computer

दोन बोटांचं साधं गणित सांगते तुमचा स्वभाव, खेळाची आवड आणि आरोग्याची रहस्यं!!

तळहातावर केस येणं म्हणजे वेड लागण्याचं लक्षण आहे असं मित्राने म्हटलं आणि दुसर्‍या क्षणाला आपण तळहात तपासून बघितले तर ही खास माहिती देणारा मित्र खदखदून हसताना तुम्हाला दिसेल. एखादी गोष्ट कळल्यावर असा ताबडतोब विश्वास ठेवणं हाच शुध्द वेडेपणा आहे.  नाही का?

परंतु वाचकहो, आज आम्ही तुम्हाला तुमच्या हाताच्या दोन बोटांविषयी अशी माहिती सांगणार आहोत जी वाचल्यावर तुम्ही लगेच हातात फूटपट्टी घेणार आहात याबद्दल काहीही शंका नाही. आता हाताला पाच बोटं असतात. त्यापैकी कोणत्या बोटांबद्दल अपण बोलत आहोत हे आधी स्पष्ट करू या! आपल्याला हवं आहे आपल्या हाताच्या पंजाचे अंगठ्याजवळचे बोट म्हणजे तर्जनी (इंडेक्स फिंगर) आणि करंगळीजवळचे बोट म्हणजे अनामिका (रिंग फिंगर).  या दोन बोटांच्या लांबीचे गुणोत्तर आपल्याबद्दल बरंच काही सांगत असते. 

नक्की काय सांगते हे गुणोत्तर?

तुम्ही किती प्रमाणात पुरुषी आहात? किती प्रमाणात अंग राखून स्वत:लाच जपता? तुमच्या अंगात किती धाडसीपणा आहे? तुम्हाला भिन्नलिंगी व्यक्तीसोबत जुळवून घेणे जमणार आहे का? तुम्ही अ‍ॅथलेट होण्याच्या लायकीचे आहात का?  तुम्हाला हृदयकार, काही विशिष्ट प्रकारचे कॅन्सर होण्याची शक्यता किती आहे? हे जाऊ द्या, तुमच्या लिंगाची लांबीसुद्धा या गुणोत्तरावर अवलंबून असते, असं म्हटल्यावर तुम्ही आम्हाला वेड्यात जमा कराल हे नक्कीच आहे. पण दुसर्‍या क्षणी हातात फूटपट्टी घेऊन बोटांची लांबी मोजणार आहात  याची पण आम्हाला खात्री आहे.

पण काय आहे हा प्रकार?

तर्जनी आणि अनामिका या दोन बोटांच्या लांबीच्या गुणोत्तराला 2D:4D रेशो असं म्हणतात. 2D म्हणजे तर्जनीची लांबी आणि 4D म्हणजे अनामिकेची लांबी! पुरुषांमध्ये तर्जनी ही नेहेमीच अनामिकेपेक्षा लांबीने  किंचीत कमी असते. पण स्त्रियांमध्ये हे नेमके उलटे असते. त्यांची अनामिका तर्जनीपेक्षा लांबीने बरोबरीने किंवा जास्त असू शकते. समजा तुमच्या तर्जनीची लांबी २.९ इंच आहे आणि अनामिकेची लांबी ३.१ इंच आहे.  तर हे गुणोत्तर (२.९/३.१ = ०.९३५) इतके म्हणजेच १.० पेक्षा कमी असेल.  याला लो 2D:4D रेशो म्हणतात.

समजा, एखाद्याच्या तर्जनीची लांबी ३.१ इंच आहे आणि अनामिकेची २.९ आहे तर  हे गुणोत्तर (३.१/२.९ = १.०६) इतके म्हणजे १.० पेक्षा जास्त असेल. अशा गुणोत्तराला हाय 2D:4D रेशो म्हणतात.  थोडक्यात, या दोन बोटांच्या लांबीमुळं पुरुषांमध्ये 2D:4D हा १.० पेक्षा कमी असतो, तर स्त्रियांमध्ये १.० पेक्षा जास्त किंवा जवळपास असतो. 

हे इतकं वाचल्यावरही ही भाकडकथा आहे असं वाटण्याचा संभव आहे.  पण हाच फरक इतर प्राण्यांमध्येही आढळतो. १९८० पर्यंत या विषयावर फारसं संशोधन झालं नव्हतं.  पण त्यानंतर अनेक शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या पध्दतीने म्हणजे काहींनी संख्याशास्त्रीय (स्टॅटेस्टीक्स) पध्दतीने तर काहींनी प्रयोगशाळेत वेगवेगळे प्रयोग सुरु केले . यावरून तोन गोष्टी निश्चित झाल्या.  त्या म्हणजे-

१ ) गर्भावस्थेत असताना टेस्टोस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन या दोन हार्मोनसच्या कमी जास्त पुरवठ्यामुळे हा फरक घडून येतो 
२ ) या फरकामुळे व्यक्तिमत्वातले फरक नजरेस येण्याइतके घडून येतात.

आता हे पुढे वाचण्याआधी टेस्टोस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन या हार्मोनचे कार्य समजून घेऊ या.

