मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

युरोपातल्या ‘ब्लॅक नाइटस्’ फिल्म फेस्टिव्हलमध्ये इतिहासात पहिल्यांदाच झळकणार मराठी सिनेमा - 'त्रिज्या'!!

4 मिनिट वाचन
शेअर करा:
युरोपातल्या ‘ब्लॅक नाइटस्’ फिल्म फेस्टिव्हलमध्ये इतिहासात पहिल्यांदाच झळकणार मराठी सिनेमा - 'त्रिज्या'!!

उत्तर युरोपात इस्टोनिया नावाचा देश आहे. टॅलिन ही त्याची राजधानी. तिथं होणाऱ्या ‘ब्लॅक नाइटस्’ या अतिशय मानाच्या फिल्म फेस्टिवलसाठी अक्षय इंडीकर दिग्दर्शित ‘त्रिज्या’ या सिनेमाची निवड करण्यात आली आहे. हा ‘ब्लॅक नाइटस्’ फिल्म फेस्टिवल दि. १५ नोव्हेंबर २०१९ ते १ डिसेंबर २०१९ या कालावधीत संपन्न होणार आहे.  जगात फक्त १४ ‘अ’ दर्जाचे फिल्म फेस्टिवल आहेत असं मानलं जातं. त्यांपैकी ‘ब्लॅक नाइटस्’ हा एक अतिशय महत्त्वाचा फिल्म फेस्टिवल मानतात. या सोहळ्यात जगभरातल्या ७८ देशांमधून येणाऱ्या विविध सिनेमांपैकी २५० सिनेमे  दाखवले जातात. आणि थोडेथोडके नाहीत, तर साधारण ८०,००० सिनेरसिक जगभरातून या फेस्टिवलला हजेरी लावतात.

या फेस्टिवलमध्ये झळकणारा त्रिज्या हा पहिला मराठी सिनेमा असणार आहे. या आधी चीनमध्ये संपन्न झालेल्या ‘एशियन न्यू टॅलेंट अवॉर्ड’ या अतिशय मानाच्या समजल्या जाणाऱ्या फेस्टिवलमध्ये ‘त्रिज्या’ प्रदर्शित करण्यात आला होता. त्यावेळी जगातल्या अतिशय नामांकित अशा ‘द हॉलीवूड रिपोर्टर’ या ८८ वर्षे जुन्या आणि ‘स्क्रीन इंटरनॅशनल’ या १२२ वर्षे जुन्या मासिकात त्रिज्याचे वेगळेपण दर्शविणारे परिक्षणात्मक लेख झळकले. त्रिज्यावर जगभरातून कौतुकाचा वर्षाव झाला. टॅलिनमध्ये होणाऱ्या या सोहळ्यात जगभरातून आलेल्या विविध भाषांतल्या, विविध देशांतल्या हजारो सिनेमांमधून ‘त्रिज्या’ या एकमेव व पहिल्या मराठी सिनेमाची निवड होणे ही मराठी सिनेमाच्या इतिहासातील विलक्षण अशी घटना आहे. मराठी सिनेमासाठी व सिनेरसिकांसाठीही ही बाब नक्कीच कौतुकाची ठरणार आहे.

यापूर्वी ज्येष्ठ मराठी साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्या जीवनावर आधारलेल्या मराठीतल्या पहिल्या Docu-Fiction सिनेमामुळे मूळचे सोलापूरचे असणारे अक्षय इंडीकर यांचे नाव चर्चेत आले होते. तसेच या सिनेमाचा वेगळा बाज अनेकांच्या पसंतीसही उतरला होता. त्यामुळे अक्षय इंडीकर यांच्या आगामी सिनेमाची वाट अनेक सिनेरसिक अवर्जून पाहात होते. कान्स येथे झालेल्या फिल्म फेस्टिवलमध्ये त्रिज्याचा ट्रेलर दाखविण्यात आला होता.

