पहिल्याच सामन्यात शून्यावर बाद ते IPL गाजवणारा खेळाडू... असा झाला ऋतुराज गायकवाडचा प्रवास!!
महाराष्ट्राने आजवर भारतीय क्रिकेट संघाला अनेक दिग्गज दिले. सर्वात जास्त ताकदीचे खेळाडू महाराष्ट्रानेच दिले असे म्हटले तरी हरकत नाही. मराठी तरुणांनी आजवर आपल्या कर्तृत्वाने भारतीय संघाला नव्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. आता याच यादीत एक नवे नाव जोडले जात आहे.
ऋतुराज गायकवाड या मराठमोळ्या खेळाडूची श्रीलंका दौऱ्यासाठी निवड झाली. धोनीच्या मनावर गारुड केलेला खेळाडू म्हणून ऋतुराजला ओळखले जात होते. त्याच्या निवडीने 'बंदे मे दम है' ही गोष्ट सिद्ध होत आहे.
ऋतुराज वयाच्या १९ व्या वर्षी महाराष्ट्राच्या टीमकडून रणजी ट्रॉफीत पहिल्यांदा खेळला होता. अनेक मोठ्या खेळाडूंच्या बाबतीत घडलेली आणि एकार्थाने शुभसंकेत मानली जाणारी गोष्ट म्हणजे आपल्या पहिल्याच सामन्यात शून्यावर आऊट होणे. इंग्लंड लायन्सविरुद्ध खेळताना तो शून्यावर बाद झाला होता. पण त्यानंतर मात्र त्याचा आलेख उंचावत गेला.
भारतासाठी खेळताना ऋतुराजने धडाकेबाज खेळी दाखवली आहे. श्रीलंका आणि वेस्ट इंडिजच्या या संघांना त्याने घाम फोडला. या काळातील त्याची कामगिरी वेधक होती. पुढे त्याची २०१८ साली देवधर ट्रॉफी आणि एसीसी एमर्जिंग टीम आशिया कपसाठी पण निवड झाली.
आयपीएल २०१८ साठी चेन्नईने त्याला खरेदी तर केले पण एकही सामना त्याला खेळायला मिळाला नाही. तर २०२० सालचे आयपीएल सुरू व्हायच्या आधीच त्याला कोरोना झाला. पण कोरोनाला हरवून त्याने जोरदारपणे बॅटिंग करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. बँगलोर आणि कोलकाता विरुद्ध केलेले अर्धशतक चेन्नईला मजबूत करून गेले. खुद्द धोनीला त्याच्यात चमक दिसत होती.
कुठलीही क्रिकेटची पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातून ऋतुराज आला आहे. तो मुळचा पुण्याचा. त्याचे वडील डीआरडिओमध्ये अधिकारी आहेत तर आई शिक्षिका आहेत. एकत्र कुटुंबात तो मोठा झाला आहे. लहानपणापासूनच त्याला क्रिकेटचे वेड होते. हे वेड पुरेपूर जोपासत त्याचा प्रवास आज थेट भारतीय संघात निवड होण्यापर्यंत झाला आहे. पुढे ऋतुराज काय कामगिरी करतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
या मराठमोळ्या खेळाडूला बोभाटातर्फे खूप खूप शुभेच्छा!!