computer

समुद्र कोरडा पडला तर पृथ्वी कशी दिसेल? पाहाच या व्हिडिओमध्ये!!

समुद्राने पृथ्वीचा ७० टक्के भाग व्यापला आहे. समजा समुद्रातलं पाणी आटून समुद्र कोरडा पडला तर पृथ्वी कशी दिसेल? हे चित्र कसं असेल याची कल्पना येण्यासाठी २००८ साली नासाने एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओचा आधार घेऊन शास्त्रज्ञ जेम्स ओडोनोयू यांनी नवीन व्हिडीओ तयार केला आहे.

समुद्र कोरडा झाल्यावर पृथ्वी कशी दिसेल हे नेमकं या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलं आहे. जेम्स ओडोनोयू यांनी नासाच्या व्हिडीओत काही बदल केले आहेत. समुद्र कोरडा झाला म्हणजे नेमकं किती प्रमाणात पाणी संपुष्टात आलं हे समजावं म्हणून एक ट्रॅकर देण्यात आला आहे. याखेरीज व्हिडीओची वेळही बदलण्यात आली आहे. 

या व्हिडीओच्या आधारे काय माहिती मिळते?

 

https://www.youtube.com/watch?v=-uOwv_Krqk8&feature=emb_title

समुद्र कोरडा झाल्यानंतर समुद्राच्या आत असलेला भूभाग समोर येतो. दोन खंडांना जोडणारा जो भाग पूर्वी समुद्रखाली होता तो बाहेर आलेला दिसतो. विज्ञान म्हणतं की या दोन खंडांना जोडणाऱ्या पुलाचा वापर करून आपल्या पूर्वजांनी प्रवास केला. सायबेरिया ते अलास्का, ऑस्ट्रेलिया ते आईसलंड असा प्रवास त्याकाळी शक्य होता.

हे पूल कसे तयार झाले त्याबद्दलही एक थियरी आहे. मानवी इतिहासातील शेवटच्या हिमयुगाच्यावेळी दोन्ही ध्रुवांवर समुद्राचं पाणी बर्फाच्या रूपाने जमा झालं. असं म्हणतात की या बर्फामुळेच दोन खंडांना जोडणारे पूल तयार होऊ शकले. अशा प्रकारे माणूस संपूर्ण पृथ्वीवर पसरला असंही म्हटलं जातं.

व्हिडीओमध्ये एक महत्त्वाची गोष्ट दिसते ती म्हणजे समुद्रात असलेली सर्वात लांबलचक पर्वतरांग. ही पर्वतरांग ६०,००० किलोमीटर भागात पसरली आहे. ही पर्वतरांग दिसण्यासाठी समुद्राची पातळी तब्बल ६५०० ते ९८०० फुट खाली जाणं गरजेचं आहे.

पाण्याची पातळी आणखी खाली गेल्यावर पृथ्वी ज्यांच्यावर आधारली आहे ते टेक्टोनिक प्लेट्स आणि त्यांच्या सभोवताली असलेले ज्वालामुखीय पर्वत दिसू लागतात. अशा ७ टेक्टोनिक प्लेट्सने मिळून पृथ्वी तयार झाली आहे.

समुद्राची पातळी जवळजवळ १९००० फुट खोल गेल्यावर संपूर्ण समुद्र कोरडा झाल्याचं दिसून येतं, पण समुद्रातला प्रत्येक थेंब जाण्यासाठी तब्बल ३२००० फुट खोली लागते.

मंडळी, हे चित्र खऱ्या आयुष्यात येणं शक्य नाही, पण संशोधनाच्या दृष्टीने फारच रंजक आहे. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडीओ? आम्हाला नक्की सांगा.

 

अशाच रंजक कल्पना जाणून घेण्यासाठी आमचे खालील लेख नक्की वाचा :

जगातली सगळी माणसं अदृश्य झाली तर काय होईल ? पहा हा व्हिडीओ !!

सूर्य अदृश्य झाला तर काय होईल भाऊ?

सबस्क्राईब करा

* indicates required