रेसच्या लंगड्या घोड्यांना मारून का टाकलं जातं ??
रेसचा घोडा हा धावपट्टीवर असे पर्यंत त्याला किंमत दिली जाते, पण एकदा का त्याचा पाय मोडला की त्याचा जीव घेतला जातो. हजारो जखमी, पाय मोडलेले घोडे दरवर्षी मारले जातात. घोड्यांना बरं करण्याऐवजी घोड्याचे मालक त्यांना मारून का टाकतात असा प्रश्न पडला ना ? आज आपण याच प्रश्नाचं उत्तर जाणून घेणार आहोत.
हा प्रकार अमानुष वाटत असला तरी विज्ञान म्हणतं की हे घोड्यासाठीच फायदेशीर आहे. कसं ते समजून घेऊया.
त्याचं असं आहे, घोडा हा माणसाप्रमाणे मोडलेल्या पायावर दीर्घकाळ उपचार करून घेऊ शकत नाही. या उपचारादरम्यान घोड्यांना कुत्र्याप्रमाणे ३ पायांवर चालताही येत नाही. त्यांचा सगळा भार पेलण्यासाठी त्यांचे चारही पाय शाबूत राहणं गरजेचं असतं.
लहानसहान दुखापतीच्या वेळी घोड्यांवर एका दिवसाकरता उपचार करता येतो, पण जेव्हा मोठी दुखापत असते तेव्हा त्यांना उपचार घेता येत नाही. तज्ञांच्या मते घोडे दीर्घकाळाचा उपचार सहन करत नाहीत.
याचं दुसरं कारण दिलं जातं ते म्हणजे रेसच्या घोड्याची जटील शरीररचना. रेसचा घोडा हा इतर घोड्यांपेक्षा वेगळा असतो. त्याच्या शरीरात २०५ हाडं असतात, त्यातली ८० ही पायाच्या भागात असतात. ही हाडे प्रचंड वेगाने धावण्यासाठी तयार झालेली आहेत. घोड्याचं जवळजवळ ५०० किलो वजन पेलण्याची जबाबदारी या हाडांवर असते. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही हाडे वजनाने हलकी असतात. याच कारणाने जेव्हा घोड्याचा पाय मोडतो तेव्हा या हाडांना पुन्हा जोडणे कठीण होऊन बसते.
या सर्व गोष्टी लक्षात घेता एकच पर्याय उरतो तो म्हणजे घोड्याचा मृत्यू.
घोड्याला मारण्याचा निर्णय घोड्याचा मालक घेत नसतो. हा निर्णय पशुवैद्याचा असतो. या निर्णयापर्यंत पोहोचण्यापूर्वी खात्री केली जाते की घोडा कधीच बारा होऊ शकत नाही किंवा त्याच्या उपचाराला फार मोठा कालावधी लागणार आहे. एकदा का निर्णय पक्का झाला की लगेचच घोड्याचे प्राण घेतले जातात.
मंडळी, हाच प्रकार भारतीय सैन्यात रिटायर्ड कुत्र्यांसोबत होतो. पण निवृत्त होणाऱ्या कुत्र्यांचा जीव घेण्यामागे एक वेगळं लॉजिक आहे. ते समजून घेण्यासाठी आमचा खालील लेख वाचायला विसरू नका.
भारतीय सेना आपल्या रिटायर्ड कुत्र्यांना का मारून टाकते? जाणून घ्या...