computer

भारताचा ७६ वा स्वातंत्र्यदिन- युटी कांग्री या ६०७० मीटर उंच शिखरावरती ७६ भारतीय ध्वजांचं ध्वज-तोरण !!!

बोभाटाचे  गिर्यारोहक मित्र वैभव पांडुरंग ऐवळे यांची ओळख त्यांच्या लेखातून बोभाटाच्या वाचकांना आहेच.वैभवने भारताच्या ७२ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर माउंट किलीमांजारो सर करून ७२ भारतीय ध्वजांचे ध्वज-तोरण फडकावून विश्व-विक्रम स्थापित केला होता. नुकत्याच पार पडलेल्या आषाढी वारीत वैभवने अवयवदानाच्या सामाजिक संकल्पनेचा पाठपुरावा केला होता.आज वैभव आणि त्याचे गिर्यारोहक मित्र भारताचा ७६ वा स्वातंत्र्यदिन  युटी कांग्री या ६०७० मीटर उंच शिखरावरती ७६ भारतीय ध्वजांचं ध्वज-तोरण फडकवण्यासाठी लडाखला पोहचले आहेत. वैभवच्या टीममध्ये  गिर्यारोहक वैभव ऐवळे (मुंबई), गिर्यारोहक बाळकृष्ण जाधव (सोलापूर), गिर्यारोहक निलेश माने (कल्याण) यांचा समावेश आहे.

वैभवची टीम गेल्या ६ महिन्यांपासून मोहिमेची तयारी करत आहे. हाई अल्टीट्युडवर ऑक्सिजनची कमतरता असते, शून्याखाली तापमान, वेगाने वाहणारे वारे, स्नो फॉल, मोरेन्स आणि इतर आव्हानांना तोंड देत हिमालयाची शिखरे सर करावी लागतात. हे शिखर सर करून "एम्ब्रेस गर्ल चाईल्ड" हा संदेश देत ही मोहीम देशातील सर्व भगिनींना समर्पित करत असल्याचे बाळकृष्ण जाधव यांनी सांगितले.

२४ जुलै रोजी रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीत दुर्घटनेत मृत व्यक्तींना श्रद्धांजली समर्पित करणार असल्याचे निलेश माने यांनी सांगितले.

अमृतमहोत्सवी वर्षी इस्रो ने चंद्रयान -३ लॉंच केलं ते पूर्णपणे यशस्वी व्हावा या करता सदर मोहीम इस्रोला समर्पित करत असल्याचं वैभव ऐवळे यांनी सांगितलं.

गतवर्षी या टीमने देश स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवात पदार्पण करत असताना माउंट युनाम (६११० मी.) वरती आणि स्वातंत्र्याची  ७५ वर्ष पूर्ण झाल्यानंतर माउंट जो जंगो (६२५० मी.) आणि कांग यात्से-२ (६२४० मी.) या शिखरांवर ७५ भारतीय ध्वजाचे ध्वज तोरण फडकावत भारताचा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिवस साजरा केला होता. ज्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये झाली होती.

तत्पूर्वी वैभव ऐवळे यांनी आफ्रिका आणि युरोप खंडातील सर्वोच्च शिखरे माउंट किलीमांजारो (५८९५ मी.) आणि माउंट एलब्रूस (५६४२ मी.) सर करून अनुक्रमे ७२ आणि ७३ भारतीय ध्वजांचं ध्वज-तोरण फडकावत ७२ आणि ७३ वां स्वतंत्रता दिवस साजरा केला होता. ज्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली आहे.

माउंट उटी कांगरी विषयी:
माउंट उटी कांगरी हे भारतातील लडाख येथे असलेले प्रख्यात गिर्यारोहणाचे ठिकाण आहे. हे आव्हानात्मक शिखर ६०७० मीटर (१९,९१५ फूट)  उंचीवरजाण्याचे धाडस जाण्यासाठी पाठीशी अनेक वर्षांचा चांगलाच अनुभव, शारिरीक आणि मानसीक दृष्ट्या कणखर असावे लागते.लेह शहरापासून अंदाजे ८५-९० किलोमीटर अंतरावर 'रुम्त्से फु' ह्या गावातून ट्रेक ला सुरुवात होते. 
कठीण श्रेणीत गणला जाणारा उटी कांगरी गिर्यारोहकांचा चांगलाच कस काढतो. ह्या ट्रेक दरम्यान आपले आजवर शिकलेले गिर्यारोहणाचे सर्व कौशल्य आणि तंत्र पणाला लावावे लागते. अंगावर येणारी चढाई चढताना आईस अ‍ॅक्स आणि क्रंपोन चा वापर करावा लागतो. अश्या ट्रेकसाठी लागणारा अनुभव ह्या टीम कडे आहे.

वैभव आणि त्याच्या मित्रांना आपण सर्व शुभेच्छा देऊ या !!

सबस्क्राईब करा

* indicates required