computer

युरी गागारीन -जगातल्या पहिल्या अंतराळवीराचे भारतीय 'कनेक्शन' जाणून घ्या !

ऐश्वर्या राय १९९४ साली मिस वर्ल्ड झाली आणि त्यानंतर ऐश्वर्याच ऐश्वर्या जन्माला आल्या.एकेकाळी शाळेच्या मुलांच्या यादीवर नजर टाकली  तर त्यात जास्तीतजास्त गर्दी 'सचिन'ची असायची. पण हे काही नवे नाही.आधीच्य्य पिढीतही मुलांची नावं  नेहरू आणि राजकपूर ठेवलेली  आढळतात.थोडक्यात सांगायचं तर आवडत्या व्यक्तीचं नाव आपल्या मुलाला देणं ही फारच जुनी फॅशन आहे.

पण ही सगळी नावं भारतीय 'सेलेब्रिटी' सोबत जोडलेली आहेत.आज आपण अशा एका रशियन माणसावद्दल बोलणार आहोत ज्याचं नाव आहे युरी गागारीन -जगातला पहिला अंतराळवीर ज्याने  १२ एप्रील १९६१ रोजी व्होस्टोक नावाच्या यानातून अंतराळात झेप घेऊन पृथीभोवती अंतराळात पहिली प्रदक्षिणा पूर्ण केली होती ! त्यानंतर अनेक वर्षं अनेकांनी आपल्या मुलाचं नाव गागारीन ठेवलं होतं. काहीजणांनी तर आपली आडनावं बदलून गागारीन हे आडनाव धारण केलं होतं.काल युरी गागारीनचा जन्मदिवस होता,या निमित्ताने  आपण चाळून बघू या भारताचे युरी गागारीन कनेक्शन !

हा काळ होता १९६१ चा ! अमेरिका आणि रशियाच्या शीतयुध्दाचा आणि अंतराळ स्पर्धेचा काळ ! अंतराळात पाऊल टाकणारा पहिला मानव अमेरिकेचा असेल की रशियाचा हा प्रश्न दोन्ही बाजूंना एकसारखाच छळत होता. पण बाजी मारली रशियाने -रशियाच्या युरी गारीन या पहिल्या अंतराळवीरने  १२ एप्रील १९६१ रोजी व्होस्टोक नावाच्या यानातून अंतराळात झेप घेऊन पृथ्वीभोवती अंतराळात पहिली प्रदक्षिणा पूर्ण केली. शेवटच्या क्षणापर्यंत अत्यंत गुप्तेतेत पार पडलेल्या या मोहिमेची बातमी आली आणि जग आनंदाने बेहोष झालं. युरी गागारीन एका रात्रीत आख्ख्या जगाचा हिरो झाला. त्या साठीच्या दशकात अनेकांनी आपल्या मुलाचे नाव 'गागारीन ' ठेवलं.अर्थात हा गागारीन इफेक्ट महाराष्ट्रात फारसा दिसला नाही पण महाराष्ट्र वगळता अनेक प्रांतात त्यावेळी गागारीन जन्माला आले ! विश्वास बसत नसे तर एक फेसबुक सर्च मारा. अनेक गागारीन भेटतील ! त्यापैकी एक गागारीन नावापुरताच न राहता थेट रशियालाच पोहचला आहे !

या गागारीन इफेक्टचे आणखी एक महत्वाचे कारण म्हणजे युरी गागारीनचे मनमोकळे -दिलखुलास हास्य ! या हास्यावर आख्खे जग तेव्हा फिदा झाले होते असे म्हणतात ! असा हा युरी गागारीन अंतराळ यात्रेवरून परत आल्यावर सहा महिन्यातच मुंबईला आला होता. दादरच्या शिवाजी पार्कवर त्याच्या सभेत खचाखच गर्दी झाली होती. युरी गागारीनच्या भारत भेटीची  ही ५ मिनिटाची क्लिप बघण्यासारखी आहे.

युरी गागारीनचे आणखी एक भारत कनेक्शन तर थेट लालबागच्या उड्डाणपूलासोबत जोडलेले आहे.एकेकाळी लालबाग हा कामगारांचा-मुख्यत्वे गिरणीकामगारांचा निवासी भाग होता.या भागात झालेल्या नव्या उड्डाणपूलाचे नाव युरी गागारीन उड्डाणपूल द्यावे अशी रशियन सरकारची इच्छा होती.भारतातल्या रशियन वकीलातीने तशी विनंती भारतसरकारला वारंवार केलीही होती पण तसे नामकरण होऊ शकले नाही. 

२०२१ साली गागारीनच्या उड्डाणाला ६० वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने केरळमध्ये 'समस्त गागारीन संमेलन' भरले होते. गागारीन नावाच्या  अनेकांनी या संमेलनात हजेरी लावली होती.काहीजण १२ एप्रीलला जन्माला अले होते म्हणून पालकांनी त्यांचे नाव गागारीन ठेवले होते. एका शेतकर्‍याच्या आईवडलानी तर त्याचे संपूर्ण नाव नाव- युरी गागारीन असेच ठेवले होते. 

युरी गागारीनच्या दिल्ली दौर्‍यात केलेल्या भाषणात त्याने म्हटले होते की "मला असं वाटतं की एक दिवस असाही येईल की त्या दिवशी सोव्हिएत आणि भारतीय अंतराळवीर एकत्रितपणे अंतराळातील अज्ञात क्षेत्रांचा शोध घेतील"


त्यानंतर २३ वर्षांनी नेमके हेच घडले.भारत रशियाच्या संयुक्त मोहिमेतून भारताचा पहिला अंतराळवीर राकेश शर्मा Soyuz T-11 यानातून अंतराळात पोहचला.

आठवून आनंद वाटावा अशी अनेक भारतीयांची अशी अनेक विदेशी कनेक्शन आहेत.बोभाटाच्या माध्यमातून ती आपण वाचतच राहू या !  

सबस्क्राईब करा

* indicates required