कार्डच्या मागे असलेला तीन अंकी CVV नंबर महत्वाचा का आहे ? तो कार्डच्या मागे का लिहिलेला असतो ?
मंडळी, सध्या ऑनलाइन पेमेंटचा जमाना आहे. बँकेची पायरी चढण्याची गरज सध्याच्या काळात सहसा येत नाही. ऑनलाइन ट्रांझॅक्शन तर तुम्ही करता, पण त्यातल्या बऱ्याच गोष्टी तुम्हालाच माहीत नसतात राव!! पण फिकीर नॉट मंडळी!! आम्ही इथे त्यासाठीच तर बसलोय.
दरवेळी ऑनलाइन ट्रांझॅक्शन करताना तीन अंकी CVV नंबर विचारला जातो. या नंबरशिवाय खरंतर पेमेंट होत नाही. काही बॅंक्स या कोडला सिव्हीसी कोड पण म्हणतात. मंडळी हा कोड गुप्त ठेवावा लागतो हे तर तुम्हाला माहीत असेलच.
CVV नंबरचा फुलफॉर्म आहे Card verification value. याचाच अर्थ हा व्हेरिफिकेशन नंबर असतो. यालाच कार्ड व्हेरिफिकेशन कोड पण म्हणतात.
CVV नंबरचे वैशिष्ट्य
तुमच्या क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डच्या मागच्या बाजुला मॅग्नेटिक स्ट्रिपच्या जवळ हा CVV नंबर दिसतो. मंडळी, या नंबरचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हा नंबर सहसा कुठेच सेव्ह होत नाही. तुम्ही बऱ्याचवेळा बघितले असेल की ऑनलाइन ट्रांझॅक्शनच्या वेळी तुमच्या कार्डचे डिटेल्स आपोआप सेव्ह होतात आणि जेव्हा पुढच्या वेळी तुम्ही पेमेंट करता तेव्हा तुम्हाला परत सगळे डिटेल्स टाकावे लागत नाही. पण तेव्हाही तुम्हाला CVV नंबर टाकावा लागतो. कारण CVV नंबर कुठेच सेव्ह होत नाही.
CVV नंबर कार्डच्या मागे का लिहिलेला असतो.
मंडळी, सध्या टेक्नोलॉजी आणि डिजिटलायजेशनचा जमाना आहे. अशावेळी कार्डवरुन पेमेंट करताना 'ओटीपी'च्या रूपात एका आणखी सुरक्षेचे कवच तुमच्याजवळ उपलब्ध असते. तरीसुद्धा शेवटी विषय पैशांचा आहे राव!! काळजी पण तशीच घेतली जायला हवी ना? मंडळी, जेव्हा तुम्ही ऑनलाइन पेमेंट करत असता तेव्हा CVV नंबर कार्डच्या मागच्या बाजूला लिहिला असल्याने तो कुणाला दिसत नाही. हे त्याचे कारण आहे. आणि काही तज्ञ तर असाही सल्ला देतात की CVV नंबर पाठ करावा, सेफ्टीसाठी कुठेतरी लिहून ठेवावा आणि कार्डवरील नंबर पुसून टाकावा जेणेकरून तो नंबर फक्त तुम्हालाच माहित असेल.
डेटा चोरीपासून संरक्षण
मंडळी CVV नंबर डेटा चोरीसारख्या मोठ्या समस्येपासून वाचण्यासाठी तुमची मदत करतो. बँकिंग रेगुलेशन्सनुसार कोणतेच मशीन CVV नंबर सेव्ह करु शकत नाही. जर एखाद्याने तुमची सगळी माहिती चोरी केली तरी CVV नंबर अभावी तो तुमचे काहीच नुकसान करू शकत नाही.
पाह्यलंत मंडळी, कार्डमागे लिहिलेला CVV नंबर किती महत्त्वाचा असतो ते. तुमचा CVVनंबर कुणाला सांगू नका, तुमचा मित्रपरिवार आणि इतर संबंधी लोक ही चूक करु नयेत म्हणून हा लेख त्यांच्यासोबतही शेअर करा..
आणखी वाचा :
ATM वर डल्ला : ATM 'स्कीमिंग' म्हणजे काय ? ते कसे ओळखाल ? त्यापासून सावध राहण्यासाठी काय कराल ?
हॅकरचा हल्ला : भाग २ - तुमच्या खात्यावर हॅकरने डल्ला मारू नये म्हणून काय कराल ??
हॅकरचा हल्ला : भाग ३ - तुमच्या खात्यावर हॅकरने डल्ला मारलाच तर काय कराल !!