डायमंड क्रॉसिंग फक्त नागपुरातच आहे ?? प्रत्येक नागपूरकराने हे वाचलंच पाहिजे !!
इंटरनेटचा प्रसार झाल्यापासून अनेक ‘ज्ञानवर्धक’ गोष्टी व्हायरल होत असतात. नागपूरच्या रेल्वे स्थानकाची एक बातमी अशीच व्हायरल झाली आहे.
या बातमीत लिहिलंय की भारतातील एकमेव डायमंड क्रॉसिंग नागपूर मध्ये असून या भागातून भारताच्या चारी दिशेला रेल्वे मार्ग गेले आहेत. हा भारताचा मध्यबिंदू आहे. नागपूरकरांसाठी आणि महाराष्ट्रासाठी हा अभिमानाचा विषय आहेच. पण या व्हायरल ‘ज्ञानवर्धक’ मेसेज मध्ये काही गंभीर चुका आहेत. त्याबद्दल आज जाणून घेऊया.
आधी समजून घेऊया डायमंड क्रॉसिंग म्हणजे काय ?
डायमंड क्रॉसिंग म्हणजे अशी जागा जिथे २ पेक्षा जास्त रेल्वे लाईन्स येऊन मिळतात. या लाईन्स जिथे एकमेकांना छेदतात त्या भागात हिऱ्यासारखा आकार तयार होतो. त्यामुळे त्याला डायमंड क्रॉसिंग म्हणतात. या प्रकारचं क्रॉसिंग दुर्मिळ असतं. अभिमानाची गोष्ट अशी की भारतात नागपूर हे एकमेव ठिकाण आहे जिथे हा योग जुळतो.
आता समजून घेऊया ‘नागपूर डायमंड क्रॉसिंग’ बद्दल काही तथ्य :
१. नागपूर मधल्या डायमंड क्रॉसिंग ४ दिशांना जात नसून ३ दिशांना जातात.
१. गोंदिया, हावडा (पूर्व)
२. दिल्ली (उत्तर)
३. तिसरी लाईन वर्धाकडे जाते. वर्धाला जाऊन त्यात फाटे फुटतात. एक लाईन मुंबईला वळते तर दुसरी दक्षिणेला काझीपेटला जाते.
२. तीन दिशांना गाड्या जाऊनही फोटोत ४ दिशांना जाणाऱ्या रेल्वे लाईन्स कशा दिसतात ?
याचं कारण असं की दिल्लीकडे जाणाऱ्या रेल्वे लाईनला नागपूरच्या यार्ड मधून येणारी लाईन जोडली गेली आहे. त्यामुळे या ठिकाणी डायमंड क्रॉसिंग तयार झाला आहे.
३. खऱ्या अर्थाने जिथे चारी दिशांना जाणाऱ्या रेल्वे लाईन्स एका ठिकाणी मिळतात ती जागा आहे इटारसी जंक्शन. या ठिकाणाहून खऱ्या अर्थाने चारही दिशांना गाड्या धावतात. हे तुम्ही नकाशात पाहू शकता.
मंडळी, हे या मागील सत्य असलं तरी नागपूरकरांच्या अभिमानात कुठेच कमीपणा येणार नाही. नुसत्या डायमंड क्रॉसिंग भारतात दिल्ली, भुसावळ, धनबाद आणि एर्नाकुलम येथे आहेत, पण नागपूरच्या क्रॉसिंगला डबल डायमंड क्रॉसिंग म्हणून ओळखलं जात आणि त्याला रेल्वेमध्ये खास मान आहे.
नागपूरकरांनो या मेसेजला जास्तीत जास्त पसरवायला विसरू नका !!