टेस्टोस्टेरॉन हे सेक्स हार्मोन आहे . इथे सेक्स हार्मोन याचा अर्थ प्रत्यक्ष लैंगिक क्रियेशी न जोडता लिंग म्हणजेच जेंडर असा अर्थ घ्यावा. हे हार्मोन शरीरातले हाडाचे वजन, शरीरावर चरबीचा थर कुठे जमा होईल, शरीरात स्नायूंचे प्रमाण किती असेल आणि त्यांची ताकद किती असेल हे ठरवत असते. अर्थातच वयात आल्यावर पुरुषांच्या कामेच्छेचे प्रमाण पण हेच हार्मोन ठरवत असते.  थोडक्यात हे पुरुषी हार्मोन आहे.

इस्ट्रोजेन हे स्त्री हार्मोन आहे. शरीरात वंशवृध्दीचे फरक घडवून आणणे- म्हणजेच योग्य वयात पाळी सुरु होणे किंवा बंद पडणे हे या हार्मोनचे कार्यक्षेत्र आहे. आता या दोन हार्मोन्सचा पुरवठा गर्भावस्थेतल्या शिशुला ज्या प्रमाणात होत असेल त्याप्रमाणे केवळ 2D:4D  हा रेशो बदलतो असे नाही, तर शरीरात इतर अनेक बदल दिसतात.

हे फरक नेमके काय हे समजून घेण्याआधी एक महत्वाची सूचना- हे संशोधन अजूनही पूर्णत्वास गेलेले संशोधन नाही. अजून अनेक अंदाज चुकण्याची शक्यताही आहे. पण निरिक्षणे योग्य आहेत. काही निरिक्षणे समाजातील एका घटकात लागू पडता,त तर काही ठिकाणी ती तशी दिसत नाहीत. सर्व मानवी  वंशाला लागू पडतील असे निष्कर्ष अजून स्थापित व्हायचे आहेत. या विषयावर इतर अनेक लेखात हे निष्कर्ष अंतिम निर्णायासारखे मांडले जातात जे चुकीचे आहे.

या प्रयोगात आणि निष्कर्षात शास्त्रीय तथ्य आहे का? 

असा प्रश्न विचारल्यास त्याचे होय असे आहे.चला तर, बघू या 2D:4D या रेशीओचा आपल्या आयुष्याशी काय संबंध आहे.

ज्या पुरुषांचा 2D:4D रेशो लो असतो, ते इतरांपेक्षा जास्त आक्रमक असतात. लो रेशो असलेली मुलं मुलींशी जुळवून घेतात, त्यांना समजून घेतात, त्यांच्यावर खर्च करतात, आकर्षक दिसण्यासाठी खास प्रयत्न करतात. थोडक्यात एखादा नर मादीला आकर्षित करून घेण्यासाठी जे काही करेल ते सर्व करतात. साहजिकच लो  2D:4D रेशोवाले अर्थातच लवकर लग्न करतात आणि मुलं जन्माला घालतात.

डॉक्टर जॉन मॅनींग हे या क्षेत्रातले जाणकार समजले जातात. बीबीसीवर त्यांना finger scientist हे नाव मिळाले होते. त्यांच्या संशोधनाप्रमाणे लो  2D:4D रेशोवाले स्त्री-पुरुष जास्त 'अ‍ॅथेलेटीक' असतात. त्यांच्या निरीक्षणाची परीक्षा घेण्यासाठी त्यांच्यासमोर अ‍ॅथलेटचे फोटो ठेवून यांपैकी कोण जिंकण्याची शक्यता आहे हे विचारले गेले. त्यांनी वर्तवल्यालेल्या सहांपैकी चार यशस्वी झाले. जोखीम घेण्याची वृत्ती पण या रेशोवर अवलंबून असते. चारचौघात धाडसी विधानं करणे, शेअर बाजारात सट्टा करणे, अंदाज वर्तवणे असे उद्योग लो 2D:4D रेशोवाले करतात, तर हाय  2D:4D रेशोवाले चारचौघात मतप्रदर्शन करणे  टाळतात, आणि सहसा जोखीमही घेत नाहीत. 

एकूण तुमच्या लक्षात आलं असेल, लो  2D:4D रेशोवाले जास्त 'पुरुषी' वागतात, तर हाय 2D:4D रेशोवाले लोक जपूनच राहतात. पण हे सर्वत्र एकसारखे लागू पडेल असे नाही. धुम्रपानाच्या सवयीचा विचार केला तर हाय 2D:4D रेशोवाले जास्त धूम्रपान करतात आणि मद्यपानाचा विचार केला तर लो 2D:4D रेशोवाले जास्त मद्यपान करतात. ऑटीजम, ADHD , नैराश्य आणि चिंता करणे, हृदय विकार, प्रोस्टेट कॅन्सर, लिंगाची लांबी अशा अनेक बाबतीत हा 2D:4D रेशो निदर्शकासारखा काम करतो हे आता शास्त्रज्ञांच्या लक्षात आलेले आहे.

पण वाचकहो, नव्या शास्त्रीय निरीक्षणांची माहिती जोपर्यंत ठोस निष्कर्षाप्रत पोहचत नाही तोपर्यंत ती इंग्रजीत म्हणतात तशी 'विथ पिंच ऑफ सॉल्ट' घ्यावी.  पण तोपर्यंत तुमचा  2D:4D रेशो किती आहे ते कमेंटबॉक्समध्ये नक्की सांगा..

सबस्क्राईब करा

* indicates required