाराशी काय संबंध आहे ते समजून घेऊया. सध्या जे लोक घरीच बसलेले आहेत, घरून काम करत आहेत त्यांच्या घरखर्चाचे प्रमाण घटलेले आहे. पती- पत्नी दोघेही काम करत असतील तर घरात बरीच बचत शिल्लक आहे. बँकेत मिळणारे व्याज फारच तुटपुंजे आहे. सोबतच भविष्यकाळासाठी तरतूद करून ठेवण्याची सक्ती पण मनाला छळते आहे. यामुळे बरेचसे सुशिक्षित तरुण शेअरबाजारात गुंतवणूक करत आहेत. थोडक्यात, दुसरा पर्याय शिल्लक नसल्यामुळे त्यांचे भांडवल शेअर बाजारात गुंतवले जात आहे. हा आहे टीना इफेक्ट!

आता या दोन्हींचा बाजारावर पडणारा फरक बघा.

१. गेल्या १३९ दिवसांत शेअरबाजारात गुंतवणूक करणार्‍यांची संख्या ६ कोटीवरून ७ कोटीपर्यंत पोहचली आहे.

२. या आधी इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदार येण्यासाठी ९३९ दिवस म्हणजे जवळजवळ ३ वर्षे लागली होती.

३. यापैकी ३८% गुंतवणूकदार ३० ते ४० वयोगटातील आहेत. २४% नवे लोक २० ते ३० या वयोगटातले आहेत. १३ % ४० ते ५० वयोगटात मोडतात. म्हणजे नव्याने दीक्षा घेणार्‍यात तरुण वर्ग पुढे आहे.

४. बाजारात आलेली भरती tech-savvy म्हणजे संगणक वापरणार्‍या नव्या पिढीची आहे.

५. झिरोधासारख्या अनेक नव्या वेब अ‍ॅप्लीकेशन्समुळे ही संख्या वाढत जाते आहे.

जर तुम्ही या वर्गात मोडत असाल तर आता फोमो आणि टीना या दोन्ही शब्दांशी तुमची ओळख करून दिलीच आहे. पण शेअर बाजारात नव्याने प्रवेश करणार्‍यांना 'बोभाटा' काय सांगते आहे ते आता वाचा!

१. फोमोला बळी पडू नका. फोमोने झपाटलेले गुंतवणूकदार सारासार विचार करत नाहीत. अनोळखी क्षेत्रात चौकशी न करता पैसे गुंतवतात. फोमोची भावना सार्वत्रिक झाली की बाजारात गुंतवणूक करण्याचे चक्रीवादळच तयार होते. या वादळाच्या सुरुवातीला गुंतवणूक करून वेळीच नफा घेणे ही योग्य 'इन्व्हेस्टमेंट पॉलीसी'आहे. परंतु नव्याने आलेले गुंतवणूकदार नफा घेऊन बाहेर पडण्याच्या ऐवजी कागदावर दिसणार्‍या नफ्यावर समाधान मानतात. गुंतवणूकीच्या वार्‍याचे हळूहळू चक्रीवादळ होताना तुमच्या नजरेस येईल. ते सुरु झाल्यावर जो लवकर नफा घेईल ते सुरक्षित असेल, पण वेळीच बाहेर न पडणारे वादळाच्या शेवटच्या टप्प्यात मोठ्या उंचीवरून खाली पडतील. थोडक्यात, जर पैसे गुंतवले असतील तर वेळीच बाहेर पडा.

२. शेअर बाजार पैसे घालवण्याची भीती आणि पैसे कमावण्याची हाव या दोन टोकांतच अस्तित्वात असतो. हा एक मानसिक खेळ आहे. टोकाची हाव इथे नेहेमीच धोका देते. एक सुंदर कथा इथे देण्याचा आम्हाला मोह होतो आहे. कथा इंग्रजीत आहे, त्याचे मराठीकरण करणे अवघड आहे म्हणून जशी आहे तशीच देतो आहे.

“Have you ever heard how they catch monkeys in Brazil, ? . . . Let me tell you. They put a nut in a bottle, and tie the bottle to a tree. The monkey grasps the nut, but the neck of the bottle is too narrow for the monkey to withdraw its paw and the nut. You would think the monkey would let go of the nut and escape, wouldn’t you? But it never does. It is so greedy it never releases the nut and is always captured. Remember that story,. Greed is a dangerous thing. If you give way to it, sooner or later you will be caught.”

३. प्रचाराला बळी पडू नका.

