computer

माउंट अथॉस: ग्रीसच्या या बेटावर महिला आणि मादी प्राण्यांना बंदी का आहे? या मागचं कारण तुम्हाला पटतं का?

धार्मिक ठिकाणी स्त्रियांना प्रवेश बंदी करण्याची प्रथा तशी खूप जुनी आहे. आजच्या काळातही अनेक ठिकाणी या प्रथेचे पालन केले जाते. दोन वर्षापूर्वी भारतात शबरीमाला मंदिर प्रवेशाचा प्रश्न चांगलाच ऐरणीवर आला होता. फक्त भारतातच नाही, तर अशा प्रथा जगभरात पाळल्या जातात. प्रत्येक धर्मात स्त्रियांना मर्यादित प्रमाणात धार्मिक अधिकार दिलेले आहेत. आज आपण अशाच एका ठिकाणाची माहिती घेणार आहोत जिथे गेल्या हजार वर्षांपासून स्त्रियांचा प्रवेश निषिद्ध मानण्यात आला आहे आणि आजही तितक्याच काटेकोरपणे ही प्रथा पाळली जात आहे.

माउंट अथॉस नावाने ओळखले जाणारे हे ठिकाण ग्रीस जवळील ३३५ चौ. किमी परिसरात पसरलेला एक मोठा द्वीपकल्प आणि पर्वत आहे. इतक्या मोठ्या परिसरात एकही स्त्री सोडा, पण पाळीव प्राण्यातील मादीही तुम्हाला दिसणार नाही. हो, इथे पाळीव प्राण्यांच्या माद्यांनाही प्रवेश निषिद्ध आहे. या बेटाच्यास्तरीय किनाऱ्यापासून ५०० मी. अंतरावरील परिघातही स्त्रिया प्रवेश करू शकत नाहीत. पुरुषांना इथे प्रवेश दिला जात असला तरी त्यांना इथल्या मठांची परवानगी मिळवावी लागते. शिवाय, या पुरुषांना दाढी आली पाहिजे ही इथली प्राथमिक अट आहे. ज्या पुरुषांना दाढी येत नाही त्यांना इथे प्रवेश दिला जात नाही. लहान मुलांनाही काहीसा असाच नियम आहे. या पर्वतावर येणाऱ्या लहान मुलासोबत त्याचे वडील असलेच पाहिजेत. वडील किंवा कोणी पुरुष पालक सोबत नसतील तर दहा ते अठरा वर्षे वयोगटातील मुलांनाही इथे प्रवेश दिला जात नाही. कदाचित कुणी महिला किंवा मुलगी अशा प्रकारे वेश बदल करून पर्वतावर प्रवेश करू शकते, अशी शक्यता गृहीत धरून हा नियम बनवण्यात आला आहे.

या द्वीपकल्पावर रशियन संतांचे खूप सारे मठ आहेत. गेल्या हजार वर्षापासून इथे स्त्रियांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. दहाव्या शतकापासून इथे ही बंदी घालण्यात आली असावी असा अंदाज आहे. अर्थात, धार्मिक ठिकाणी स्त्रियांना प्रवेश दिला जात नाहीच, हे सामान्यपणे सर्वांनीच गृहीत धरलेले असते त्यामुळेच आजवर या बंदीविरोधात कुणीही काही बोलत नाही. इथे स्त्रियासंबधी इतर कसलीच टिप्पणी केली जात नाही. दहाव्या शतकातील एका बखरीत असेही म्हटले आहे की, महिला आणि मादी प्राण्यांना इथे बंदी राहील. हा नियम फक्त पाळीव प्राण्यांविषयी आहे, जंगली प्राण्यांविषयी नाही. पाळीव प्राण्यांतही फक्त मांजर या नियमाला अपवाद आहे. अर्थातच फक्त उंदरांवर उतारा म्हणून. कडक ब्रह्मचर्य पाळणाऱ्या या संतांना इथे मांजर कशी काय चालते विचारले तर अर्थातच त्याकडे कानाडोळा करून रिकामे होतात.

कडक ब्रह्मचर्य पाळण्यासाठी हाच एकमेव खात्रीचा मार्ग आहे. इतर ख्रिश्चन मठ आणि अथॉस मधील मठामध्ये फरक आहे तो हाच. इथे अनेक मठ आहेत. मग या मठामध्ये जायला बंदी घालणे ठीक आहे, पण पूर्ण बेटावरच प्रवेश निषिद्ध का केला असावा? कारण, या संतांच्या मते, हा संपूर्ण द्वीपकल्प हाच एक मठ आहे. त्यांच्या पुराणकथानुसार या द्विपाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

पवित्र मेरीला सायप्रस प्रदेशातून हाकलून देण्यात आले तेव्हा तिने माउंट अथॉसचाच आश्रय घेतला. हे बेट तिला इतके आवडले की तिने आपल्या पुत्राला हे बेट तिलाच देण्याची मागणी केली आणि त्याने ती मान्य केली. या भूमीला आजही देवाच्या आईची भूमी म्हटले जाते. याठिकाणी ती एकटीच समस्त महिला वर्गाचे प्रतिनिधित्व करते. तिच्याशिवाय, इतर कुणाही स्त्रीला इथे प्रवेश दिला जाऊ शकत नाही.

पाळीव प्राण्यांतही मादी पाळली जात नाही त्यामुळे इथे दूध आणि इतर दुग्धजाण्य पदार्थही बाहेरून आयात करावे लागतात. कोंबडी नसल्याने इथे अंडीही बाहेरूनच आणली जातात.

स्त्रियांना प्रवेश निषिद्ध असला तरी, इथे स्त्रियांनी प्रवेश केल्याच्या काही अपवादात्मक घटना घडलेल्या आहेत. १९५३ साली मारिया नावाच्या एका महिलेने पुरुष वेश धारण करून या पर्वतावर प्रवेश केला होता. त्यानंतर अशा पद्धतीने फसवणूक करून प्रवेश करणाऱ्या स्त्रियांना अद्दल घडवण्यासाठी इथे प्रवेश करणाऱ्या महिलांना बारा वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा देणारा कायदा करण्यात आला. २००८ साली काही युक्रेनियन चाच्यांनी इथे काही स्त्रिया आणून सोडल्या होत्या. अशा तुरळक घटना वगळता इथे राजरोसपणे कुण्या स्त्रीने प्रवेश केल्याचे पाहण्यात नाही.

तसे तर जगात इतरही अनेक ठिकाणे अशी आहेत जिथे स्त्रियांना अजिबात प्रवेश दिला जात नाही. शबरीमलामध्ये फक्त पाळी येणाऱ्या स्त्रियांना बंदी आहे. म्हणजे वय वर्षे दहापासून ते पन्नास वर्षाच्या स्त्रिया इथे प्रवेश करू शकत नाहीत. मात्र त्याच्या दहा वर्षाच्या आतील मुली आणि पन्नाशीच्या वरील वृद्ध स्त्रियांना इथे प्रवेश दिला जातो. शबरीमालाच्या महिला प्रवेश बंदीचा हा प्रश्न सध्या भारताच्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.

जपानमध्येही एक असाच पर्वत आहे. याचे नाव आहे माउंट ओमिन. जपान मधील शुगेंदो पंथाच्या लोकांचे हे धार्मिक स्थळ आहे. इथे येणाऱ्या पुरुष भक्तांना आपल्या भक्तीची परीक्षा देण्यासाठी कठोर शारीरिक चाचण्या द्याव्या लागतात.

 

(माउंट ओमिन)

माउंट अथॉसची ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा.

 

लेखिका: मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required