चित्रकथी निर्मितीचे अरविंद पाखले, तसेच फिरता सिनेमा आणि बॉम्बे बर्लिन फिल्म  प्रॉडक्शन्सचे अर्फी लांबा व कॅथरीना झुकाले यांनी ‘त्रिज्या’ या सिनेमाच्या निर्मितीस हातभार लावला. बॉम्बे बर्लिन फिल्म्स हे इंडो-जर्मन प्रॉडक्शन हाऊस आहे. भारत आणि जर्मनी या दोन देशांची निर्मिती असलेला त्रिज्या हा मराठीतला अद्वितीय सिनेमा असणार आहे. या सिनेमाच्या लेखनाची, दिग्दर्शनाची आणि संकलनाची जबाबदारी २७ वर्षीय अक्षय यांनी पेलली आहे. सिनेमातली प्रमुख भूमिका अभय महाजन यांनी साकारली आहे. त्यांच्यासोबत श्रीकांत यादव, गजानन परांजपे, चंदू धुमाळ, सोमनाथ लिंबरकर, वर्षा मालवडकर आणि गिरिश कुलकर्णी प्रमुख भूमिकेत आहेत. सिनेमाचे छायांकन स्वप्नील शेटे आणि अक्षय इंडीकर या दोघांनी मिळून केले आहे.

आजच्या काळात एक चांगला सिनेमा तयार करणे ह्या गोष्टीइतकीच तो सिनेमा व्यवस्थित पद्धतीने लोकांपर्यंत-जाणकार रसिकांपर्यंत घेऊन जाणे ही गोष्ट महत्त्वाची होऊन बसली आहे. त्यासाठी त्रिज्याची संपूर्ण टीम सातत्याने झटते आहे. शांघाय येथे झालेल्या ‘एशियन न्यू टॅलेंट अवॉर्ड’ या पुरस्कार सोहळ्यात प्रदर्शित झालेला त्रिज्या अनेकांच्या कौतुकाचा विषय ठरला होता. त्या सोहळ्याला उपस्थित जगभरातल्या अनेक प्रसिद्ध दिग्दर्शकांनी अक्षय इंडीकर यांची पाठ थोपटली होती. ‘एशियन न्यू टॅलेंट अवॉर्ड’ नंतर ‘ब्लॅक नाइटस्’ फिल्म फेस्टिवलमध्ये झालेल्या निवडीने ‘त्रिज्याचा’ आणि त्या अनुषंगाने मराठी सिनेमाचा आलेख उंचावत गेल्याचे दिसून येत आहे. भारतभरातल्या सिनेरसिकांसाठी ही नक्कीच अभिमानाची बाब आहे.

सिनेमाविषयी सांगताना अक्षय इंडीकर म्हणाले की, "आयुष्यभर आपण स्वत:लाच समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. तसेच आपल्या अवती-भोवती घडणाऱ्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. सिनेमाचं कथानक लिहित असतांना आपण स्वत:च्याच आयुष्याची गोष्ट मांडावी का? असा विचार डोक्यात आला. त्यातूनच या सिनेमाची निर्मिती झाली”. पुढे ते म्हणाले की, “हा चित्रपट म्हणजे माझ्या आयुष्यावरील बायोग्राफी नाही. तर हा सिनेऑटोबायोग्राफी म्हणायला हरकत नाही. कोणतीही चांगली कलाकृती आत दडलेल्या भावना. इच्छा, आकांशा, आठवणी किंवा स्वप्नांमधूनच बाहेर येते.

आशियातील एका महत्त्वाच्या चित्रपट महोत्सवापासून सुरू झालेला हा त्रिज्याचा प्रवास अक्षय इंडीकर यांच्यासारख्या मध्यमवर्गीय घरातून आलेल्या तरुण दिग्दर्शकांना प्रेरणा देत आहे. मराठी सिनेमाचं स्वरुप केवळ नाचगाणी आणि क्षणिक मनोरंजनाचं साधन यातच कुठेतरी घुसमटलेलं असल्याने, त्यातून बाहेर पडून स्वतःला हवा तसा सिनेमा करणे, कलात्मक तडजोड न करताही, प्रेक्षकांना काय आवडेल याची सांगड घालणे आणि ही तारेवरची कसरत करत मराठी सिनेमा मानवी जीवनाचा वास्तववादी आरसा म्हणून जगासमोर आणणे गरजेचे आहे. मराठी सिनेमाची त्रिज्या सतत विस्तारित राहावी यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील राहूच असं अक्षय यांनी सांगितलं.

संबंधित लेख