दुसऱ्या महायुद्धातल्या जिवंत बॉम्बचा ७५ वर्षांनी असा असा झाला स्फोट!!
दुसरे महायुद्धाच्या दरम्यान युद्धात उतरलेल्या देशांनी अनेक लहानमोठे बाँब्स एकमेकांवर टाकले. काही बाँबचा स्फोट झाला, काही तेव्हा फुटलेच नाहीत. अशाच एका न फुटलेल्या बॉम्बचा स्फोट नुकताच घडवून आणला गेला आहे.
गोष्ट आहे १९४५ सालची. दुसरे महायुद्ध जोरावर होते. ब्रिटनच्या रॉयल एयर फोर्सने एक बॉम्ब-ज्याला टॉलबॉय किंवा भूकंप बॉम्ब म्हटले जाते असा बॉम्ब-पोलंडवर टाकला होता. तर हा इतका जुना बॉम्ब नुकताच निकामी करण्यात आला.
हा बॉम्ब निकामी करण्यासाठी पोलंडच्या सेनेने तो बाल्टिक समुद्रात खोल पाण्यात नेला. एकतर बॉम्ब निकामी होणार होता किंवा फुटणार होता. दोन्हीही शक्यता तितक्याच प्रबळ होत्या. म्हणजेच अगदी सिनेमात दाखवतात तशी कहाणी. पण सिनेमात दाखवले जाते त्याच्या उलट इथे घडले.
बॉम्ब फुटला आणि जवळपासचा कित्येक किलोमीटर वरचा परिसर हादरून गेला. स्फोटाचा व्हिडीओदेखील चांगलाच वायरल झाला आहे. पाण्यातून एक प्रचंड मोठी लाट आली. समुद्रात त्सुनामी आली असे वाटावे इतकी मोठी ती लाट होती. हा बॉम्ब तब्बल १९ फूट लांब होता. यावरून तो किती विनाशक असेल याचा अंदाज लावता येईल.
५,४०० किलो वजन असलेल्या या बॉम्बमध्ये २,४०० किलोची स्फोटके भरलेली होती. हा बॉम्ब पाण्याच्या आत १२ मीटर खोल ठेवण्यात आला होता. त्याचे फक्त नाक बाहेर दिसत होते. बॉम्ब फुटण्याची शक्यता माहीत असल्याने जवळपास सगळा परिसर रिकामा करण्यात आला होता. तसेच शहरातील गॅस पुरवठा देखील खंडित करण्यात आला होता. म्हणून कुठलीही हानी होऊ शकली नाही.
आपण हा व्हिडिओ पाहू आणि हा बाँब तेव्हा फुटला नाही, परिणामी जिवित-वित्त हानी झाली नाही याचा आनंद मानू.