शेअरबाजारात तेजी आली की प्रचाराचे पेव फुटते. अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणारे गुंतवणूकदार प्रचारात हिरीरीने भाग घेतात. आपण सहा महिन्यात पैसे कसे दुप्पट केले त्याच्या कथा सांगतात. 'शेअर बाजार शिका' असे सांगणारे वर्ग जोरात सुरु होतात. लक्षात घ्या, अमेरिकेत एकेकाळी 'गोल्ड रश' म्हणजे अमुक ठिकाणी सोने सापडते आहे असे कळल्यावर जे लोक धावत गेले त्यांच्यापैकी फारच कमी लोकांना सोने मिळाले. फायदा फक्त फावडे कुदळ विकणार्‍या लोकांना झाला. एमपीएससी पास झाल्यावर कसे लाईफ बनते हे सांगणार्‍या क्लासवाल्यांचे 'लाईफ' जास्त चांगले बनते. थोड्क्यात, तेजीच्या या वळणावर सुरुवात करताना सीन-शॉट समजून घ्या आणि त्यानंतरच गुंतवणूक करा.

४. म्हणजे आम्ही या बाजारात गुंतवणूक करायचीच नाही असे तुम्हाला सांगायचे आहे का?
नाही. आमचे म्हणणे तसे नाही. पण पाण्याच्या खोलीचा आणि प्रवाहाचा अंदाज घेऊनच उडी मारा. हा काळ अभ्यासासाठी उत्तम आहे. बाजार खाली पडताना तुम्ही बघितला आहे, तो वर जाताना पण तुम्हाला दिसेल आणि पुन्हा एकदा खाली येताना दिसेल. या लाटेचा अभ्यास करण्याची ही उत्तम संधी आहे. आधी अभ्यासक व्हा आणि नंतर गुंतवणूकदार व्हा असे आमचे म्हणणे आहे.

५. शेअर बाजारातील मोठे गुंतवणूकदार म्हणतात ते खोटे आहे का?

(राकेश झुनझुनवाला)

काही दिवसांपूर्वी सध्याचे बीग बुल राकेश झुनझुनवाला म्हणाले होते, "अभी कोई लेगा नही - पाच साल बाद कोई बेचेगा नही." काल रामदेव अगरवाल यांनी इंडेक्स २.००.००० उंची बघेल असे म्हटले आहे.

अशा तज्ञ व्यक्ती जेव्हा काही सांगत असतात तेव्हा ते संदर्भासहित वाचावे. या सर्वांचे सांगणे असे आहे की 'लाँग टर्म' म्हणजे पाच ते सात वर्षांच्या कालावधीत भरपूर पैसे कमावता येतील. त्यांचा हा आशावाद निरर्थक नाही. जर गुंतवणूक केल्यावर पाच ते सात वर्षे थांबण्याची तुमची तयारी असेल तर हे लागू पडते. शेअरबाजार हा रातोरात श्रीमंत होण्याचा रस्ता नाही. ही पण एक शेतीच आहे. आज बियाणं पेरा आणि भविष्यात त्याचा फायदा घ्या. वेळीच कापणी करा आणि धान्य जमवून ठेवा. अवकाळी पाऊस शेअरबाजारात कोणत्याही क्षणी येऊ शकतो.

६. आपण सगळेच या बाजारात 'रिटेल इव्हेस्टर' म्हणजे किरकोळ खरेदी विक्री करणार्‍यांमध्ये मोडतो. या वर्गाने कितीही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली तरी तेजी आणि मंदी यावर या वर्गाचा ताबा आता शिल्ल्क राहिलेला नाही. हे फक्त हर्षद मेहताच्या जमान्यात शक्य होते. बाजाराचा ट्रेंड बदलणे हे संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या म्हणजे म्युच्युअल फंड- देशी गुंतवणूक संस्था Domestic institutional investors(DII) - परदेशी गुंतवणूक संस्था Foreign institutional investors (FII)आणि हेज फंड यांच्या हातात असते. त्यामुळे सावध गुंतवणूक हा एकच पर्याय आपल्याकडे असतो आणि त्याचा सराव करावा लागतो. त्यामुळे 'पेनी शेअर्स' म्हणजे एरवी २/३ रुपयात मिळणारे शेअर्स आणि स्मॉल कॅप शेअर्स 'उडायला' सुरुवात झाली की तेजीने टोक गाठले आहे असे समजा आणि निर्णय घ्या.

तारतम्याचा अंत झाला की तेजी संपुष्टात येते ते तत्व लक्षात ठेवूनच व्यवहार करा हाच आमचा तुम्हाला संदेश आहे!!

सबस्क्राईब करा

* indicates required